इतिहासात गाजलेल्या जुन्या वाड्या राजवड्यांच्या, किल्लेकोटांच्या आणि शूर वा कूर , सज्जन वा दुर्जन , आदरणीय वा तिरस्करणीय अशा व्यक्तींच्या भोवती इतिहासाचं विश्वसनीय असं वलय असतंच. पण दंतकथांचं आणि आख्यायिकांचं असंही एक वर्तुळ असतंच. या साऱ्या आख्यायिका खऱ्याच असतात असं नाही किंवा खोट्याच असतात असंही नाही. पुरावा मिळेपर्यंत त्यांना सत्य इतिहासाच्या शेजारी बसविता येणार नाही. या कथांना नवलकथा असे नाव द्यावेसे वाटते. केवळ आपल्याकडेच नाही तर झाडून साऱ्या पाश्चात्य देशांसह जगात अशा नवलकथा लोकमानसावर कायमच्या शतकानुशतके चितारल्या गेल्या आहेत.
किल्ले रायगडावरही अशा नवलकथा चमकत आहेत. अशीच ही एक प्रख्यात नवलकथा.
आभाळाला भिडलेल्या अन् भुईवरही अस्ताव्यस्त पसरलेल्या रायगडाच्याभोवती झाडीझुडपांच्या दाटीत शेतकऱ्यांची बरीच गावं नांदत होती. मुलींनी सागर गोट्याचा डाव टाकावा अन् ते विखुरलेले स्वैर सागरगोटे जसे दिसावेत , तशी या गावातली लहानलहान खोपटी गडावरून आपल्याला दिसतात. त्यातलंच हे एक गाव , रायगडवाडी. उगीच वीस-बावीस गवती छपरांचं हे गाव. एखाददुसरं घर कौलारू. आजही याचं रूप पालटलेलं नाही.
नवरात्र संपली. रायगडावरचा दसराही नगाऱ्यासारखा दणाणला. शिलंगण झालं. महाराज छत्रपती शिवाजी महाराज मिरवणुकीने शिलंगणाहून परतले. दरबार झाला. मानपान झाले. खांद्याला खांदा भिडवून सरदार शिलेदार उराउरी भेटले. पुरणावरणाचा सण साजरा झाला.
चार दिवस उलटले. अन् गडाभोवतीच्या वाड्या-हुंड्यात गडाच्या गडकऱ्याचा एकेक स्वार शिपाई वाडीत येऊन गावकऱ्यांना गडावरचा निरोप सांगून गेला ‘ आयांनो , बायांनो , उद्या हाय पुनव. कोजागिरी. तवा गडावर महाराजांच्या राजवाड्यात संध्याकाळला दूध लागतंय हंडाहंडा , तरी समद्या आयाबायांनी जमल तेवढं दूध हंड्याभांड्यातून , दिस मावळायच्या आंत , गडावर वाड्यांत आणून घालावं. उशीर करू न्हाई. ‘
दुसरे दिवशी कोजागिरी पुनव उगवली. रायगडवाडीतल्या आयाबाया अन् लेकीसुना सुखावल्या. दूध घालायला गडावर जायचं. राजाराणीच्या हंड्यात दूध घालायचं. चार पावलं गडावरची शोभा बघायची अन् परतायचं. ठरलं.
जमला तेवढा टाकमटिकला करून गवळणी तयार झाल्या. कुणाच्या कानी बाळ्याबुगड्या तर कुणाच्या दंडात चांदीच्या येळा. दंडाचं का असना तरी नीटनेटकं लुगडं अन् चोळी , असल तर नाकात वाटोळी नथ तर कुणी काहीच नसल्यामुळे अंगभर माहेरी चालल्यासारखा आनंदच. लेवूनलपेटून तयार झाल्या. या गोकुळच्या गवळणी हसत बोलत चकचक घासलेले हंडे घेऊन निघाल्या. त्यांनी हिरा गवळणीला साद घातली. हिरा घरी एकटी. नवरा स्वारीवर गेलेला. बाकी कुणीच नाही. फक्त पाळण्यात सहा-सात महिन्याचं पोर , त्याला पदराखाली पाजून हिरा निघाली. ‘ आलो , आलो , आलो ‘ म्हणून हिरा पडसाद देत उठली. पेंगुळलेलं बाळ पाळण्यात झोपिवलं अन् गाडग्या मडक्यांनी भरलेल्या आपल्या संसाराला कडी घालून टचटच जोडवी वाजवीत , हंडा डोक्यावर घेऊन निघाली. म्हणत असेल , आलो वैन्सं. हसत बोलत रायगडवाडीतल्या या सगळ्या तरण्या राधा चालू लागल्या. थट्टा चेष्टांना दुधासारखा ऊत येत होता.
हिराच्या घरात कुणी माणूस नव्हतं. राजाराणीचा संसार. मांडीवर तान्हुलं. तिनं मनाशी हिशेब केला , की माझा बाळा आत्ताच पिवून झोपलाय. आता दिस मावळतो काही जागा व्हायाचा न्हाई. तवपावतर गडावर जाऊन , दूध घालून कवाच परत येऊ , पाळण्यातला राजा जागा व्हायच्या आत. अशा हिशेबानं हिरा निघाली. कुजबूज गोष्टीत अन् थट्टाचेष्टेत आयाबाया झपाझपा गड चढून गेल्या. महादरवाज्याशी आल्या. केवढा बया तो दरवाजा! वर झेंडा. भैरोबा , खंडोबासारखे धिप्पाड बाप्येगडी हाती भाले घिऊन गस्त घालत्याती. अशा दरवाजातून या गौळणी गडात गेल्या. गड कसा रामराजाच्या गावावाणी गजबजला होता. पालख्या मेणं अधूनमधून लगाबगा धावत होते. तलावावर दोन तीन हत्ती सोंडेनं पाणी उडवीत होते. गंगातळ्याला वळसा घालून या सगळ्या राधा गौळणी लगाबगा चालल्या होत्या. वाड्यात आल्या. केवढा बया त्यो सौपाकाचा रांधवडा! याला मुदपाकखाना म्हणत्यात.
साऱ्या जणींनी राजवाड्यात दूध घातलं. हंडेकळशा रिकाम्या केल्या अन् कारकुनानं एकेकीला हातावर दुधाचे पैसे दिले. रिकाम्या चुंबळीवर अन् कमरेवर रिकामे हंडे अन् घागरी घेऊन गौळणी सगळीकडे टकामका पाहात राजवाड्यातून बाहेर पडल्या. सूर्यदेव डुंबायला घडीभर वेळ होता. दोन पैसे जास्तच मिळाले या आनंदात साऱ्याजणी सुखावल्या मनानं परतत होत्या. हसताबोलताना नथांचे झुबके हलत होते. एकटी हिरा एका खडकावर उभी राहून दोन्ही हातानं रिकामा हंडा गुडघ्यावर धरून समोर दिसणारं अल्याडपल्याडचं गडाचं रूप बघत होती. ती पहिल्यांदाच गडावर आली होती , लगीन झाल्यापासून , नवऱ्याच्या तोंडी गडाचं रूप तिनं ऐकलं होतं. पण पाहिलं नव्हतं. ती पाहण्यात रमली होती. सूर्य डुंबत होता. तिला मैतरणींनी सांगितलं होतं की , ‘ हिरे , गडाचं दरवाजं दिस मावळताच तोफ वाजली की कड्याकुलपं घालून बंद होत्यात गं! ध्यान ठिव! ‘
साऱ्याजणी निघून गेल्या. हिरा रिकामा हंडा घेऊन उभी होती , ती मंतरल्यासारखी बाजारपेठेकडे झपाझपाझपा चालत निघाली. केवढी बाजारपेठ! लखलख माल झगमगत होता. साड्या काय , चिरगुटं काय , हंडे भांडी काय , चांदीचं गोठ तोंड काय , येळा काय , वाळं काय! आता सांगू तरी किती असं वाटत होतं , सगळा बाजार हंड्यात घालावा अन् घरी दादल्यासोनुल्यासाठी घरला न्यावा. पुनवेचा दिस. गोंधळी पोत पेटवून संबळ झांजा वाजवीत पेठेतून चालले होते. कडकलक्षीम्या आसूड कडाडीत दान मागत होत्या. कुणी बहुरुपी सोंग घेऊन फिरत होता. तर मधूनच कोणाचा पालखीमेणा ‘ पैसपैस ‘ करीत गदीर्तून झपाझपा जात होता. हिरा भान विसरली होती.
अन् तेवढ्यात झाणकन तोफेचा आवाज कडाडला. हिरा एकदम भानावर आली. तिला एकदम आठवलं , की तोफेसरशी गडाचं दरवाजं बंद व्हत्यात.
आता ? आता ? आता ? तिच्या तोंडून घाबरलेला अन् कळवळलेला शब्द उमटला. ‘ आई! आये!
तिला स्वत:तलीच आई आठवली होती. अन् घरचा पोराचा पाळणा दिसू लागला होता.
- बाबासाहेब पुरंदरे