कोणी शोध करा सखयाचा । दावा राघो मैनेचा ॥धृ०॥
सखे मी बाळपणापासून । माहेरिं कीं होते आजुन । कमिले पोरांमध्ये खेळुन । तारुण्या वयामधीं येउन । सासरा आला मज घेउन । आनंद जाहाला बहु दारुण । वेळ वक्त पाहुन दिवसाचा ॥१॥

बारा वर्षें जालीं लग्नाला । हळदीचा डाग नाहीं गेला । पती माझा छालछबेला । टाकुनी कोणाकडे गेला ? । कोणी आणा गे जिवलग जीवीचा ॥२॥

आरसा घेउनि सखुबाई । श्रींगार करीत लवलाही । चार समया जळति ठांई ठांई । पलंगावर हातरली जाई । येथें आसरा नाहीं कोणाचा ॥३॥

सुंदर व्याकुळ जीवाशीं । असें कळलें तिच्या सजणाशीं । धावुनी आला गुणीराशी । भोगिली नार मंदिराशीं । कवी बिरोबा राजबनसी । ख्याल गातो दखनदेशी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel