शुध्दमति थांबला. आस्तिकांची जणूं समाधि लागली. सारें शांत व गंभीर होते. आस्तिकांनी भावसमाधि उतरली. त्यांनी आपलें डोळे पुसले. प्रसन्नपणें सभोवतीं पाहिलें. गंगेचा प्रवाह वाहत होता. आकाश लाल झालें होतें, सोनेरी झालें होतें.
'संगीत ही दैवी कला आहे. संगीत मोक्ष देणारी कला आहे. संगीतानें आपण वर उचलले जातों. संगीतानें उध्दार होतो. संगीत म्हणजे मानवाचे पंख. हे पंख लावून मनुष्य मोक्षाचें द्वार गांठतो कां होतें असें ? संगीतांत हें कोठून आलें सामर्थ्य ? पांखरांचा कलरव ऐका, नदीची गुणगुण ऐका, पानांचा मर्मरध्वनि ऐका मनावर एक प्रकारचा प्रसन्न परिणाम होत असतो. संगीतात मेळ असतो. संगीत म्हणजे संयम व सहकार्य. संगीत म्हणजे विरोधाचा अस्त. आपल्या जीवनाचा संगीताशीं संबंध आहे. संगीत ऐकून मनुष्य कां वेडा होतो ? कोणतीही कला, तिच्यामुळें मनुष्य मुग्ध कां होतो ? कला म्हणजे सत्य, शिव व सुंदर यांचे संमेलन, कला सर्वांचा संयमपूर्वक स्वीकार करते. संगीतांत आपलया जीवनाचा आदर्श मिळतो आपलें जीवन म्हणजे एक मधुर संगीत करावयाचें हा त्याचा अर्थ, परंतु आपण हें विसरतों. आपण विरोधच उभे करतों. परस्परांशी मिळतें घ्यावयास कधीं तयार होत नाहीं. जीवनांत कधीं तुझे थोडें अधिक, कधीं माझें, असें करावें लागतें. कधीं या सुराला प्राधान्य, कधी त्या. परस्पर व्यवहार म्हणजे अगदीं कांटेकोरपणा नाहीं. जितक्यास तितकें असें करून व्यवहार मधुर होणार नाहीं. परंतु केव्हां समजेल हें माणसाला ? समजेल एक दिवस. बांसरी सात सुरांची. परंतु मानवी जीवनाची बांसरी अनंत सुरांची. ती सुरेल वाजूं लागावयास वेळ लागेल शशांका ! गंगेच्या तीरावरची ही कोसच्या कोस पसरलेली जमीन सुपीक व्हायला किती वर्षें लागलीं असतील तें सांगतां येईल का ? ही जमीन कुणीं सुपीक केली, आहे माहीत ? सांगेल कोणी ? ' आस्तिकांनी प्रश्न केला.
'पुराबरोबर गाळ वाहून येतो व तो पसरतो त्यामुळें जमीन सुपीक झाली.' शुध्दमति म्हणाला.
'शेतकरी वाईट जमिनींत खत घालतो, चांगली माती तिच्यावर पसरतो. तसेच या नद्यां करतात. प्रतिवर्षी नवीन कस आणून निकस झालेल्या जमिनीवर पसरतात, होय ना ? ' शशांकानें विचारिलें.
'होय, चांगले सांगितलेंस. परंतु हें काम शांतपणें हजारों वर्षे चाललें असेल तेव्हां ना गाळ पसरत पसरत शेंकडों कोस दूरवर गेला ? सृष्टीतील महान् घडामोडीं मुकेपणानें शतावधि वर्षे चाललेल्या असतात पंचमहाभूतांपैकीं पाणी, वायु व तेज यांच्यामुळे बहुधा सा-या घडामोडी होत असतात. मनुष्यालाहि समाजांत जर फरक घडवून आणावयाचा असेल, तर यांतील शक्ति त्याच्याजवळ हव्यात. मनुष्याजवळ उदार भावनांचे घो घो करणारे वारे हवेत, बुध्दींत प्रखर तेज हवें आणि आशेचें पाणी हवें. या तीन गोष्टी ज्याच्याजवळ भरपूर प्रमाणांत असतील तो क्रांति करील. वारा, तेज व पाणी; भावना, बुध्दि व आशा-- जीवनांत या तीन वस्तु निर्मा. या आश्रमांतून या तीन वस्तु घेऊन जा. तुम्ही क्रांन्ति कराल.' आस्तिक म्हणाले.