वत्सलेच्या गांवाला एका वाघाचा फार त्रास होऊं लागला होता. कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघें आहेत.' गाई मरूं लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?
'हा नागानंद या गांवात आला म्हणून हे संकट आलें.' एकजण म्हणाला.
'त्याचें वत्सलेवर प्रेम आहे, तिचें त्यावर आहे. हें पाप देवाला बघवत नाहीं. म्हणून तो करतो आहे शिक्षा.' दुसरा म्हणाला.
'माणसांची मला अद्याप भीति वाटते. माणसांचा विश्वास नाहीं वाटत.' तो म्हणाला.
'हांकलून लावा दोघांना या गांवांतून.' तिसरा म्हणाला.
'परंतु त्यांना हाकलूं तर आपल्या मुलीहि बंड करतील. मोठे कठिण झालें आहें काम !'चौथा म्हणाला.
'त्यांना कशाला हांकलतां ? वाघ-वाघीण मारा ना ? देवाला कां नांवें, दुस-याला कां नांवें ? स्वत:च्या दुबळेपणाला नांवे ठेवा.' एक आर्यकन्या येऊन म्हणाली.
'ही त्या वत्सलेची मैत्रीण. मोठी धृष्ट पोरगी आहे.' एकजण म्हणाला.
'वत्सलेची मैत्रीण होणें कांहीं पाप नाही. तिनें काय केलें वाईट ? तिचे प्राण वांचवायला कोणी तरी झालांत का पुढें ? ज्यानें तिचे प्राण वांचविले, त्याच्या चरणीं तिनें प्रेमपुष्प कां वाहूं नये ?' तिनें विचारिलें.
'तो तरुण एवढा आहे पुरुषार्थशाली, तर या वाघांचा उपद्रव कां नाहीं दूर करीत ? खरें पौरुष स्वस्थ नसतें बसलें.' दुसरा कोणी म्हणाला.
'आज रात्रीं मारणार आहेत ते वाघ केला आहे त्यांनीं निश्चय.' असें म्हणून ती निघून गेली.
'मेला तर परस्पर पीडा टळेल.' कार्तिकाचे वडील तेथें येऊन म्हणाले.
'कोण मेला तर ? वाघ कीं तो नाग ?' एकाने विचारिलें.
'दोघे मरोत.' आणखी कोणीं तरी म्हटलें.