इतिहासाचा , विशेषत: शिवकालाचा अभ्यास करताना मराठी योद्ध्यांची चकित करणारी बहाद्दुरी प्रथम डोळ्यापुढे येते. मुत्सद्दी बुद्धिवंतांची ऊटपटांग चातुर्यवती प्रतिभा आपल्याला चक्रावून टाकते. विद्वानांची बुद्धिवंत लेखनशैली आपल्याला हलवून जागे करते. शाहिरांची ललकारी आपल्याला शहारून टाकते. पण किल्ल्यांची बांधकामे , अतिअवघड ठिकाणी केलेली मोठ्या दरवाजांची वा सांदिसापटीत बेमालूम केलेली चोरवाटांची रचना पाहून तुमच्याआमच्या मनातले आश्चर्यही थक्क होते.

टनावारी वजनांचे दगडी चिरे या कामगारांनी घडविले तरी कसे अन् पाचपाच पुरुष उंचीवर नेऊन ओळंब्यात जडविले तरी कसे हे समजत नाही. मणावारी वजनांच्या मोठमोठ्या तुळ्या आणि फळ्या अखंड मापात दारा झरोक्यांना या सुतारांनी कशा फिट्ट बसविल्या असतील ? अशा अवजड कामात स्वराज्यातले कामगार मजूर , बेलदार , पाथरवट , गवंडी सुतार , लोहार इत्यादी मंडळी अतिशय कष्टाळू , काटक आणि तरबेज होती. तेवढीच ती अंतर्मनातून कल्पक , अभिमानी आणि निष्ठावंत होती.

हे किल्ल्यांवरील अवघड काम करीत असतांना अनेकदा अपघातही होत आणि या कामगारांना प्राणाची किंमत मोजावी लागे. अनेकजण जायबंदीही होत. या सर्वच अज्ञात कामगारांशी महाराज अत्यंत मायेने कृतज्ञ असत. आज आपणही आपल्या आजच्या हिंदवी स्वराज्यात निरनिराळे राष्ट्रीय प्रकल्प साकार करीत आलो आहोत. कोयनेचे धरण म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली कामधेनूच आहे. हे धरण बांधताना कितीतरी कामगार कायमचे जायबंदी झाले आणि सुमारे चाळीस कामगार काम करताकरता झालेल्या अपघातात ठार झाले. या सर्वांची नावे कोयनेच्या बांधकामात एका शांत आणि एकांत जागी शिलालेखात कोरून ठेवली आहेत. आम्ही शाळा कॉलेजातील तरुण सहलीला कोयनेच्या धरणावर जातो.

या कार्यांगणी प्राण अर्पण केलेल्या या शूर धाडसी कामगारवीरांची तुम्हा आम्हाला आठवण होते का ? आम्ही त्या जलाशयाची रम्य गंमत आणि आनंद मनसोक्त लुटावा. तेथे गावं , नाचावं , खेळावं पण या कार्यांगणी पडलेल्या वा घायाळ झालेल्या कामगारवीरांना साष्टांग दंडवत घालण्यास विसरू नये. आज तुमच्या आमच्या कारखान्यांत आणि घरात कोयनेची वीज प्रकाशतीय , ती त्यांच्यामुळे. कारगिलच्या रणांगणावरील वीरांइतकेच याही वीरांचे मोल स्वगीर्य आणि अविस्मरणीय आहे.

अन् मग आता समजेल , की आज तीनतीनशे चारचारशे वर्षांहूनही वयोवृद्ध झालेल्या शिवकालीन गडकोटांची आणि त्यांच्या अज्ञात कामगारांची महत्ता किती थोर आहे , वंदनीय आहे , पूजनीय आहे. या गडकोटांवर वेडेवाकडे माकडचाळे कधीच करणार नाही. आमची नावे गावे त्यावर लिहून ठेवणार नाही. त्या चिऱ्यांचा आणि त्याच्या कामगार हिऱ्यांचा आम्ही मुजरा करून , दंडवत घालून आदरच करू. पूवीर् औरंगजेबासारख्या कर्दनकाळाशी टक्कर देत हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे हे तट आणि बुरुज केविलवाणे होऊन बसले आहेत.

तुम्हाआम्हा तरुणांची झुंड वेडीवाकडी , घाणेरडी गाणी गात येताना पाहून हे तटकोट अन् बुरुज मनातून भयभीत होऊन , असहाय्य नजरेने आपल्याकडे बघताहेत. अन् म्हणत आहेत , ‘ बाळांनो , नका रे आम्हा म्हाताऱ्यांची अशी टवाळी अन् मानहानी करू. ‘ अरे , एके काळी त्या थोरल्या राजानं आमच्या कडेखांद्यावर मायेने हात फिरविला. कुठं आम्हाला जखम झाली असली तर त्यानं ती चुन्यानं. अन् कुठं कुठं तर शिश्यानं बुजवली. आता तुम्ही आमच्याकरता काही केलं नाही तरी चालेल. पण आम्हाला तुमची नावं लिहून अन् आमचे चिरे खिळाखेळे करीत वरून ढकलून घायाळ करू नका. गुटखे खाऊन आमच्या अंगाखांद्यावर अन् तोंडावर थंुकू नका. सिगरेटी अन् ब्राऊनशुगर फुंकून थोटकं आमच्या अंगावर टाकू नका. पाया पडतो , देवा तुमच्या.

अन् खरंच नाही का हे ? एके काळी शिवाजीराजांच्या जिवलग कामगारांनी बांधलेल्या आणि जपलेल्या या तटाकोटांची अवहेलना आम्हीच करतो आहोत. वास्तविक हे तटकोट म्हणजे त्या शूर कामगारांची खडी स्मारके आहेत. आम्ही तरुणांनी या तटाकोटांवर ऑईल पेंटांनी आपली नावे लिहिण्याऐवजी ती , सूयोर्दयापासून सूर्यास्तापर्यंत पसरलेल्या विशाल आकाशात स्वराज्याचे वैमानिक बनून , पराक्रम करून नक्षत्रताऱ्यांच्या अक्षरांनी लिहिली पाहिजेत.

शिवकालीन कामगारांचे धैर्य कितीतरी वेळा दिसून आलेले आहे. कांसा बेटावरील पद्मदुर्ग बांधताना आणि खांदेरी बेटावरील तट बांधताना जंजिरेकर हबश्यांच्या आणि मुंबईकर इंग्रजांच्या तोफाबंदुकांना न जुमानता , न घाबरता कोकणच्या कामगारांनी हे दोन किल्ले उभे केले. ते मेले पण मरेपर्यंत बांधकाम करीत राहिले. अशीच मोलाची कामगिरी गलबतांचे बांधकाम करणाऱ्या कामगारांनी अन् लोहार सुतारांनी केली.

या साऱ्या बांधकामात कामगारांनी कुठे कुठे गणपती , मारुती , कालभैरव , भवानी , खंडोबा या देवदेवतांच्या मूतीर् कोरलेल्या आढळतात , तर कुठे सुसरी , मगरी आणि घोरपडी यांच्याही आकृती कोरलेल्या दिसतात. या त्यांच्या हौशी शिल्पकलेत त्यांचे लढाऊ मन व्यक्त होते.

एकदा मला एका (इ. १९६१ ) वषीर् भिईचा पोलादाचा आपला राष्ट्रीय कारखाना पाहण्याचा योग आला. सर्वत्र लोखंड दिसत होते. तेथे काम करीत असलेल्या माझ्या एका इंजिनीयर मित्राला मी विचारले ‘ हा कारखाना रशियन इंजिनीयर्सनी भारतासाठी उभारला , आता तो आपलीच सर्व यंत्रज्ञ , तंत्रज्ञ आणि कामगार मंडळी चालवीत आहेत. आपले हे सगळे कामगार अन् जाणकार लोक कसं काय काम करीत आहेत ?’

त्यावर त्या माझ्या मित्राने , काहीच शब्दात न बोलता अवतीभवती सर्वत्र पडलेल्या लोखंडी साहित्याकडे बोट फिरवीत माझे लक्ष वेधले. या लोखंडी वस्तूंवर खडूने असंख्य ठिकाणी लिहिले होते , ‘ रघुपति राघव राजाराम

जितना पैसा उतना काम. ‘

नव्याने नुकताच कारखाना सुरू झाला होता. पगारवाढीच्या मागणीसाठी आंदोलनेही सुरू झाली होती.

रघुपति राघव राजाराम , जितना पैसा उतना काम.

माझ्या मनाला कामगारांची मागणी उमजली , समजली पण त्याचबरोबर मनात आलं , की इथंच काय पण अवघ्या देशात आम्ही जितना पैसा उतना काम करतोच का ? तेवढं केलं तरी रघुपति राघव रामासाठी सेतू बांधणाऱ्या वानरांचं मोल आणि महत्त्व आम्हाला लाभेल.

-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel