रायगडावर राज्यभिषेकाची तयारी अत्यंत योजनाबद्ध आणि शिस्तबद्ध रीतीने सुरू होती. गागाभट्ट हे महापंडित राज्यभिषेक विधीचे प्रमुख अध्वर्यू होते. पण राजघराण्याचे धामिर्क विधीसंस्कार करण्याचे काम भोसल्यांचे कुलोपाध्याय आणि राजोपाध्याय आवीर्कर यांचेच होते. सर्व विधी या बाळंभट्ट राजोपाध्याय यांनीच उपाध्याय या नात्याने केले. मार्गदर्शक होते , गागाभट्ट. गागाभट्टांनी या सर्व राजसंस्कारांची एक लिखित संहिता संस्कृतमध्ये गंथरूपाने तयार केली. या गंथाचे नाव ‘ राजाभिषेक प्रयोग. ‘

या ‘ राजाभिषेक प्रयोग ‘ या हस्तलिखित गंथाची एक प्रत बिकानेरच्या ( राजस्थान) अनुप संस्कृत गंथालयात पाहावयास मिळाली. हीच प्रत प्रत्यक्ष गागाभट्टांच्या हातची मूळ प्रत असावी , असा तर्क आहे. प्रत्येक विधी कसा आणि केव्हा करावयाचा याचा तो तपशीलवार आराखडा आहे.

सुपारीपासून हत्तीपर्यंत आणि हळकुंडापासून होमकुंडापर्यंत , तसेच दर्भासनापासून सिंहासनापर्यंत सर्व गोष्टी दक्षतापूर्वक सिद्ध होत होत्या. ती ती कामे त्या त्या अधिकारी व्यक्तींवर सोपविण्यात आली होती. सोन्याचे बत्तीस मण वजनाचे सिंहासन तयार करण्याचे काम पोलादपूरच्या (जि. रायगड) रामाजी दत्तो चित्रे या अत्यंत विश्वासू जामदाराकडे सोपविले होते. जामदार म्हणजे सोने चांदी आणि जडजवाहीर याचा खजिना सांभाळणारा अधिकारी. अत्यंत मौल्यवान अगणित नवरत्ने सिंहासनावर जडवून , अनेक सांस्कृतिक शुभचिन्हेही त्यावर कोरावयाची होती. सोन्याची इतर राजचिन्हेही तयार होऊ लागली.

चारही दिशांना राजगडावरून माणसे रवाना झाली. सप्तगंगांची आणि पूर्व , पश्चिम आणि दक्षिण समुदांची उदके आणण्यासाठी कलश घेऊन माणसे मागीर् लागली होती. हे पाणी कशाकरता ? रायगडावर काय पाण्याला तोटा होता ? अन् सप्तगंगांचं उदक आणि रायगडावरचं तळ्यातील पाणी काय वेगळं होतं ? शेवटी सारं ।।२ह्र च ना ? मग इतक्या लांबलांबच्या नद्यांचं पाणी आणण्याचा खटाटोप कशासाठी ? अशासाठी की , हा देवदेवतांचा आणि ऋषीमुनींचा प्राचीनतम भारतदेश एक आहे. या सर्व गंगा आमच्या माता आहेत. प्रातिनिधिक रूपाने त्या रायगडावर येऊन आपल्या सुपुत्राला अभिषेक करणार आहेत , हा त्यातील मंगलतम आणि राष्ट्रीय अर्थ.

विख्यात तीर्थक्षेत्रांतील देवदेवतांनाही निमंत्रणपत्रे जाणार होती. ती गेली. विजापूर , गोवळकोंड , मुंबईकर इंग्रज , जंजिरेकर सिद्दी , गोवेकर फिरंगी आणि औरंगजेब यांना निमंत्रण गेली असतील का ? रिवाजाप्रमाणे गेलीच असतील असे वाटते. पण एका इंग्रजाशिवाय आणि एका डच वकिलाशिवाय या राज्याभिषेकाला अन्य कुणाचे प्रतिनिधी वा पत्रे आल्याचा एकही पुरावा अद्याप मिळालेला नाही. पण निमंत्रणे गेलीच असतील. इंग्रजांचा वकील हेन्री ऑग्झिंडेन आणि वेंगुलेर्कर डच वखारींचा प्रतिनिधी इलियड हे राज्यभिषेकास हजरच होते.

पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त आणि बडवे असलेले प्रल्हाद शिवाजी बडवेपाटील यांनाही एक पत्र गेले होते. ते पत्र या बडवे घराण्यात जपून ठेवलेले होते. पण त्यांच्या वंशजांनी ते पत्र एका इतिहास संशोधकास अभ्यासासाठी विश्वासाने दिले ते पत्र गहाळ झाले. काय बोलावे ?

अभिषेकाकरिता सोन्याचे , चांदीचे , तांब्याचे आणि मृत्तिकेचे अनेक कलश तयार करण्यात आले. ते शतछिदान्वित होते. म्हणजे शंभर शंभर छिदे असलेले होते. पंचामृत आणि गंगोदके यांनी या कलशातून महाराजांवर अभिषेक व्हावयाचा होता. प्राचीनतम भारतीय संस्कृतीचा , परंपरेचा आणि अस्मितेचा आविष्कार साक्षात डोळ्यांनी पाहण्याचे आणि कानांनी ऐकण्याचे भाग्य स्वराज्याला साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर रायगडावर लाभणार होते. विद्वानांना आणि कलावंतांना राज्याभिषेकाच्या राजसभेत शूर सरदारांच्या इतकेच मानाचे स्थान होते. गाणारे , नाचणारे , वाद्ये वाजविणारे कलाकार याकरिता गडावर आले आणि येत होते. स्वत्त्वाचा आविष्कार प्रकट करणाऱ्या अनेक गोष्टी यानिमित्ताने रायगडावर चालू होत्या. छत्रपतींच्या नावाची सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडली जात होती. रघुनाथपंडित अमात्य आणि धुंडिराज व्यास या विद्वानांना राज्यव्यवहार कोश म्हणजेच राज्यव्यवहारात आपल्याच भाषेत शब्द देऊन त्याची एक प्रकारे ‘ डिक्शनरी ‘ तयार करण्याचे काम सांगितले होते. इ. १९४७ मध्ये आपण स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान पं. नेहरू यांनीही डॉ. रघुवीरसिंग या पंडितांना पदनामकोश म्हणजेच भारतीय शब्दात राज्यव्यवहाराची डिक्शनरी तयार करण्याचे काम सांगितले आणि त्यांनी केले , हे आपणास माहीतच आहे. शिवकालीन राज्यव्यवहार कोशातील हे शब्द पाहा. मुजुमदार हा फासीर् शब्द त्याला प्रतिशब्द दिला अमात्य , सुरनीसाला म्हटले पंतसचिव. सरनौबताला म्हटले सरसेनापती , इत्यादी.

राजमुदा होती तीच ठेवली. ‘ प्रतिपश्चंदलेखेव… ‘ या वेळी एक नवीन राजमुदा तयार करण्यात आली होती ; मात्र ती कधीही पुढे वापरली गेली नाही.

या निमित्ताने राजसभा आणि अन्य जरूर ती बांधकामे हिराजी इंदुलकर यांनी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सिद्ध केली. राजदुंदुभीगृह म्हणजे नगारखाना , भव्य आणि सुंदर उभा राहिला. आजही तो उभा आहे.

अनेक राजचिन्हे सिद्ध झाली. सोन्याच्या सुंदर दंडावर तराजू , सोन्याचा मासा , ध्वज , नक्षत्रमाळा , अश्वपुच्छ , राजदंड , अब्दागिऱ्या , मोचेर्ले , चवऱ्या , पंखे , कलमदान , सोन्याचे हातापायातील तोडे , जडावाचे कमरपट्टे इत्यादींचा जिन्नसखाना तयार झाला. यातील सोन्याचा मासा लावलेल्या राजचिन्हाला म्हणत माहीमरातब. स्वराज्याची सत्ता समुदावरही आहे याचे हे प्रतीकचिन्ह. या सर्व चिन्हांत मुख्य होते राजसिंहासन. ते उत्कृष्ट प्रकारे रामाजी दत्तो चित्रे यांनी कुशल सोनारांकडून तयार करवून घेतले होते. त्याला दोन सिंह होते. चार पाय होते. एक चरणासन होते. सिंहासनावर आठ सुबक खांबांची मेघडंबरी होती. छत्रपतीपदाचे मुख्य चिन्ह म्हणजे छत्र. तेही सुवर्णदंडाचे आणि झालरदार कनातीचे होते.

यानिमित्ताने एक नवे बिरुद म्हणजे पदवी महाराजांनी धारण केली. ती म्हणजे क्षत्रिय कुलावतांस. राजाची पदवी ही राष्ट्राचीच पदवी असते. हे हिंदवी स्वराज्याच क्षत्रिय कुलावतांस आहे हाच याचा आशय होता. चाणक्याचे वेळी नंद राजघराणे पूर्णपणे संपले. त्यातूनच एक विक्षिप्त कल्पना रूढ झाली , की भारतात आता कुणीही क्षत्रिय उरला नाही. उरले फक्त त्रैवणिर्क. ही कल्पना जितकी चुकीची होती , तितकीच राष्ट्रघातकीही होती. महाराजांनी आवर्जून ही क्षत्रिय कुलावतांस पदवी स्वीकारली ती , एवढ्याकरता की , हे राष्ट्र क्षत्रियांच्या तेजामुळे अजिंक्य आहे. किंबहुना या राष्ट्रातील प्रत्येकजण राष्ट्रासाठी शस्त्रधारी सैनिकच आहे. एका अर्वाचीन विद्वानाने या आशयाची दोन ओळीची कविता लिहिली.

स्वातंत्र्येण स्वधमेर्ण नित्यं शस्त्रच्छ जीवनम्
राष्ट्रभ्भवनोन्मुखताचा सौ महाराष्ट्रस्य संस्कृती:।

-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel