औरंगजेब दिल्लीत गेली तीन वर्षे जरी मराठी मुलुखाच्या बाबतीत शांत होता , तरी त्याच्या अचाट बुद्धीत सतत वेगवेगळे फासे पडतच होते. महाराज न मरता आग्र्याहून निसटले आणि आपल्या चिरेबंदी सह्यप्रदेशात पोहोचले. या गोष्टीचा त्याला राहून राहून उबग येत होता. निसटून गेलेला सीवा केवळ शांततेचा तह कुरवाळीत आपल्या घरट्यात बसला आहे. एवढ्यावर औरंगजेबाचे समाधान नव्हते. विश्वासही नव्हता. हा सीवा आज ना उद्या संधी साधून मोगलाईवर झडप घेणार हे तो ओळखून होता. औरंगजेबानेच तह मोडीची कुऱ्हाड स्वत: घालावयाचे ठरविले आणि त्याने जंजिऱ्याच्या सिद्दीच्या मदतीसाठी आपले मोगली आरमार सीवावर सोडले. लगेच त्याने अजीमला म्हणजे औरंगाबादमध्ये असलेल्या आपल्या चिरंजीवांना एक गुप्त हजबल हुक्म म्हणजे तातडीचा हुकूम पाठविला की , ‘ औरंगाबादेत असलेल्या सीवाच्या सेनापतीला (प्रतापराव गुजर) त्याच्या कारभाऱ्याला (निराजी रावजी) आणि इतर प्रमुख मराठ्यांना ताबडतोब एकदम छापा घालून कैद करा आणि दिल्लीला त्यांना बंदोबस्तात आमच्याकडे पाठवा. सीवाच्या मराठ्यांची औरंगाबादेत असलेली छावणी मारून काढा आणि त्यातील लूट खजिन्यात जमा करा. सीवा आग्ऱ्यास आला त्यावेळी त्याला वाटखर्चासाठी जी एक लाख रुपयांची रक्कम आपण दिली आहे , ती या छावणीच्या लुटीतून जमा होईल. हुक्मकी तामील जल्द अज् जल्द हो जाए! ‘

हा तो भयंकर औरंगजेबी ज्वालामुखीचा स्फोट या हुकुमात भरलेला होता. म्हणजे औरंगजेबाने अगदी उघडउघड महाराजांच्या विरुद्ध आघाडी उघडली. तह मोडला.

खरं म्हणजे हा तह मोडण्यासाठी महाराजही उत्सुकच होते. ते संधीची वाट पाहात होते. ती संधी औरंगजेबानेच दिली. इथं एक मोगली शहाजाद्यांच्या स्वभावातील गंमत दिसली. अजीमला आपल्या बापाचा तो हजबल हुक्म अजून मिळायचाच होता. तो वाट दौड करीत होता. पण त्या हुकुमाचा तपशील अजीमला आधीच औरंगाबादेत कळला तो आपल्या गुप्त हस्तकांकडून. बापाचा स्वभाव माहित असल्यामुळे अजीमला आश्चर्य वाटले नसावे. पण त्याने अत्यंत तातडीने , गुपचूप मराठ्यांच्या छावणीतून प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी यांना आपल्या सफेर् एखास म्हणजे खास वास्तव्याचा वाडा बोलावून घेतले. ते दोघे आले आणि अजीमने त्यांना म्हटले , ‘ मला बादशाहा अब्बाजान यांचेकडून असा हुकुम येतो आहे. ‘ अजीमने येणारा भयंकर आलमगिरी हुकूम त्या दोघांना सांगितला. आपल्याविरुद्ध येत असलेला एवढा भयंकर हुकूम प्रत्यक्ष औरंगजेबाचा पुत्रच प्रतापराव आणि निराजी यांना सांगत होता. केवढा चमत्कार. अन् अजीमने या मराठी सरदारांना लगेच म्हटले की , ‘ तुम्ही तुमच्या सैन्यासह आणि छावणीसह ताबडतोब पसार व्हा. नाहीतर तेवढ्यात वडिलांचा हुकूम मला मिळाला , तर मला तुमच्याकरिता काहीच करता येणार नाही. हुकुमाची अंमलबजावणी करावीच लागले. ‘

यावर प्रतापराव काय बोलले ते इतिहासाला माहित नाही. पण निराजीसह ते अजीमचा निरोप घेऊन ताबडतोब आपल्या छावणीत आले.

काही वेळातच प्रतापराव , निराजी आणि पाच हजार मराठी स्वारांची छावणी पाखरासारखी पसार झाली. मराठी छावणी एकदम अशी भुर्रकन का उडून गेली हे औरंगाबादेत कोणालाच कळले नाही. कळले होते फक्त अजीमला.

याच सुमारास जंजिऱ्याला घातलेला मराठी आरमाराचा वेढा महाराजांनी हुकूम पाठवून उठविला. जंजिऱ्याभोवतीच्या समुदात असलेली मराठी गलबते भराभरा निघून गेली. मुरुडच्या आसपास असलेली मराठी फौजही निघून गेली.

या प्रकाराने सिद्दींना काय वाटले असेल कोण जाणे! पण जंजिऱ्याचा गळफास आत्तातरी सुटला. जीव वाचला.

या जंजिऱ्याच्या किल्ल्याचे नाव होते , ‘ जंजिरेमेहरुब ‘ मेहरुब म्हणजे अष्टमीची चंदकोर. सिद्द्यांच्या या अर्धचंदाचे बळ असे टिकले.

तिकडे औरंगाबादेहून पसार झालेले पाच हजार स्वार थेट महाराजांकडे आले नाहीत. प्रतापराव आणि निराजीपंत यांनी तिसराच डाव टाकला. पाच हजार फौज घेऊन ते जे सुटले , ते थेट औशाच्या किल्ल्यावर. हा किल्ला मोगलांच्या म्हणजेच औरंगजेबाच्या ताब्यात होता. हा किल्ला तुळजापूरच्या जवळ आहे. किल्ला जबरदस्त. येथे किल्लेदार होता शेर बहाद्दूर जंग. त्याला स्वप्नातही कल्पना नव्हती की , मराठ्यांची फौज आपल्या किल्ल्यावर झडप घालणार आहे. तो बेसावधच होता. शिवाजी राजांपासून इतक्या दूर अंतरावर असलेल्या आपल्या औसा किल्ल्यावर मराठी कसे येणे शक्य आहे ? शिवाय आत्ता तर बादशाहांचा सीवाशी मैत्रीचा तह चालू आहे. पण बादशाहानेच या तहावर कुऱ्हाड घातल्याचे शेर बहाद्दूर जगला कुठे माहित होते ? मराठ्यांची धडक इतक्या वेगाने आणि आवेगाने किल्ल्यावर आली की , किल्ल्यात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला. वास्तविक असे व्हायचे काहीही कारण नव्हते. एवढा बळकट तटबंदीचा किल्ला सहज झुंजू शकला असता. पण त्यांची हिम्मतच बारगळली. मराठी फौज किल्ल्यात घुसली. वीस लाख रुपयाचा रोख खजिना प्रतापरावांच्या हातात पडला. कदाचित इतरही काही लूट आणि हा खजाना घेऊन मराठी फौज प्रतापरावांच्या मागोमाग किल्ल्यातून बाहेर पडली आणि दौडत सुटली थेट महाराजांकडे. ‘ आग्रा प्रवासाचा खर्च रुपये एक लाख मराठ्यांच्या छावणीच्या लुटीतून खजिन्यात जमा करा ‘, असा हुकूम सोडणाऱ्या औरंगजेबाला मराठ्यांनी आपले एकूण एकवीस लाख रुपये पळविल्याचे आता कळणार होते.

- बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel