'नाग आधीं शंभरदां विचार करील. परंतु नातें जडल्यावर सोडणार नाहीं. तें चिरंतन नातें.' तो म्हणाला.
'आर्य का नातें सोडतात ?' तिनें विचारिलें.
'मी नागांचे सांगितलें. आर्याचें तुम्हांला माहीत.' तो म्हणाला.
'आर्यहि धृतव्रत असतात. सावित्रीची स्फूर्तिदायक कथा नागांच्या कानांवर आली नाहीं का ?' तिनें विचारलें.
'कानांवर नुसती आली, एवढेंच नव्हें, तर वटसावित्रीचें व्रत नागस्त्रियाहि करतात. जें चांगलें दिसेल ते नाग घेतात. तें आर्यांचें का कोणाचें, हा विचार नाहीं करीत.' तो म्हणाला.
'भिकारी मिळेल तें घेतो. परंतु जो श्रीमंत आहे, तो उत्कृष्ट असेल त्याच वस्तूंचा संग्रह करील.' ती म्हणाली.
'कोण भिकारी व कोण श्रीमंत ? आपण सारीं भिकारीहि असतों व श्रीमंतहि असतों. कांही बाबतींत नागांचा अधिक विकास झालेला असेल तर कांहीं बाबतींचा त्यांना स्पर्शहि नसेल झाला. तसेच आर्यांचेहि. अहंकार लागूं नये, म्हणून सर्वांना ईश्वरानें अपूर्ण ठेवलें आहे. परंतु हें माणसाला कळेल तो सुदिन.' तो म्हणाला.
'आर्यांची वैवाहिक नीति का चंचल आहे ?' तिनें पुन्हां प्रश्न केला.
'मीं तसें म्हटलें नाही. परंतु आर्यांचे नागांशी जेथें जेथें संबंध आले. तेथें तेथें असें दिसतें. निदान वरिष्ठ आर्यांनी तरी असे प्रकार केले. त्यांनी नागकन्यांना क्षणभर हुंगलें व फेंकून दिलें. बिचा-या नागकन्या त्या क्षणाच्या स्मृतीलाच जीवनांत अमर करून राहतात. आर्य स्वत:ला जेते समजतात आणि त्या तो-यांत आमच्याजवळ वागतात. नागकन्या म्हणजे जणूं एक भावनाहीन वस्तु. एक उपभोग्य वस्तु. ह्यापलीकडे ते किंमत देत नाहींत. आस्तिक ऋषींच्या वडिलांनी मात्र अपूर्व धैर्य दाखविलें. त्यांनी एकदां नागकन्येशीं लग्न लावलें तें लावलें ! त्यामुळेंच आज आस्तिक ध्येयवादी झाले आहेत. पित्याची ध्येयनिष्ठा त्यांच्याजवळ आहे. परंतु, वत्सले, आपली गोष्ट अगदीच निराळी आहे. तूं आर्यकन्या नागाला वरील, तर ते त्या दांपत्याला छळतात ! म्हणून आपण विचार केला पाहिजे अजून. घाईनें सारें बिघडतें. कां ? अशीं कां काळवंडली तुझी मुद्रा ! मला 'हंस' सांगितलेंस, आतां तूंहि हंस.' तो म्हणाला.
'आग अंगावर ओततां आणि हंस म्हणता.' ती म्हणाली.