आपल्या नऊ वर्षाच्या युवराज संभाजीराजांना बरोबर घेऊन दि. ५ मार्च १६६६ या दिवशी शिवाजीराजांनी राजगडावरून आग्ऱ्यास जाण्यासाठी गडाबाहेर पाऊल टाकले. त्यांचेबरोबर फक्त तीनशे सैनिक होते. मिर्झाराजांनी आपला एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर दिला. त्याचे नाव तेजसिंह कछवा. औरंगजेबाचाही एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर देण्यात आलेला होता. त्याचे नाव गाझीबेग तवझुक. महाराजांच्या वाटखर्चासाठी औरंगजेबाने एक लाख रुपये मंजूर केले होते. टी. ए.! डी. ए.!

महाराज आपल्या म्हणजेच मराठी स्वराज्याच्या प्रतिष्ठेबाबत फार दक्ष होते. औरंगाबादेस एक घटना घडली. ती पाहा. महाराज औरंगाबादेस पोहोचले. येथील शाही सुभेदार सबशिकन खान हा रिवाजाप्रमाणे महाराजांस शहराच्या वेशीवरच स्वागतासाठी सामोरा यावयास हवा होता. पण या खानाने महाराजांच्या स्वागतास स्वत: न जाता आपल्या पुतण्यास पाठविले. खानाच्या मनातील विचार असा की , हा सीवा सामान्य दर्जाचा एक जमीनदार आहे. त्याच्या स्वागतास माझ्यासारख्या ज्येष्ठ मोगल सुभेदाराने काय म्हणून जायचे ?

सबशिकनखानाने महाराजांना असा निरोप पाठविला की , ‘ तुम्ही माझ्या निवासस्थानी दिवाणखान्यात येऊन मला भेटा. ‘

महाराजांना राग आला. ते खानाच्या भेटीस गेले नाहीतच. ते सरळ औरंगाबादेतून बाहेर पडले. महाराजांनी सबशिकनला कवडीचीही किंमत दिली नाही. ही चपराक खानाला बसली. तो घाबरलाच. कारण आपल्या वागण्याचा वृत्तांत बादशाहांस कळला तर ? कळणारच. मग मात्र आपली धडगत राहणार नाही. बादशाहांच्या राजकारणास आपल्या या उर्मट वर्तनामुळे बाधा येईल. बादशाह संतापतील. म्हणून तो घाबरला. तो नजराणे घेऊन महाराजांच्या भेटीस दिल्ली दरवाजाबाहेर व्याकूळ होऊन आला. त्याने चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आर्जवपूर्वक त्याने महाराजांना आपल्याकडे मुक्कामास चलण्यास विनविले. महाराजांनीही मग फार न ताणता त्याच्या हवेलीस फक्त भेटीसाठी जाण्याचे ठरविले. मुक्कामास नाही. जर महाराजांनी याहून कडक धोरण स्वीकारले असते , तर ? आग्रा दौऱ्याच्या प्रारंभीच हा खटका उडाला असता. व्यत्ययच आला असता. अन् सबशिकनखानाचेही फार मोठे नुकसान झाले असते. दिली एवढी चपराक पुरे आहे असे ठरवून महाराज खानाच्या फक्त भेटीस दुसऱ्या दिवशी जाऊन आले. प्रकरण मिटले. पण त्यातून महाराजांचे दर्शनही घडून गेले. गाझीबेग तवझुक आणि तेजसिंह कछवा यांनाही , काय समजायचे ते समजून चुकले. ते अधिक दक्ष झाले.

महाराजांचा हा सगळा आग्रा प्रवास मोगली सत्तेखालच्या मुलुखातून चालला होता. गेल्या पाचशे वर्षांत (१२ वे १७ वे शतक) हा मुलुख कधीही स्वतंत्र झालाच नव्हता. स्वातंत्र्याकरिता कधीही बंडच झाले नव्हते. गुलामगिरी सोसता सोसता ती अंगवळणी पडली होती.

महाराज राजगडावरून निघण्यापूवीर्च औरंगजेब दिल्लीहून आग्ऱ्यास आला होता. कारण त्याचा बाप शहाजहान आग्ऱ्याच्या किल्ल्यात दि. २२ जानेवारी १६६६ या दिवशी मरण पावला. औरंगजेबानेच आपल्या वडिलांना काळजीपूर्वक कैदेत ठेवले होते. आधीची आठ वषेर् तो या कैदेत मरणाची वाट पाहात होता. ते पावले. औरंगजेब दि. २५ जाने. रोजी आईबापांच्या कबरीच्या दर्शनास ताजमहालमध्ये गेला. दर्शन घेतले.

आता तो वाट पाहात होता सीवाच्या दर्शनाची. अगदी खरं सांगायचं तर या सीवाचा कसा कसा पाणउतारा करायचा अन् त्याला कसं ठार मारायचं याचाच तो विचार करीत नव्हता का ? अनेक पुराण्यांनी आणि त्याच्या स्वत:च्याच डायरीतील नोंदींनी हे खरं ठरत नाही का ?

शिवाजीराजे आणि बादशाह औरंगजेब या दोन व्यक्तिरेखा किती विलक्षण भिन्न आहेत.

महाराजांच्या प्रवासातील बातम्यांनी औरंगजेबास सतत कळत होते की , शिवाजीराजे कसे कसे आपल्या जवळ येत आहेत! यावषीर् त्याचा पन्नासावा वाढदिवस आग्ऱ्याच्या दिवाणे आममधल्या शाही दरबारात साजरा होणार होता. त्याच दरबारात शिवाजीराजे हजर व्हावेत अशी त्याची इच्छा होती. हजारो दरबारी उपस्थितांच्या देखत तो आजपर्यंत बेलगाम बंडखोरासारखा वागलेला सीवा मरहट्टा कसा आदबीने मुजरे करीत येतो ते त्याला जनतेला दाखवायचे होते आणि महाराजांनाही मोगल साम्राज्याचा तळपता दिमाख दाखवायचा होता. क्षणाक्षणाने तो क्षण जवळ येत होता. महाराजांनी चंबळ नदी ओलांडली होती. नरवर या ठिकाणी महाराज पोहोचले दि. ९ मे १६६६ या दिवशी. दि. १२ मे १६६६ या दिवशी बादशाहाची पन्नासावी सालगिरा होती.

शिवाजीराजांची सर्व व्यवस्था संपर्क मध्यस्त म्हणून कुँवर रामसिंग याच्यावर बादशाहाने सोपविली होती. त्याच्या मदतीस मुखलीसखान या नावाचा सरदार देण्यात आला होता. शिवाजीराजांचे आग्ऱ्यास भरदरबारात येणे सर्वांना उत्सुकतेचे होते. पण काही शाही रिश्तेदारांना अजिबात पसंद नव्हते. औरंगजेबाची बहीण जहाँआरा बेगम ही तर संतप्तच झालेली होती. तिने भावाला म्हणजे बादशाहाला अनेकदा अनेक प्रकारे या भेटीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. पण औरंगजेबाने हे बायकी सल्ले कधीच ऐकले नाहीत. कारण त्याला पाहायचे होते , शिवाजीराजांचे तख्तापुढे झुकलेले मस्तक. अन् नंतर पाहायचे होते तुटलेले मस्तक. शिवाजीराजे आणि औरंगजेब या दोन प्रचंड महत्त्वाकांक्षा होत्या. या आग्रा प्रकरणांत या दोन्हींचे ही दर्शन घडले. अराऊंड बॉम्बे या आपल्या पुस्तकात इ. १८८५ मध्ये डग्लसने लिहिले आहे की , या आग्रा प्रकरणाचे वर्णन करायला वॉल्टर स्कॉटच हवा. he would have been worked up the subject with all his bost of heraldry and pump in power in to glowing colours.

- बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel