गोमांतकात ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत कदंब घराण्याचे राज्य होते. अनक देवदेवतांची सुंदर सुंदर मंदिरे ठिकठिकाणी होती. गर्द झाडी , त्यातून खळाळणाऱ्या नद्या , लगतच्या सह्यादीवरून कोसळणारे धबधबे आणि अशा या नंदनवनाहुनही सुंदर असलेल्या गोमांतकावर राज्य करणारे कदंबराजे हे सुसंस्कृत , कलाप्रिय आणि तेवढेच शूर होते. थोडेसे का होईना पण त्यांचे आरमारही होते.

या कदंब घराण्याची जी राजदैवते होती , त्यात दिवाडी येथे सप्तकोटीश्वर शंकराचेही मंदिर भव्य आणि अतिसुंदर होते. कदंब राजे स्वत:ला ‘ गोपकपट्टणाधिपति सप्तकोटीश्वर लब्ध वरप्रसाद ‘ अशी पदवी अत्यंत अभिमानाने मिरवीत असत. पुढे कदंबांची राजवट यादवांनी बुडविली. आणि नंतर यादवांची राजवट सुलतानांनी बुडविली. आधी विजापूरच्या आदिलशाहाच्या ताब्यात गोवा गेला. त्यांच्याकडून वास्को-द-गामा या पोर्तुगीज दर्यावदीर् सरदाराने दि. १५ फेबुवारी १५१० या दिवशी गोवा जिंकून घेतले. तेव्हापासून पोर्तुगीज सत्ता ही गोव्यात मूळ धरून बसली. या पोर्तुगीजांना धर्मवेड लागलेलं होतं. स्वधर्माचा म्हणजेच ख्रिश्चॅनिटीचा प्रचार करण्याचा त्यांना क्रूर छंद जडला होता. सत्ता स्थिरावल्यावर त्यांनी इ. १५६५ या वषीर् योजनापूर्वक गोमांतकातील साडेसहाशे मंदिरे फोडली. असंख्य लोक सक्तीने बाटविले. अनेकांनी आपापल्या देवमूतीर् मोठ्या धाडसाने लपतछपत पळविल्या आणि सध्याच्या फोंडेमहालात ठिकठिकाणी त्या स्थापिल्या. ज्येस्युईट ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदूंचा भयंकर धर्मछळ मांडला. यावर डॉ. ए. के. प्रिओळकर यांचा अभ्यासपूर्ण असा ग्रंथ आहे. गोवा इन्क्वीझिशन. या छळवादाला गोमांतकीय लोक थरथरा कापीत असत. हा छळवाद जेथे चाले त्याला म्हणत व्होडलेघर. म्हणजे यमाचे घर.

इ. स. १५६५ च्या या ज्येस्युईट कल्लोळात दिवाडीला असलेला हा सप्तकोटीश्वरही सापडला. फिरंग्यांनी सप्तकोटीश्वराचे मंदिर पाडून टाकले आणि या देवाची जास्तीत जास्त अवहेलना करण्याकरिता वा या देवात देव नाही हे दाखवून देण्याकरिता ते शिवलिंग शेताच्या बांधावर नेऊन ठेवले. त्यात हेतू असा की , जाणाऱ्या येणाऱ्यांचेही पाय त्या देवाला लागावेत. ही परिस्थिती इ. १६०५ पर्यंत या देवाची होती. ती १६०५ मध्ये साकळीच्या सूर्यराव देसाई यांच्या प्रयत्नाने थोडी पालटली आणि त्यावेळच्या गोव्याच्या गव्हर्नरने देसायांना नावेर् येथे जांभ्याच्या खडकांत लहानश्या कोनाड्यात हा देव नेऊन ठेवावयास परवानगी दिली.

खडकांत कोनाडा कोरून सप्तकोटीश्वराची स्थापना देवाच्या भक्तमहाजनांनी आणि देसाई यांनी केली. ती जागा आणि तो कोनाडा आजही अस्तित्त्वात आहे. या कोनाड्यासमोरच नारळीच्या झावळ्यांचा मांडव घालून देवाची अर्चना करण्याची रीत सुरू झाली. प्राचीन भव्य मंदिर गेले. उरले ते झोपडीसारखे देऊळ किंवा देवळासारखी झोपडी.

शिवाजीराजे नार्व्यास आले आणि त्यांनी आपला तळ या मंदिरानजिकच जंगलात ठोकला. ते स्वत:ही नित्यनैमित्तिक श्रींची अर्चना करीत होते. एकेदिवशी महाराज श्रींसमोर पुजेसाठी बसले. स्थानिक पुजारी पूजेचे मंत्र सांगत होता. एवढ्यात वाऱ्याची जरा मोठी फुंकर देवापुढच्या झावळ्यांच्या मांडवावर पडली.

त्यातील एक झावळी सटकन निखळली आणि पूजा करीत असलेल्या शिवाजीराजांच्या अंगावर पडली. बाकी झाले काहीच नाही पण देवाच्या अंगावरचे फूल सहज ओंजळीत पडावे तशी ही मांडवावरची झावळी राजांच्या अंगावर पडली. तेव्हा तो पुजारी राजांस म्हणाला , ‘ महाराज श्री सप्तकोटीश्वराने आपणांस प्रसाद दिला आणि आज्ञाही दिली की , आपण येथे श्रीचे मोठं कायमस्वरूपी मंदिर बांधावे. ‘

महाराजांच्या मनात सप्तकोटीश्वराचे मंदिर बांधण्याचे विचार घोळतही असतील इतकंच काय , पण अवघे गोमांतक भूमी स्वतंत्र करून सुंदर करावी हाही विचार त्यांच्या मनात होताच की! पण महाराजांनी पुजाऱ्याचा अन्वयार्थ आनंदाने मनावर घेतला आणि खरोखरच नजिकच जमीन साफ करून मंदिर बांधावयास राजांनी प्रारंभही केला.

क्षण उलटत होते. दिवस पालटत होते. राजांचे सैनिक रात्री अपरात्री चोरट्या पावलांनी आणि झाकल्या रूपांनी गोव्याच्या फिरंगी अमलात प्रवेश करीत होते. राजांनी मांडलेलं हे रणांगण खरोखर अत्यंत कल्पक आणि बिनतोड होतं. ते थोडक्यात असं , नार्व्याच्या उत्तरेकडून म्हणज्ेाच सिंधुदुर्ग , कुडाळ या दिशेने मराठी सैन्य पुढे सरकावे.

ऐन समुदातून दर्यासारंग , मायनाक व्यंटाजी भाटकर आदि आरमारी मराठ्यांनी संकेताच्या दिवशी समुदमार्गाने आगवादच्या किल्ल्यावर आणि जुन्या गोव्यावर आरमारी हल्ला चढवावा. सप्तकोटीश्वराच्या पश्चिमेस असलेल्या सह्यादीच्या माथ्यावरील भीमगड किल्ल्यावरूनही मराठी सैन्य असेच गोमांतकात उतरावे आणि प्रत्यक्षात स्वत:पाशी असलेल्या सैन्यानिशी महाराजांनी गोमांतकावर झेप घ्यावी. हे एकाच वेळी अचानक व्हावे. असा हा व्यूह महाराजांच्या मनात तरळत होता. पावले पडत होती.

पण घात झाला. आत घुसलेल्या मराठी सैनिकांचा पोर्तुगीज गव्हर्नराने अचूक वेध घेतला आणि एकेदिवशी त्याने हे सारे सैनिक , निदान सापडले तेवढे सैनिक कैद केले. आपला डाव फिरंग्याने अचूक ओळखून उघडा पाडल्याच्या खबरा महाराजांस नावेर् येथे समजल्या. त्यांना अतिशय राग आला आणि आपल्या लोकांच्यानिशी आणि व्यूहात ठरविलेल्या भोवतालच्या मराठी सैन्यानिशी गोव्यावर हल्ला करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. पण गव्हर्नरने आपल्या सर्व ठाण्यांची आणि किल्ल्यांची युद्धाच्या दृष्टीने जय्यत तयारी केली होती. किंबहुना ती करूनच नंतर त्याने घुसखोर मराठ्यांना पकडण्यासाठी जाळे टाकले होते.

महाराजांनाही हल्ला करता आलाच असता. परंतु एकदम छापा घालून गोवा जिंकण्याची करामत त्यात साधता आली नसती. चिवट फिरंग्यांशी दीर्घकाळ युद्ध चालू ठेवावे लागले असते. महाराजांनी खेदाने पण विचारपूर्वक निर्णय घेतला की , फिरंग्यांशी बिघाड करो नये. थांबावे.

तसा प्रत्यक्ष युद्धास आधी प्रारंभ झालेला नव्हताच. महाराज थांबले. फिरंग्यांनीही महाराजांवर आपण होऊन हल्ला न चढविता फक्त संरक्षणात्मक भूमिका घेतली. त्यामुळे युद्धप्रसंग घडलाच नाही. महाराजांनी फिरंग्यांशी मैत्रीचा तह केला. गोमांतकाच्या पूर्ण मुक्तीचा मुहूर्त दुदैर्वाने पुढे गेला. महाराज नार्व्याहून परतले. मंदिर मात्र बांधून पूर्ण झाले. मंदिरावरती महाराजांच्या नावाचा शिलालेख कोरला गेला.

होय. गोमांतकाच्या मुक्तीचा क्षण साधला गेला नाही. पण महाराजांच्या मनाचे संपूर्ण देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याचे भव्य स्वप्न इतिहासात नोंदविले गेले.

- बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel