काशीहून गागाभट्ट नासिकला आले. महाराजांनी त्यांना आणण्याकरिता पालखी पाठविली. दरबारातील चार थोर मंडळी सामोरी पाठविली. सन्मानपूर्वक त्यांना रायगडावर आणण्यात आले. महाराजांनी मधुपर्कपूर्वक या महापंडिताचे गडावर स्वागत केले. त्यांचा मुक्काम गडावर होता. प्रवासात आणि गडावर गागाभट्टांना स्वराज्याचे रूप स्पष्ट दिसत होते. महाराजांनी आपल्या असंख्य कर्तबगार , शूर , निष्ठावंत आणि त्यागी जीवलगांच्या सहकार्याने निर्माण केलेले एक सार्वभौम राष्ट्र जाणत्या मनाला स्पष्ट दिसत होते.

या हिंदवी स्वराज्यात अनेक क्रांतीकारक घटना घडल्या होत्या , घडत होत्या. तेहरानपासून काबूलपर्यंत आणि खैबरपासून दिल्लीपर्यंत मराठी स्वराज्याचा दरारा सुलतानांना हादरे देत होता. दक्षिणेतील पातशाह्या निष्प्रभ झाल्या होत्या. इंग्रज , फिरंगी अन् सिद्दी आपले प्राण कसे वाचवायचे , याच चिंतेने ग्रस्त , पण दक्ष होते. अत्यंत शिस्तबद्ध अधिकारीवर्ग आणि राजकारणी मुत्सद्दी राज्यकर्तव्यात तत्पर होते. यादव , कदंब , शिलाहार , विजयनगर , वारंगळ , द्वारसमुद यांच्या उज्ज्वल परंपरेत आज रायगड आणि महाराज शिवाजीराजे निविर्वाद शोभत होते.

मग उणीव कशात होती ? कशातच नव्हती. फक्त एका अलंकाराची उणीव होती. तो अलंकार म्हणजे राजसिंहासन. छत्रचामरांकित राजसिंहास न. त्या सिंहासनाची स्वराज्याला नितांत गरज होती. कारण त्याशिवाय सार्वभौम चक्रवतीर् राज्याचा मान आणि स्थान जगातील आणि स्वदेशातीलही लोक देत नव्हते. देणार नव्हते. हा केवळ संस्कार होता. पण त्याची जगाच्या व्यवहारात अत्यंत मोठी किंमत होती. राज्याभिषेक हा उपभोग नव्हता. ते राष्ट्रीय कर्तव्य होते. जोपर्यंत सिंहासनावर राज्याभिषेक होत नाही , तोपर्यंत जग या थोर सूर्यपराक्रमी मी पुण्यश्ाोक महामानवाला ‘ राज्यकर्ता ‘ समजणार होते , पण ‘ भूपतिराजा ‘ म्हणणार नव्हते.

एक आठवण सांगतो. महाराज औरंगजेबाला भेटायला आग्ऱ्यास जाण्यास निघाले. ( दि. ५ मार्च १६६६ ) त्यावेळी स्वराज्यातील एक नागरिक महाराजांना भेटावयास राजगडावर आला. त्याचे नाव नरसिंहभट्ट चाकालेकर. हा कुणी महापंडित , अभ्यासक , विचारवंत , दष्टा , समाजधुरीण नव्हता. होता तो एक सामान्य भिक्षुक. पण तरीही त्यावेळच्या एकूण संपूर्ण समाजात शिक्षणाच्या दृष्टीने दोनच पावलं का होईना , पण थोडा पुढे होता ना! तो महाराजांना एक विनंती करावयास आला होता. विनंती कोणती ? तो म्हणतोय , ‘ महाराज , माझ्या जमीनजुमल्याचे आणि घरादाराचे सरकारमान्यतेची , तुमच्या शिक्कामोर्तबीचे कागदपत्र माझ्यापाशी आहेतच. पण आपण आता औरंगजेब बादशाहास भेटावयास जात आहात , तरी माझ्या या जमीनजुमल्यास औरंगजेब बादशाहाच्याही मान्यतेची संदापत्रे आपण येताना घेऊन या. ‘ हा त्याच्या म्हणण्याचा आशय.

काय म्हणावे या प्रकाराला ? कपाळाला हात लावून रडावे ? स्वराज्यात राहणारा , जरासा का होईना पण शहाणपण मिरविणारा एक वेदमूतीर् औरंगजेबाच्या मान्यतेचे कागदपत्र आणायला महाराजांनाच विनवतोय. त्याला महाराजांचा हा स्वराज्यनिमिर्तीचा प्रकल्प समजलाच नाही ? बाजी पासलकर , बाजीप्रभू , मुरारबाजी इत्यादी वीरपुरुष कशाकरता मेले , जळत जळत पराक्रम गाजविणारे मावळे कशाकरता लढताहेत अन् मरताहेत हे त्याला समजलेच नाही ?

नाहीच समजलं त्याला ? अन् असे न समजणारे अंजान जीव नेहमीच जगात असतात. त्यांना सार्वभौमत्त्व , स्वराज्याचे महत्त्व , स्वातंत्र्याचे अभिमानी जीवन अन् त्याकरिता आपलेही काही कर्तव्य असते , हे दर्शनानी अन् प्रदर्शनाने शिकवावे लागते. आम्ही जन्मजात देशभक्त नाहीच. आम्ही जन्मजात गुलामच. यातून बाहेर काढण्याकरिता त्या शिवाजीराजाने महाप्रकल्प मांडला. तो साऱ्या जगाला अन् आमच्याही देशाला समजावून सांगण्याकरिता , नेमका अर्थ त्याचा पटवून देण्याकरिता एका राजसंस्काराचे दर्शन आणि प्रदर्शन घडविणे नितांत आवश्यक होते , ते उपभोग म्हणून नव्हे , तर कर्तव्य म्हणून आवश्यक होते. ते म्हणजे सार्वभौम , छत्रचामरांकित सुवर्ण सिंहासनावर आरोहण. म्हणजेच राज्याभिषेक.

पण केवळ कर्तव्यातच अर्ध्यदान करण्यासाठी उभ्या असलेल्या त्या महान योगी शिवाजीराजांना सिंहासन , छत्रचामरे , राज्याभिषेक इत्यादी गोष्टींची अभिलाषा तर नव्हतीच , कधीच नव्हती. पण त्यांना त्याची आठवणही होत नव्हती. हा राजा शिबी राजाचा वारस होता. तो जनकाचा वारस होता. तो रघुराजाचा वारस होता. हे सारं अभ्यासपूर्वक , मनन आणि चिंतनपूर्वक समजावून घेण्याची बौद्धिक ऐपत आमच्यापाशी असायची आवश्यकता होती आणि आहे. कोणा बादशाहाने आम्हाला त्याच्या सेवेसाठी एखादी पदवी दिली , तर त्या पदवीचा आम्हाला अभिमान वाटावा ? पण अशी पदवीधर मंडळी बादशाही जगात त्यावेळी नांदत होती. ही मंडळी महाराजांच्या बाबतीत म्हणत होती , ‘ राजे आम्ही पातशाहाने आम्हास किताब दिले. मानमरातब दिले. ‘ अशा जगाला एकच उत्तर देणे आवश्यक होते. ते म्हणजे राज्याभिषेक.

या राज्याभिषेकाची विचारसरणी कोणाही विचारवंताला सहज पटण्यासारखी होती. महाराजांनाही ती तत्त्वत: नक्कीच पटलेली होती. पण राज्याभिषेकातील तो गौरव , ती प्रशस्ती , तो मोठेपणा महाराजांच्या मनाला रुचतच नव्हता. ते हिंदवी स्वराज्याचे उपभोगशून्य स्वामी होते. पण स्वत: जीवन जगत होते. हिंदवी स्वराज्याचे एक साधे पण कठोर सेवाव्रती प्रजानन म्हणून. ते सविनय नम्र स्वराज्यसेवक होते. पण नरसिंहभट्ट चाकालेकरासारखी काही विचित्र , विक्षिप्त अन् अविवेकी उदाहरणे त्यांनी अनुभविली होती.

अखेर कर्तव्य म्हणूनच महाराजांनी राज्याभिषेकाला आणि सोहळ्याला , कठोर मनाने मान्यता दिली. राज्याभिषेक ठरला!

-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel