विजापूरच्या बादशाही विरुद्ध झडलेल्या पहिल्याच रणधुमाळीत शिवाजीराजांनी अस्मानी यश मिळविलं। पण राजे वडिलांच्यावर रागावले , चिडले अन् संतापलेसुद्धा। का ? कारण शहाजीराजे बेसावध राहिले , पकडले गेले अन् भयंकर संकट स्वराज्यावर आले. जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांना मानसिक यातना असह्य झाल्या. हे सारं शहाजीराजांच्या गाफिलपणामुळं झालं.

खरंच होतं ते। याची खंत शहाजीराजांना स्वत:लाही निश्चितच होती. पण पेच सोडविण्यासाठी शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या हाती असलेला स्वराज्यातला कोंढाणा किल्ला आणि कर्नाटकातील शहाजीराजांचं महत्त्वाचं ठाणं शहर बंगळूर हे बादशहाला देऊन टाकायचं कबूल केलं. आणि हे पाहून शिवाजीराजे रागावले. राजकारणात अक्षम्य ठरणारी गाफिलपणाची चूक स्वत: महाराजसाहेब शहाजीराजे यांनी केली. परिणाम मात्र या लहानग्या स्वराज्याला भोगायची वेळ आली. तळहातावरती भाग्याचा तीळ असावा तसा कोंढाणागड बादशहाला फुकट द्यावा लागतोय , याचं दु:ख राजांना होत होतं. स्वराज्यातील तळहाताएवढी भूमीही शत्रूला देताना यातना होण्याची गरज असते!

कोंढाणा आदिलशाहीत परत देऊन टाकण्याची आज्ञापत्रं राजगडावर आली। आणि महाराज व्यथीत झाले. ते गडावर कुठंतरी एकांतात एकटेच अस्वस्थ होऊन बसले.

मिळालेल्या यशामुळे राजगड आनंदात होता। एकटे शिवाजीराजे खिन्न होते , कोंढाण्यावर. राजे कुठंतरी जाऊन एकटेच बसले आहेत ही गोष्ट वयोवृद्ध सोनो विश्वनाथ डबीर यांच्या लक्षात आली. सोनोपंत म्हणजे आजोबा शोभावेत अशा वयाचे वडिलधारे मुत्सद्दी. भोसले घराण्यावर त्यांची अपार माया. ते चरण चालीने शिवाजीराजांकडे गेले. महाराज गंभीर आणि उदास दिसत होते. सोनो विश्वनाथांनी वडिलकीच्या सुरात त्यांना पुसलं. ‘ महाराज , आपण चिंतावंत का ? आता काळजी कशाची ? तीर्थरुपसाहेब शहाजीमहाराज शाही कैदेतून मुक्त झाले. आपले राज्यही आपण वाचविले. मग चिंता कशाची ?

‘ राजांनी गंभीर शब्दात म्हटलं , ‘ काय सांगावं! आमचे तीर्थरुपसाहेब बेसावध राहिले आणि शाही जाळीत अडकले। आम्ही हरहुन्नर करून त्यांस सोडविण्यास आदिलशहास भाग पाडले. सुटले. पण वडिलांनी बादशहाच्या मागणीवरून आपला स्वराज्यातील कोंढाणागड परत देऊन टाकण्याचे कबूल केले. काय म्हणावं या गोष्टीला ? आमच्या कामाचे मोल वडिलांस समजलेच नाही. ते स्वत:स मोठे जाणते म्हणवितात. पण वर्तन मात्र अजाणते केले.

‘ हे शब्द शिवाजीराजे व्याकुळतेने बोलत होते , पण ते ऐकताच सोनो विश्वनाथ अधिकच गंभीर होऊन जरा कठोर वडिलकीचे शब्दात म्हणाले , ‘ महाराज , काय बोलता हे ? वडिलांच्याबद्दल असं विपरित बोलणं आपणांसारख्या सुपुत्रांस शोभा देत नाही.

‘ शिवाजीराजे अधिकच गंभीर होऊन ऐकू लागले। ‘ महाराज वडील चुकले तर खासच. शंकाच नाही. पण वडिलांबद्दल असं बोलणं बरं नव्हे. कोंढाण्यासारखा मोलाचा गड विनाकारण हातचा जातोय. खरं आहे पण वडिलांच्याकरिता हे सोसावेच महाराज! वडिलांचा मान राखावा.

‘ शिवाजीराजे एकदम स्वत:स सावरीत बआदब म्हणाले , ‘ नाही , आमचं चुकलं। वडिलांचा अपमान करावा म्हणून आम्ही बोललो नाही. स्वराज्याचे नुकसान , मनाला मानवले नाही म्हणून बोललो. कोंढाणा गेला म्हणून बोललो.

‘ ‘ महाराज कोंढाण्याचे काय एवढे वडिलांपुढे ? हा अतिमोलाचा गड देऊन टाकावा। महाराज , आपण तर अवघा मुलूख काबीज करा. उदास होऊच नका. ‘ महाराजांना हा विवेक फार मोलाचा वाटला. पटला. त्यांनी जरा तीव्र शब्दांत म्हटलं. ‘ होय ‘ जरुर. पण वडिलांचा झालेला हा अपमान ती कैद. त्या अफझलखानाचं वागणं बोलणं आम्हाला सहन होत नाही. ज्यांनी ज्यांनी आमच्या तीर्थरुपांचा असा हीन अपमान केला , त्यांचा त्यांचा सूड आम्ही आमच्या हातानं घेऊ. तो अफझलखान , बाजी घोरपडे , ते वझीर मुस्तफाखान , मनसब ई कार ई मुलकी या साऱ्यांचे वेढे आम्ही घेऊ.

‘ सोनो विश्वनाथ या राजवचनांनी सुखावले। अवघं पावलं असं वाटलं असावं त्यांना. आई आणि वडिलांच्याबद्दल आमचा राजा असं पोटतिडीकेनं बआदब वागतो. साऱ्या मराठी मुलुखापुढं सूर्यफुलाचा आदर्श ठेवतो. एक चारित्र्यसंपन्न करारी पण नम्रही नेतृत्त्व मराठ्यांच्या मुलुखाला लाभलेलं पाहून कोणाच्याही डोळ्यांत अभिमानाचे आनंदाश्रू तरळावेत असंच बोलणं राजा बोलला.

हा सारा संवाद पुढे कवींद परमानंद गोविंद नेवासकर यांनी लिहून ठेवला। त्याचा हा आशय.

कोंढाणागड आदिलशाहीत राजांनी देऊन टाकला. बादशहाच्या हुकुमावरून नव्हे. वडिलांच्या आज्ञेवरून!

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel