'मी आंता जातों. मला निरोप घेऊं दे.' तो तरुण म्हणाला.
'आतां कोठे जाणार ? या गांवांत तुमची ओळख नाहीं. रात्रीचे कोठें जाणार ? रात्रीं का प्रवास करणार ? येथेंच राहा रात्रभर. जेवा व सकाळी जायचेंच असेल तर जा. नाहीं म्हणू नका.' सुश्रुता म्हणाली.
'मी रात्रींहि हिंडतों. मला भय ना भीति. नागाला भय वाटत नाहीं. घोर रानांतहि मी एखाद्या दगडावर खुशाल रात्रीं झोपतों. मला घर आवडतच नाहीं. घर संकुचित करतें. घराचा कोंडवाडा मनाचा कोंडमारा करतो. आपण घरेंदारें करूं लागलों, की द्वेषमत्सर वाढूं लागतात. आसक्ति वाटूं लागते. आर्य घरेंदारें करूं लागले व नागांना हाकलून देऊं लागले. सा-या चांगल्या जमिनी आपल्याला पाहिजेत, असा त्यांचा हट्ट. आज नागांजवळ भांडतील, उद्यां आपसांत भांडतील. कुरुक्षेत्रावर भांडलेच ना ? भांडले व मेले. एकदा भांडण्याची संवय लागली, म्हणजे कोणी तरी भांडायला पाहिजेच असतो. एक दिवस मानवाला कळून येईल कीं, सर्वांनी मिळतें घेऊन राहिलें पाहिजे. स्वत: जगावें, दुस-याला जगूं द्यावे. सहकार्य करावें. परंतु केव्हा येईल तो दिवस ?' तो डोळे कोठें तरी भविष्यांत नेऊन म्हणाला.
'मोठमोठे वृक्ष क्षणांत उगवत नाहीत. क्षणांत उगवणरी झाडे क्षणांत मरतात. भराभरा जन्मणारे जीवजंतु मरतांनाहि भराभरा मोठी ध्येयें, मोठे विचार वाढीला लागायला वेळच लागणार. सृष्टीचा हा नियमच आहे. तो लक्षांत ठेवून धीरानें वागलें पाहिजे.' सुश्रुता म्हणाली.
'आजी, बाहेर बघ कसा सुंदर प्रकाश पडला आहे. पिवळा पिवळा प्रकाश ! असा नव्हता कधीं पाहिला. सा-या आकाशाला जणूं सोन्याचा मुलामा दिला आहे. बाहेर अंगणांत या बघा मुख्य देखावा. इवलाहि ढग कोठे दिसत नाहीं. झाडें बघ कशीं दिसत आहेत ! जणूं सुवर्णाची वृष्टि होत आहे. कधी नव्हता असा देखावा मी पाहिला.' वत्सला नाचत व टाळया पिटीत म्हणाली.
'मीं हिमालयांत असा देखावा एकदा पाहिला होता. खालीं स्वच्छ व शुभ्र बर्फ व वर पिवळें अनंत अंबर. खाली चादीरुप्यांची शिखरें, वर सोन्याची छत्री ! ' तो तरुण म्हणाला.
'आपण नदीवर जाऊं. तेथें तर फारच सुंदर देखावा दिसतेल. नदीमध्यें सुंदर प्रतिबिंब पडले असेल. नदी सोन्याची झाली असेल, झगमगीत दिसत असेल. येतां तुम्ही ? येतेस आजी ?' वत्सलेनें उत्कंठेने विचारिलें.
'तुम्ही जा. मी स्वयंपाक करतें. काळोख पडण्यापूर्वी या.' सुश्रुता म्हणाली.