लायजी सरपाटलाची अचाट धाडसी मोहीम न घडताच वाया गेली. शिवाजी महाराजांना जंजिऱ्याचा हा अफलातून पण वाया गेलेला डाव रायगडावर समजला. मोरोपंतांनी हा डाव आपल्या हातून का तडीला गेला नाही , याचे उत्तर महाराजांना काय दिले ते इतिहासात उपलब्ध नाही. पण महाराज मोरोपंतांवर नाराज झाले , यात शंकाच नाही. कदाचित मोरोपंतांची अगतिकता महाराजांच्या थोडीफार लक्षात आलीही असेल ; पण महाराज नाराज झाले हे अगदी सत्य. ते मोरोपंतांना म्हणाले , ‘ पंत , तुम्ही कोताई केली. मोहीम फसली. ‘

लायपाटलांच्या या प्रकरणाच्या बाबतीत अधिक माहिती संशोधनाने मिळेल तेव्हा मिळेल. तोपर्यंत काहीच सांगता येत नाही.

पण याही प्रकरणात महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर एक सूर्यकिरण झळकन् झळकून गेला. महाराजांनी कुलाब्यास आज्ञा पाठवून लायजी सरपाटलास रायगडावर बोलावून घेतले.

या जंजिऱ्याच्या प्रकरणाची रायगडावर केवढी कुजबूज चालू असेल नाही यावेळी ?

महाराजांनी भर सदरेवर लायजीस बोलावले. तो आला. उभा राहिला. त्याला पाहून महाराज भरल्या आवाजात म्हणाले , ‘ शाबास! लायजी तू केवढी मोठी कामगिरी केली , शाबास. जंजिऱ्यास सिड्या लावल्या. ‘

लायजीला याचा अर्थच क्षणभर कळला नसेल. तो गोंधळलाही असेल. एका फसलेल्या करामतीचे महाराज कौतुक करतात ही गोष्ट मोठ्या नवलाचीच. महाराज आपल्या कारभारी अधिकाऱ्याला म्हणाले , ‘ लायजी सरपाटलांना पालखीचा मान द्या. ‘ हे ऐकून सारी राजसदर चपापली असेल नाही ? पण लायजी पाटील नक्कीच चपापला. तो म्हणाला , ‘ महाराज , मोहिम तर फते झालीच नाही. मग मला पालखीचा एवढा मोठा मान कशाकरिता ? मला नको ‘ त्यावर महाराज म्हणाले , ‘ नाही लायजी , हा तुझ्या बहाद्दुरीचा मान आहे. जंजिऱ्यासारख्या भयंकर अवघड लंकेस तू शिड्या लावल्यास ही गोष्ट सामान्य नव्हे. शाबास. म्हणून हा पालखीचा मान. ‘

तरीही लायजी म्हणत होता , मला पालखी नको. मान नको.

लायजीच्या या मनाच्या मोठेपणाची आणि खोलीची मोजमापं कशानं घ्यावीत ? हा त्याग आहे. ही स्वराज्यनिष्ठा आहे. यालाच आम्ही राष्ट्रीय चारित्र्य म्हणतो आहोत. यावर अधिक काही भाष्य करण्यासाठी आमच्या शिलकीत शब्द नाहीत.

महाराज लायजीचे हे मन पाहून लगेच आपल्या अधिकाऱ्यास म्हणाले , ‘ लायजी सरपाटलांस एक गलबत द्या आणि त्या गलबताचे नाव ‘ पालखी ‘ ठेवा. ‘ त्याप्रमाणे लायजीस एक गलबत बक्षीस देण्याची व्यवस्था झाली.

हे आणि असे शिवकाळातील प्रसंग पाहिले , की लक्षात येते की , हिंदवी स्वराज्य औरंगजेबाला पुरून कसे उभे राहिले. केल्या कामाचेच मोल घ्यावे ; समाजाचे आणि स्वदेशाचे काम म्हणजे ईश्वरी काम आहे , हीच भावना मनांत ठेवावी. ही शिकवण अगदी नकळत शिवकाळात शिलेदारांच्या मनांत रुजत गेली.

वास्तविक लायजी पाटलासारख्या , येसबा कामठेसारख्या , येसाजी कंकासारख्या शिवसैनिकांवर छोटेमोठे चित्रपट निघायला हवेत. स्वराज्याचे राजेपण प्राप्त झाले असूनही विरक्त जीवन अनेक चित्रपटांत चित्रित केले गेले पाहिजे. ते साधार असावे. अभ्यासपूर्वक केलेले असावे. जर हे घडेल तर आमची पोरेबाळे अशा धनिकांना आणि कलाकारांना भरभरून आशीर्वाद देतील. महाराष्ट्रात अशी कितीतरी ऐतिहासिक ठिकाणे उजाड पडली आहेत की , जिथे स्वराज्य निमिर्तीचा इतिहास घडला. कितीतरी संतसत्पुरुषांच्या समाध्या विपन्नावस्थेत उदासवाणी पडल्या आहेत. त्यांची देखभाल तर राहोच. पण निदान त्यावर माहितीपट काढून या लोकसेवक संतांची ओळख आमच्या नव्या पिढीला होईल. माणसं अंतर्मुख होतील. स्वत:च्या आणि स्वदेशाच्याही चारित्र्याचा विचार करतील. अशी चरित्रे आणि अशी ऐतिहासिक ठिकाणे महाराष्ट्रात रानोमाळ पडली आहेत. पाश्चात्य देशात अगदी लहानसान वास्तूची जपणूक केली जाते. लहानसान चरित्रावरही सुंदर साहित्य निर्माण होते. ब्रिटिश देशात हिंडताना अशी संुदर जपणूक केलेली ठिकाणे पाहिली की , आनंद होतो. पण आमच्याकडे सिंहगडावरच्या तानाजीपासून ते नंदूरबारच्या शिरीषकुमार शहापर्यंत सर्वांचीच आबाळ.

-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel