महाराष्ट्राच्या इतिहासात दोन हजार वर्षांपूवीर् शालिवाहन कुळात गौतमी या नावाची एक प्रभावशाली ‘ आई ‘ होऊन गेली. सातकणीर् शालिवाहन हा तिचा पूत्र. पैठणचा सम्राट. तो स्वत:ला अभिमानाने अन् कृतज्ञतेने म्हणवून घेत असे ‘ गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहन ‘. नाशिक आणि पुणे परगण्यांत असलेल्या लेण्यांमधील शिलालेखांत या मायलेकांचे उल्लेख सापडतात. त्या महान राजमातेनंतर महाराष्ट्राला महान राजमाता आणि लोकमाता लाभली ती जिजाऊसाहेबांच्या रूपाने.

जिजाऊसाहेबांच्या बद्दलची कागदपत्रे त्या मानाने थोडीफारच गवसली आहेत. पण साधार तर्काने व परिस्थितीजन्य पुराव्यांनी हे चरित्र आपल्या मन:पटलावर उत्तम ‘ फोकस ‘ होते. इ. १६ 3 ० ते 33 पर्यंतचे शिवाजीराजांचे शिशुपण त्यातून डोळ्यापुढे येते. नंतर राजांचे बालपणही अधिक स्पष्ट होत जाते. त्यांच्या बालपणच्या खेळांचे आणि खेळण्यांचे सापडलेले उल्लेख मामिर्क आहेत. त्यातील एक उल्लेख असा आहे की , आपल्या सौंगड्यांच्याबरोबर शिवाजीराजे लढाईचे खेळ खेळताहेत. या लुटुपुटीच्या लढाईत मातीच्या ढिगाऱ्यांचे किल्ले करून ते जिंकण्याची राजे आणि त्यांचे चिमणे सैनिक शर्थ करताहेत. अन् राजे म्हणताहेत , ‘ हे किल्ले आपले. आपण येथे राज्य करू. ‘ इथं राजांचे पाय पाळण्यात दिसतात. अन् राजमातेचे महत्त्वाकांक्षी मन त्या पाळण्याच्या झोक्यांप्रमाणेच घोडदौड करताना दिसते.

आपल्याकडे एक लोकांचा लाडका विषय अजूनही सतत चचेर्त चवीने चघळताना दिसतो. तो म्हणजे शिवाजीमहाराज अशिक्षितच काय पण पूर्ण निरक्षर होते! त्यांना साधी सहीसुद्धा करता येत नव्हती. स्वत:च्या वर्तमानकालीन अडाणीपणाचे समर्थन शिवाजीमहाराजांचा आधार घेऊन तर आम्ही करत नाही ना ? वास्तविक महाराज निरक्षर होते. त्यांना सहीसुद्धा करता येत नव्हती हा आरोपच पूर्ण खोटा आहे. हा आरोप ग्रँट डफ यांच्यापासून डॉ. यदुनाथ सरकारांपर्यंत अनेक इतिहासकारांनी केला आहे. महाराजांवर निरक्षरतेचा आरोप करणे म्हणजे राजमातेवरच , मुलाच्या बाबतीत निष्काळजी राहिल्याचा आरोप करणे आहे. तो खोटा आहे. आता तर महाराजांच्या हस्ताक्षारांनी लेखनसीमा केलेली किती तरी पत्रे मिळाली आहेत. त्यांच्या विद्येचे इतरही अनेक पुरावे सापडले आहेत. त्यावर एक स्वतंत्र प्रकरणच लिहिता येईल. अविद्येने मति जाते , मति विना गती जाते , गतिविना सर्वस्व जाते हे राजमातेच्या आणि पुढे महाराजांच्या मनात किती खोलवर रुजले होते , हे अभ्यासकांच्या लक्षात येते. शिवाजी महाराजांची सर्वांगीण अतिसुंदर आणि कर्तबगार अशी घडण जिजाऊसाहेबांनीच केली.

शिवाजीमहाराज जे काही शिकले ते अंतर्मुख होऊन विचारांनी शिकले. त्यांच्या विचारात विवेक होता. अंत:चक्षूंनी ते गगनालाही ठेंगणे करून टाकतील अशा भावना , अशी स्वप्ने , अशा आकांक्षा ते पाहात होते. नंतर कृतीत आणत होते. पूर्ण व्यवहारी दृष्टीने वागत होते. मागच्या पिढ्यांत घडलेल्या घटनांचा खोलवर विचार करीत होते. त्यातून शिकत होते. प्रत्येक गोष्ट स्वत: अनुभव घेऊनच शिकायची असं ठरविलं तर माणसाला मार्कंडेयाचं आयुष्यही पुरणार नाही. ते शिकण्याकरताच इतिहासाचा अभ्यास आवश्यक असतो. इतिहास म्हणजे साक्षात अनुभव.

म्हणूनच आज (इ. स. २००५ अन् पुढेही) आम्ही इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. असे केल्याने काय होईल ? असे केल्याने आमच्या राष्ट्रीय आकांक्षा , सामाजिक आकांक्षा अन् व्यक्तिगत आकांक्षाही गगनाला ठेंगणे करून सूर्यमंडळही भेदून जातील. म्हणून शिवचरित्र! अन् म्हणूनच महारुद हनुमानाचाही अभ्यास. नारळ फोडण्याकरता नव्हे , शंभरापैकी पस्तीस मार्क मिळवून पास होण्यासाठीही नव्हे , तर कलेच्या आणि शास्त्रांच्या अंगोपांगात. सूर्यबिंब गाठण्याइतकी झेप घेण्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी. टागोर , विवेकानंद , रामन , डॉ. भाभा , राजा रविवर्मा , योद्धा अब्दुल हमीद , अन् आजही आपल्या पुढे साक्षात तळपत असलेले राष्ट्रपती अब्दुल कलाम अर्मत्य सेन , रविशंकर , भारतरत्न लता मंगेशकर , डॉ. विजय भटकर , शिल्पकार सदाशिव साठे अशी कर्तृत्त्वाचे शतसूर्य शोधिताना शतआतीर् धन्य होत आहेतच ना!

जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांची चरित्रे मिळून एकच महान महाभारत आपल्यापुढे उभे आहे.

जिजाऊसाहेबांच्या चरित्रात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. पाहा पटते का. शिवाजीराजांना त्यांनी पाळण्यापासून सिंहासनापर्यंत घडविलं. हाती छिन्नी- हातोडा घेतला तो प्रखर बुद्धिचा अन् सुसंस्काराचा , राजसंस्काराचा , स्वत: राजांना बोटाशी धरून राजांच्या सोळाव्या सतराव्या वयापर्यंत त्यांनी राज्यकारभाराचे अन् राजरणनीतीचे मार्ग हारविले. स्वत: न्याय आणि राज्यकारभार केला. नंतर आपण स्वत: राजव्यवहारातून अलगद पावले टाकीत त्या बाजूला होत गेल्या. राजांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. अन् राजांच्या अनुपस्थितीत , विशेषत: आग्ऱ्याच्या भयंकर संकट काळात , स्वराज्याचा संपूर्ण राज्यकारभार स्वत: पाहिला. अगदी चोख.

कुठेही काहीही कमी न पडू देता. अन् नंतर संपूर्ण प्रसन्न मनाने आणि समाधानाने त्यांनी राज्यकारभारातून निवृत्ती घेतली. पाहा आपण : इ. स. १६७० पासून पुढे याच क्रमाने जिजाऊसाहेबांचे जीवनचरित घडत गेले की नाही ? गोष्टी सांगेन युक्तिच्या चार हीच भूमिका त्यांची दिसून येते. मोह , लोभ , उपभोग , सत्तेची हाव इत्यादी विषारी पदार्थांचा त्यांनी स्वत:ला कधी स्पर्शही होऊ दिला नाही. त्यांच्या तेजाचे वलय हे हिंदवी स्वराज्याच्या मागे शेवटपर्यंत फिरत मात्र राहिले. कवी जयराम पिंड्ये यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे खरोखर जिजाऊसाहेबांचे जीवन कादंबिनिवत् जगजीवनदान हेतूनेच भरून राहिले होते. त्यांच्या जीवनाला रंगच द्यायचा असेल , तर तो भगवा रंगच द्यावा लागेल.

सत्ता , संपत्ती , तारुण्य , सौंदर्य आणि आयुष्य याचा कुणी मोह धरू नये. हे सारं वा यातील काही प्राप्त झाले तर त्याचा योग्य तो उपयोग करावा. ते आज असते , उद्या संपते. शिल्लक राहतो तो त्याचा ‘ कसा उपयोग केला ‘ तो इतिहास.

- बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel