'यांना तर काळोखाचीहि संवय आहे. अंधारांतूनहि ते प्रवास करतात. काळोखांतहि हे प्रकाश देतील.पडूं लागले तर आधार देतील. धराल ना हो हात जर काळोख पडला तर ?' वत्सलेनें हंसून विचारिलें.
'पाण्यांत बुडत असतांना पकडला अंधारांत पडत असतांहि पकडीन. चला पाहूं लौकर. नाहीं तर मजा जाईल. असें सोनें फार वेळ टिकत नाहीं. दैवी क्षण पटकन् जातात. क्षणभर विश्वेश्वर महान् वैभव दाखवतो. आपल्या वैभवाची मानवाला कल्पना देतो. मानवाला आपल्या सोन्याचांदीचा थोडा कमी गर्व वाटावा म्हणून ही सृष्टीचीं भव्य दर्शनें असतात. आकाशांतील सा-या ढगांचे जणूं सोनं झालें. एका महान् सुवर्णरंगात सारीं अभ्रखंडे रंगली. महान् वस्तूंसमोर विरोध मावळतात. आपणांसहि तींत विरून जावें असें वाटतें. नाहीं तर आपण हास्यास्पद होतो. या सोन्यासारख्या आकाशांत एखादा काळतोंडा मेघ जर अलग राहता, तर आपणांस तो आवडला नसता !' तो तरुण म्हणाला.
'परंतु स्वत:चे अस्तित्व त्याला नसेल गमवायचें तर ? असेल तुमचें सोने, परंतु माझ्या जीवनाची मातीच मला मोलवान् आहे असे कोणाला वाटण्याचा संभव आहे. आणि शेवटी सारें एकच आहे. एकरंगी दिसो वा नानारंगी दिसो, ह्या सर्व रंगांच्या पाठीमागें एकच शक्ति आहे. आकाशांतील हे रंग बदलतील, परंतु पाठीमागचा अभंग निळा रंग कायमच आहे ! नाहीं का ? ती पाहा आली नदी. आपल्या पाठीमागून मुलेंहि येत आहेत.' वत्सला म्हणाली.
नदीतीरावर वत्सला व तो तरुण उभयतां उभी होती. वाचा कुंठित झाली होती. लहान मुलें-मुली नाचत होतीं. त्यांची काव्यशक्ति जागृत झाली होती. मुलांची प्रतिभा अप्रतिहत असते. त्यांची कल्पना पटकन उडूं लागते, बागडूं लागते. आकाशांतील देवदूतांची चित्रें लहान मुलांची काढतात. परंतु त्यांना पंख असतात. सपंख लहान मुलें म्हणजे देवांचे दूत. मुलें जन्मतात, तेव्हां त्यांना हे पंख असतात. परंतु हे पंख हळूहळू छाटले जातात. मुलांचा उड्डाण करणारा आत्मा खालींच डांबला जातो. वत्सला व तरुण. तीं दोघें मुकीं होती. मुकेपणानें उचंबळत होती, स्थिरपणानें नाचत होती, न बोलतां बोलत होती. चित्राप्रमाणें ती दोघें होती. चित्रांत भावांचे मूक दर्शन असतें. हृदयांतील भावांचे मूक दर्शन वत्सला व तो तरुण ह्यांच्या मुद्रेवर उमटलें होतें. परंतु ती मुलें ? त्यांचा आनंद नाचण्यांत व गाण्यांत ओसंडूं लागला. मुलाला मनांत राखतां येत नाहीं. तो देत असतो, प्रकट करीत असतो. ऐका मुलाचें गाणें, पाहा त्यांचा नाच !
आभाळ झालें सोन्याचें सोन्याचें
आभाळ आहे कोणाचें कोणाचें
आभाळ झालें सोन्याचें सोन्याचें
आभाळ देवबाप्पाचें बाप्पाचें
सोन्याचा पडतो पाऊस पाऊस
रुसुन नको तूं जाऊंस जाऊंस
सोन्याचा पडतो पाऊस पाऊस
नको भिकारी राहूंस राहूंस