नाशिक प्रांताच्या उत्तर भागात हे साल्हेर आणि मुल्हेर किल्ले आहेत. आपल्याला एक नवलाची गोष्ट सांगतो. साल्हेर , मुल्हेर आणि बागलाण हा डोंगरी प्रदेश मोहिते घराण्याच्या सत्तेखाली इ. स. १६३० पर्यंत पूर्णपणे सार्वभौम स्वातंत्र्यात होता. बाकी सारा प्रदेश बहमनी , फरुकशाही आणि मोगल सुलतानांच्या ताब्यात गेला होता. सह्यादीच्या रांगेतील , विशेषत: कोकण बाजूचा काही काही भाग शत्रूला झटकन कधीच मिळाला नाही. तेथील असह्य शौर्य असलेले मराठे शत्रूशी झुंजतच राहिले. जवळजवळ , अल्लाउद्दीन खलजीच्या नंतर दीडशे वषेर् हा भाग झुंजत झुंजत ‘ स्वराज्य ‘ करीत होता. नंतर वेळोवेळी ही राज्ये सुलतानांच्या कब्जात गेली. पण बागलाणचे मोहिते शहाजहानपर्यंत स्वातंत्र्य टिकवून होते. अखेर शहाजहानने बागलाण घेतला.
इथे लक्षात येते सह्यादीची ताकद. इथल्या माणसांची कणखर मने आणि मनगटे. सह्यादीच्या आश्रयाने राक्षसी शत्रूच्या विरुद्धही शतकशतक झुंजता येते आणि राज्य टिकविता येते हे यातून लक्षात येते. हेच सह्यादीचे वर्म शिवाजीराजांनी ओळखले. हे वर्म पुढच्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध लढताना पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरंजामदार सरदारांच्या लक्षात आले नाही. आपल्याच भूगोलाचे महत्त्व किती मोठे आहे हे जर समजले नाही , तर काय होते याचे नमुने हिमालयाच्या , हिंदुकुश पर्वताच्या , विंध्याचलाच्या , अरवलीच्या आणि सह्यादीच्याही प्रदेशात दिसून आलेच की! मग आमच्यातलेही थोर राष्ट्रपुरुष सहज बोलून जातात की , अमक्या प्रदेशाला कसले महत्त्व आहे , तेथे गवताची काडीही उगवत नाही. अन् मग घडतो तो पराभवाचा इतिहास.
शिवाजी महाराजांनी आपल्या भूगोलाचे महत्त्व नेमके ओळखले. आपल्या इतिहासाचे सार्मथ्य आणि आमच्याच घातपातांनी घडलेले दुदैर्वी पराभव महाराजांनी असेच नेमके ओळखले आणि स्वराज्याची संपूर्ण उभारणी सह्यादीच्या आश्रयाने त्यांनी केली. शिवकालीन स्वराज्याचा नकाशा आपण पाहिला , तर महाराजांनी सह्यादीच्या आश्रयाने राज्यविस्तार दक्षिणोत्तर मुख्यत: केलेला दिसेल. ते तेथेच थांबणार नव्हते. संपूर्ण महाराष्ट्र , किंबहुना संपूर्ण भारतवर्षच जिंकून घेण्याचं स्वप्न ते पाहात होते. पण प्रारंभी त्यांनी डोके टेकले सह्यादीच्या पावलांवर. अन् निशाण लावले सह्यादीच्या शिखरावर. मृत्युनेच महाराजांना थांबविले. नाहीतर स्वराज्याच्या सीमा त्यांच्या हयातीत चंबळ ओलांडून यमुनेपर्यंत तरी खास पोहोचल्या असत्या.
तर सांगत होतो बागलाणची महती. साल्हेर , मुल्हेर स्वराज्यात दाखल झाले. या विजयाच्या बातम्या रायगडावर आल्या. साल्हेर म्हणजे विजयी पानपतच ठरले. लाखासव्वालाखांच्या मोगली फौजा उघड्या मैदानावर समोरासमोर झुंजून मराठ्यांनी उधळून लावल्या. या विजयाला तोड नाही. आस्मानी फत्ते जहाली. दिलेरखानासारखा अफगाणी सिपहसालार परास्त जाहला. ही गोष्ट असामान्य झाली. सिंहगडावर सुरू झालेली मोहीम साल्हेर गडापर्यंत विजयाचा झेंडा घेऊन फत्ते पावली. महाराज बहुत प्रसन्न जाहले.
महाराज रायगडावर आपल्या काही महत्त्वाच्या सौंगड्यांबरोबर बोलत बसले होते. सुदैवाने या त्यांच्या बैठकीची तारीखही सापडली आहे. हा दिवस होता ६ जानेवारी १६७२ . नाशिक प्रांतातील विजयाच्या आनंददायी बातम्या आलेल्या होत्या. महाराज सुखावले होते. स्वराज्याचे सुख , प्रजेचे कल्याण आणि स्वराज्याकरिता दिलेल्या लढायांत विजय मिळणे यातच महाराजांचे स्वत:चे सुख साठवलेले असायचे. नाशिककडच्या बातम्या विजयाच्या होत्या. आता युद्ध म्हटल्यानंतर त्याच्या जोडीला दु:खाचे आघातही सोसावेच लागतात. सूर्याजी काकडे याच्यासारखा योद्धा मारला गेला हे अपार दु:खच होते. पण उपाय काय ? हा युद्धधर्मच आहे. एका डोळ्याने हसायचे आणि हजार डोळ्यांनी रडायचे. दु:ख झाकून ठेवायचे आणि सहकाऱ्यांपुढे नव्या महत्त्वाकांक्षा मांडायच्या. याही वेळी महाराज आपल्यासमोर बसलेल्या सौंगड्यांना म्हणाले , ‘ तुंगभदेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गडकोट कब्जा झाले. दौलत वाढली. परंतु एक सल मनात राहिलाय. माझा पन्हाळगड अद्यापपावेतो मिळाला नाही. पन्हाळा म्हणजे दख्खनचा दरवाजाच. आपल्याला पन्हाळगड पाहिजे. पन्हाळ्याचा दुरावा जीवी सोसवत नाही. ‘
खरोखर पन्हाळ्याकरिता महाराज रोज दोन घास उपाशीच राहात असावेत , असा हा दुरावा होता. तेरा वर्षांपूवीर् (दि. २२ सप्टें. १६६० ) पन्हाळा विजापूरच्या आदिलशाहास तहात देऊन टाकावा लागला. तो परत मिळावा याकरिता महाराज तळमळत होते. पण संधी मिळत नव्हती. योग जुळत नव्हता. आग्ऱ्यास जाण्याच्या पूवीर् दि. १६ जाने. १६६६ या दिवशी महाराजांनी सुमारे तीन हजार सैन्यानिशी मध्यरात्री पन्हाळ्यावर छापा चढविला. पण बेत फसला. महाराजांचा छापा पन्हाळ्याच्या शाही किल्लेदाराने उधळून लावला. सुमारे एक हजार मराठी माना पन्हाळ्याच्या चार दरवाज्यावर तुटून पडल्या. पराभव झाला. महाराजांना माघार घ्यावी लागली. उरल्या सैन्यानिशी निरुपायाने ते विशाळगडाकडे दौडत सुटले. त्यांना या पराभवाचे सल वमीर् सलत राहिले. दु:खाचे अश्रु त्यांच्या काळजातून गळत होते. तेरा वषेर् वनवासात वणवणणाऱ्या दौपदीप्रमाणे महाराज बेचैन होते.
आज तेरा वर्षांनंतर महाराजांची मनातली ऊमीर् अचानक उसळून आली. समोरच्या खेळगड्यांशी बोलता बोलता ते पटकन बोलून गेले , ‘ कोण घेतो पन्हाळा ? कोण ? कोण ?
हा अचानक पडलेला सवाल समोरच्या साऱ्याच शिलेदारांनी छातीवर झेलला. पुढे बसलेल्यातील मोत्याजी मामा खळेकर म्हणाले , महाराज , मला सांगा. मी घेतो पन्हाळा. अन् असे शब्द प्रत्येकाच्याच तोंडून बाहेर पडले. त्यात होते गणोजी , अण्णाजी दत्तो , आणखीन कुणी कुणी. अन् एक मर्दानी मनगटाचा मराठा गडी. म्यानातून तलवार सपकन् बाहेर पडावी , तसा जबाब त्याच्या तोंडून बाहेर पडला. अन् तो म्हणाला , ‘ महाराज , म्या घेतो पन्हाळा. माझ्यावर सोपवा. आत्ताच निघतो. पन्हाळा घेतलाच समजा. ‘
या आशयाचे बोलणे सहज बसलेल्या बैठकीत निघाले अन् जागच्याजागी आपोआपच अग्निहोत्र शिलगांव , पेटावं अन् फुलावं तसा मराठी अग्नी पेटला. या समशेरीच्या पात्याचं नाव होतं कोंडाजी फर्जंद.
घरासंसाराचे , तहानभूकेचे , हजार अडचणींचे अन् दहा हजार गुंतवळ्याचे साऱ्या साऱ्या आकाराविकाराचे मनातले विचार पाचोळ्यासारखे साऱ्यांच्याच मनातून उडून गेले आणि एकच विचार मनांत बारुदासारखा ठिणगी पडून भडकला. पन्हाळा , पन्हाळा , पन्हाळा!
-बाबासाहेब पुरंदरे