अखेर महाराजांनी रामसिंहाच्या विनवण्या करकरून जमानत अर्ज रद्द करवून घेण्याचे रामसिंहाकडून मान्य करून घेतले. रामसिंह औरंगजेबास भेटला. ‘ आता शिवाजीराजांची सर्व जबाबदारी फुलादखान पाहत आहेतच. फौजाही आहे. शिवाय राजांची प्रकृती अगदी ठीक नाही , तरी मला या जामीनकीतून आपण मुक्त करावे. ‘ ही रामसिंगची मागणी बादशाहाला फायद्याचीच वाटली. त्याचे लक्ष होते फिदाईच्या हवेलीकडे. बादशाहाने स्वत:च्या हाताने रमसिंहाची जमानत फाडून टाकली. रामसिंहला हायसे वाटले.

शिवाजीराजांना त्याहूनही हायहायसे वाटले. खरं म्हणजे महाराज प्रेमाच्या महाकठोर बंधनातून सुटले. अत्यंत अवघड अशी ही त्यांची पहिली सुटका.

महाराजांनी आता वेळोवेळी बादशाहाकडे अर्जी करून आग्रह केला की , ‘ मी आता इथेच कायमचा राहणार आहे. पण माझ्या बरोबरच्या लोकांना परत घरी जायला आपण परवानापत्रे द्यावीत. मला त्यांची आता येथे गरज नाही. गरजेपुरती मोजकी नोकर माणसे फक्त ठेवून घेतो. ‘

हेही बादशाहाला सहजच पटले. उलट आवडले. महाराजांची माणसे परवानापत्रे घेऊन ‘ कैदेतून ‘ बाहेर पडली आणि योजलेल्या ठिकाणी योजनेप्रमाणेच आग्रा परिसरात भूमिगत राहिली. ही परवाना घेऊन सुटलेली माणसे अतिशय सावध दक्षतेने आपापली कामे करीत होती. त्यात एक कुंभार सैनिक होता. त्याला आग्ऱ्यापासून काही अंतरावर निर्जन माळावरती कुंभाराची भट्टी पेटवून अहोरात्र राहावयास सांगितले होते. हा कुंभार तरुण कोणच्या गावचा होता ? त्याचे नाव काय होते ? वय काय होते ? इतिहासाला काहीही माहिती नाही. सांगितलेलं काम चोख करायचं एवढंच त्याला माहिती होतं. ही माणसे प्रसिद्धीच्या मागे नव्हतीच. ती सिद्धीच्या मागे होती. आपण करतो आहोत ते देवाचं काम आहे याच भावनेनं ही माणसे काम करीत होती. भट्टी पेटवून बसणं , एकट्यानं बसणं , निर्जन अनोळखी माळावर भुतासारखं बसणं सोपं होतं का ? तो काय खात होता ? कोण आणून देत होतं ? काहीही माहिती मिळत नाही. महाराज सुटून येतील , ते आपल्या पेटत्या भट्टीच्या खुणेवर येतील म्हणून ही भट्टी सतत पेटती ठेवण्याचं काम हा करीत होता. त्याचं अहोरात्र लक्ष महाराजांच्या येण्याकडे लागलेलं असायचं. किती साधी माणसं ही! कुणी कुंभार , कुणी न्हावी , कुणी महार , कुणी भटजी , कुणी रामोशी. पण याच सामान्य मराठ्यांनी असामान्य मराठी स्वराज्य निर्माण केलं. त्यांना कोणती पदवी द्यायची ? पद्मभूषण , पद्मश्री , पद्मविभूषण ? यांना पदवी एकच मराठा! असा एकेक मराठा तेतुका महाराजांनी मिळविला.

औरंगजेब लक्ष ठेवून होता फिदाईच्या हवेलीवर. अन् एकेदिवशी (बहुदा तो दिवस दि. १७ ऑगस्ट , शुक्रवार , १६६६ हाच असावा) औरंगजेबाने या पूर्ण झालेल्या हवेलीत शिवाजीराजांना अर्थात संभाजीराजांसह , नेऊन ठेवायचे ते उद्याच म्हणजे दि. १८ ऑगस्ट , शनिवार , सकाळी १६६६ यादिवशी हा त्याचा बेत अगदी गुप्त होता. त्याचे आयुष्यातले सर्वात मोठे राजकारण यांत भरलेले होते. दक्षिणेतील एक भयंकर शत्रू कायमचा संपणार होता. आता त्याला रामसिंहाचे वा इतर कोणाही रजपुताचे भय वाटत नव्हते. त्या हवेलीत महाराजांना कडेकोट बंदोबस्तात ठेवून सावकाशीने संपविण्याची त्याची योजना होती.

केवढा भयंकर आणि भीषण दिवस होता हा! महाराष्ट्राचे आनंदवनभुवन करण्याचे हजारो मराठी तरुणांचे स्वगीर्य स्वप्न चिरडले जाणार की गोवर्धन पर्वताप्रमाणे आकाशात उचलले जाणार हे या दिवशी ठरणार होते. मराठी संतांचे आणि कोवळ्या संतांनांचे आशीर्वाद सफल होणार की , औरंगजेबी वणव्यात जळून जाणार हे विधात्यालाही समजत नव्हतं. ज्ञानेशांचं पसायदान आणि श्रीनामदेवांची , ‘ आकल्प औक्ष लाभो तया… ‘ ही कळवळून केलेली आर्जवणी औरंगजेबासारख्या जल्लादाच्या कर्वतीखाली चिरफाळून जाणार याचा अंदाजही हिंदवी स्वराज्याच्या कुंडलीतील नवग्रहांना येत नव्हता. मराठ्यांचा हा कृष्ण तुरुंगाच्या काटेरी गजांतून सुखरूप यमुनापार होणार तरी कसा ? होणारा ? अशक्य. अशक्य. आजपर्यंत औरंगजेबाच्या मगरमुखातून कुणीसुद्धा सुटलेलं नाही. महाराज कसे सुटणार ? महाराजांना या उद्याच्या मरणाची आणि औरंगजेबाच्या आजच्याच रात्रीच्या काळोखात रंगणारी स्वप्न कशी समजणार ? काय , घडणार तरी काय ?

पण आग्ऱ्यात आपल्या अदृश्य डोळ्यांनी आणि अतिसूक्ष्म कानांनी वावरणाऱ्या महराजांच्या गुप्तहेरांनी ही महाराजांच्यावर पडू पाहणारी मृत्युची फुंकर अचूक पकडली. निश्चित पकडली. औरंगजेबाचा उद्याचा , म्हणजे शनिवार दि. १८ ऑगस्ट १६६६ , सकाळचा बेत मराठी गुप्तहेरांनी अचूक हेरला. वकीलांनी नक्कीच अचूक अंदाजला. औरंगजेबाचा डाव गुप्त होता. तरीही तो तितक्याच गुप्तरितीने हेरांनी हेरला. नेमका कसा ? नेमका कुणीकुणी ? हे सारंच इतिहासात गुप्त आहे. पण महाराजांना ही भयंकर खबर समजली. आता जे काही करायला हवं ते एका निमिषाचाही उशीर न करता , तातडीने , आजच्या आज , अंधारात करायला हवं , नाहीतर कायमचा अंधार. केवढा भीषण दिवस होता हा! दि. १७ ऑगस्ट १६६६ , शुक्रवार , श्रावण वद्य द्वादशी. उद्याची सकाळ कशी उगवणार ? मृत्युच्या उंबरठ्यावर की उगवत्या केशरी सूर्याच्या क्षितिजावर ?

महाराज सावधच होते. आता जे काही करायचं ते इतक्या तातडीनं अन् इतक्या काळजीपूर्वक की , यमालाच काय पण औरंगजेबालाही कळता कामा नये.

महाराज कोणचंही दुखणं झालेलं नसतानासुद्धा अतिशय आजारी होते. डाव्या डोळ्याची पापणीसुद्धा लवत नव्हती , तरीही भयंकर आजारी होते. अनेकांचं राजकीय आजारपण आम्ही नेहमीच पाहत आलेलो आहोत. पण महाराजांचे हे आग्ऱ्याच्या कैदेतील आजारपण अति राजकारणी होतं. आत्ता काय होणार ? रात्री काय होणार ? उद्या सकाळी ? नंतर ? काय , काय , काय ? विधाताच जाणे. नव्हे , दिल्लीत संचार करणारी गुप्त भुतंच जाणत होती. तीही सचिंत आणि थरथरत्या , धडधडत्या काळजाने.

चारच दिवसांपूर्वी म्हणजेच दि. १ 3 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी होऊन गेली होती.

- बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel