'परंतु सा-या पाय-या शेवटीं वरच नेतील. जिनें वांकडया पाय-यांचे नागमोडी असोत, वा सरळ असोत. पाऊल वरच जात असतें. ' सुश्रुता म्हणाली.
'उलट अगदी सरळ, उंच जिन्यांपेक्षा वांकडा जिनाच हितावह. सरळ जिना घेरी आणतों. वांकडा जिना सहज वर नेतो. नागांच्या इमारती बहु-तेक नागमोडी जिन्यांच्या असतात. आर्यांनी नागांपासूनच ही पध्दत घेतली. आजी, तो मयासुर कांही आर्य नव्हता. परंतु कशी त्याची कला सारें आर्य आश्चर्यचकित होत, तोंडांत बोटे घालीत.' वत्सला म्हणाली.
'मी अगदी लहानपणीं गेलें होते ती मयसभा पाहायला. पाणी आहे असें वाटावें, ओचे वर घेऊन जावें तों कांही नाही. जेथें पाणीं नाहीं असें वाटे, तेथे नेमके असायचे. मोठा कलावान आमची फजिती होई, परंतु एकीकडे हंसून आमची मुरकुंडीहि वळें.' आजीबाई म्हणाली.
'नाग कांही वाईट नसतात. तुझे काय मत आहे आजी ?' वत्सलेने विचारिलें.
'बरेवाईट सर्वात आहेत आणि कोणी वाईट असला तर त्याला सुधारावें. हाच खरा मानवधर्म.'सुश्रुता म्हणाली.
'आजी, माझे बाबा साप वगैरे मारीत नसत हें खरे का ग ? कोणी तरी म्हणत होतें परवा.' वत्सलेने आठवण केली.
'हो. शक्य तों मारीत नसत. चिमटयानें तोंड पकडीत व दूर नेऊन सोडीत. एकदां कार्तिकाच्या घरी मोठा सर्प निघाला. फूं फूं करीत होता, परंतु तुझे वडील फुलांची एक करंडी घेऊन गेले. त्यांनी इतरांस दूर व्हायला सांगितलें. ती फुलांची करंडी त्यांनी काठीनें त्या सर्पाजवळ लोटली. फुलांचा घमघमाट सुटला होता. तो साप त्या करींडींत शिरला. वरून त्यांनी एक झाकण घातलें व त्याला रानांत नेमकें सोडलें. तुझे वडील नागांची मनें दुखवीत नसत. त्यांच्या प्रत्यक्ष अशा कृतीमुळें गांवात फार कलागतीहि होत नसत. समाज आनंदानें नांदत. नागपंचमीचें दिवशी आम्हीहि जाग्रण करीत असूं. फेर धरून नाचत असूं. नागांची गाणीं गात असूं. परंतु तुझे वडील गेले व सारें मागे पडलें. येथील नागमंडळी बहुतेक दुसरीकडे राहायला गेली. नागांच्या बायका खूप आनंदी. नाना प्रकारचे खेळ खेळायच्या, सुंदर गाणी गात नाचायच्या. आमचा तो आनंद आज राहिला नाहीं.' सुश्रुता म्हणाली.
'त्या दिवशी संध्याकाळी नागानंद कसे नाचले ! त्यांच्याबरोबर मीहि नाचलें. ते मला जणूं शिकवीत होते. आंत हृदय नाचत होतें. बाहेर देह नाचत होता. हातांत हात घेऊन आम्ही नाचलों. एकदम बसलों,एकदम उठलो, एकम गिरकी घेतली, एकदम हात वर केले ! मजा ! मुलांनाहि जणू उन्माद चढला होता. आमच्याभोंवतीं मुलें व आम्ही एकमेकांभोवती.