कां निद्रा केलीस मंचकीं मजविरहित मंदिरीं ?
खरें सांगा मजला तरी ॥धृ०॥
प्रथम प्रहर अवशीचा यामध्यें कां डोळा लागला ?
श्रम कोठवर जीवीं वाटला ।
पदर काढितां वरुन तुझा मुखचंद्र म्लान पाहिला ।
तेव्हांच भाव समजला ।
कोण कार्य मसलती रोजगाराची काळजी तुला-।
उद्भवली ? भास मला ।
दुर्बळ आहों आपण म्हणुन कां श्रम वाटती अंतरीं ? ॥१॥
द्वितिय प्रहर लोटली रात्र मध्यान्ह बोलतां तुशीं ।
खरें अजुन कां न सांगशी ? ।
विनंतिच्या नादांत जाउं पाहते ही सारी निशी ।
मग केव्हां मला भोगशी ? ।
मी तों जाहले अधीर, सख्या, तूं चिंताग्रस्त मानसीं ।
पुढें युक्त करावी कशी ? ।
सुखदु:खाची आहे विभागिण सख्या तुझ्याबरोबरी ॥२॥
तृतिय प्रहर झोपेचा निवळ रात्रा चिंचिण वाजती ।
डुकल्या येती मजप्रती ।
मंदिरचे कंदील, समजा, दीप विझूं पाहती ।
यापुढें विनऊं तरि किती ? ।
अघोर निद्रा कुठुन लागली चाडाळिण तुजप्रती ? ।
व्यापिलें तिनें निश्चिती ।
नेत्र उघडुन पहा मजकडे उगिच एकदां तरी ॥३॥
चौथे प्रहरामधें ऐकतां शब्द कांतेचे असे ।
मग कृपादृष्टि पाहतसे ।
म्हणे, सुंदरी ! वृथा श्रमविले तुला अम्ही राजसे !
न कळतां गोष्ट जाहली असे ।
घेऊन मंचकावरी मग तिला गुजगोष्टी पुसतसे ।
प्रियभावें भोगीतसे ।
होनाजी बाळा म्हणे, असेंच अर्जवुन घ्यावें सुंदरी ।
मृदु भाषणें मधुरोत्तरीं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel