"अरे, ही का भांडणं उकरावयाची वेळ ? माझी चालली रे गुणांची पोर ! आहे का रे कोणी नाग येथें ? आहे का कोणी माणुसकी असलेला आर्य ? उदारचरित आर्य ? नाहीं, कोणी नाहीं ? ती पाहा, तिचेच ते केस! टाका कोणी उडी !' सुश्रुता विलपत होती.
तो पाहा कोणी तरी धांवत आला ! घेतली त्यानें उडी ! उसळणा-या प्रक्षुब्ध पाण्यात घेतली उडी. पाण्यांच्या लोंढयांत त्यानें आपल्या देहाचा ओंडका फेंकला. वत्सलेला आधार म्हणून फेकला. नदीनें फेसाची माळ त्याच्या गळयांत घातली ! झपझप हात मारीत जात आहे. परंतु हें काय ? तोहि दिसेनासा झाला ! तोहि बुडाला की काय ? आला वर, चालला पुढें ! नदीजवळून आणणार कशी लूट हिसकावून ? ती नदी रत्नाकराला तें निर्मळ जीवन-रत्न नेऊन देणार होती. प्रियकराच्या चरणीं ती भेट देणार होती. परंतु हा तरुण विफळ करणार का तिचे हेतु ?
तीरावरून लोक पाहात होते. तीराच्या बाजूनें धांवत जात होते. लहान मुलें तर 'आहे, तो दिसत आहे' असे म्हणत पुढें पुढें पळत होती. तो पाण्याचा लोंढा, हा मानवी लोंढा.
तो तरुण त्या नदीबरोबर झगडत होता. आपलें लक्ष्य गांठण्यासाठी धडपडत होता. ती पाहा त्यानें एकदम मोठी झेप घेतली. परंतु काय ? ते केंस नव्हते. ती वेल होती. फसला. पुन्हां मारली झेंप, काय सापडले ? त्याला पदर वाटला. परंतु ती शेवाळ होती. त्याचें रत्न नाहीं का त्याला मिळणार ? सांपडलें, सांपडलें ! काही तरी सांपडलें ! पाहा पकडीत आहे! होय, वत्सलाच ती. तिचें डोकें वर धरून तो आणीत आहे. एका हाताने लाटांशी झगडत आहे. त्याचा एक हात व खवळलेल्या सरितेचे सहस्त्र हात! परंतु तो एक हात भारी आहे. नि:स्वार्थ सेवा त्या हातांत भरलेली आहे. थोर अहेतुक प्रेम त्या हातांत भरलेलें आहे. जगासाठीं हालाहल पिणा-या देवा शंकराच्या जटेंतील एक केस कुबेराच्या सर्व संपत्तीहून अधिक मोलाचा व वजनाचा भरतो ! रुक्मिणीचें एक तुलसीपत्र सत्यभामेच्या संपत्तीहून अधिक भरतें ! वजन वस्तूंचे नसेन तिच्यातील भावाचें आहे. तो त्या तरुणाचा हात ! तो काळासांवळा लहानसा हात ! नदीच्या सामर्थ्यापुढें तो तुच्छ होता. परंतु तो हात त्या वेळेला मंतरलेला होता. अनंत सामर्थ्य त्यांत संचरलेलें होतें. त्या लहान हातांतील महान् त्यागासमोर नदी नमली, शरमली; तिने वेग कमी केला. तो पाहा तरुण तीराकडें येऊं लागला. झपाटयानें येत आहे. सारी शक्ति एकवटून तो येत आहे. आला, आला ! अचेतन वत्सला घेऊन आला ! त्याचे आतां जमिनीला पाय लागले. त्यानें तिला पाठुंगळीस घेतले. तिची चेतनाहीन मान, डोळे मिटलेली मान, त्याच्या खांद्यावर पडली होती.
तीरावर एकच जयघोष झाला. 'शाबास, शाबास !' असे आवाज शेकडों कंठांतून निघाले. तो नागद्वेषी मनांत जळफळत होता. कार्तिक पुढें झाला. तो त्या श्रान्त तरुणाला साहाय्य करायला धांवला.
"थांबा, मी नेतो तिला. तुम्ही दमला असाल.' कार्तिक म्हणाला.
"घ्या, माझ्यांत शक्ति नाहीं.' तो तरुण म्हणाला. कार्तिकाने वत्सलेला खांद्यावर घेतलें. तो आला झपाटयानें.
"आहे का रे धुगधुगी, कार्तिक ?' सुश्रुतेनें विचारलें.