आश्रमांतील महत्वाचीं अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होतें. अनेक ऋषिमुनीं आले होतें. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुलाकार बसले होतें. आश्रमांतील माजी विद्यार्थीहि आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा तेथें जमला होता. आस्तिक म्हणाले, 'उद्यां सूर्य उगवला कीं निघावयाचें. अंधारांत प्रकाश आणण्यासाठीं निघायचें. जनमेजयाच्या क्रोधाग्नीला शांत करावयासाठीं निघावयाचें. समाजांतील द्वेषमय जीवन आपण आपल्या प्रेममय जीवनानें क्षुद्र करण्यासाठी निघूं या. आपण मोठमोठीं ब्रह्मवाक्यें उच्चारतों. ती महावाक्यें जीवनांत आणूं या. तुम्ही आईबापांची अनुज्ञा घेऊन आलां आहांत. आपण अमर असा होमं पेटवूं की या दशाला त्यामुळे सदैव स्फूर्ति तिळेल. ज्या ज्या वेळी या देशातील भावी पिढयांना संकुचितता, स्वार्थ, द्वेष घेरील, त्या त्या वेळीं आपलें हे होणारें बलिदान त्यांना नवजीवन देईल. तुमच्यांतील ज्याचे ज्यांचे हृदय ध्येयाला भेटण्यासाठीं उचंबळत आहे, त्यांनी त्यांनी मजबरोबर निघावें. माझ्याही शरीरांत नागरक्त आहे. जनमेजय मला कां बध्द करून नेत नाहीं. मला आपण होऊन जाऊं दे. त्या त्यांच्या होमकुंडात हा देह अर्पूं दे. मजबरोबर हे अनेक थोर ऋषिमुनिहि येत आहेत. त्यांत कांही आर्य आहेंत, कांही नाग आहेत. कांही संमिश्र आहेत. सर्वांनी निघावयाचें निश्चित केलें आहे. आपला आश्रम कृतार्थ झाला. पवित्र झाला. अत:पर या देशांतील प्रत्येकाच्या हृदयांत आश्रम निर्माणा होईल. हा आपला आश्रम जाईल. स्थूलरूपानें जाईल. परंतु तो सर्वांच्या हृदयांत चिरंजीव होईल.'
'आम्ही सारें तुमच्याबरोबर येणार ! ' तरुण म्हणाले.
'शशांक व मी हांतात हात घेऊन उडी टाकूं. कायम टिकणारें आर्य व नाग यांचे ऐक्य निर्मूं.' नागेश म्हणाला.
'रत्नकांत व मी अशीच एकदम उडी घेतो.' बोधायन म्हणाला.
'अग्ने नम सुपथा रामे अस्मान् ' असा मंत्र म्हणत मी उडी घेईन.' असें पद्मनाभ म्हणाला.
'अमर्त्यं मर्त्यों जोहवीमि । जातवेदों यशो अस्मासु घेहि' असें मी म्हणेन व फेंकीन स्वत:ला.' जातवेद म्हणाला.
रात्री सर्व शांतपणें झोंपीं गेले. मोठया पहांटे आस्तिक उठलें. सर्व ऋषिमुनि उठलें. छात्र उठलें. गंगेवरून सर्वजण स्नानें करून आले. सूर्य आतां वर येणार होता. भारताचें भाग्य वर येत होतें. अपूर्व तेज जन्मत होतें. भगवान. आस्तिकांनी 'आनंदं ब्रह्मणो विद्वान् न विभेति कदाचन' या विषयावर शेवटचे दोन शब्द सांगितले.