अफझलखानची स्वारी तशीच शाहिस्तेखानाची आणि सिद्दी जौहरचीही स्वारी अशा स्वाऱ्या अफाट बळानिशी शत्रूपक्षांनी स्वराज्यावर केल्या की , स्वराज्य शिवाजीराजांच्या आणि जागृत झालेल्या मराठी जनतेच्या सकट पूर्ण नेस्तनाबूत करावे असा निर्धारच होता , पण तो कमीतकमी बळ असूनही शिवाजीराजांनी पूर्ण उधळून लावला. साडेतीनशे वषेर् मरगळून गुलामगिरीत पडलेल्या मराठ्यांनी हा चमत्कार कसा काय घडवून आणला ? हा चमत्कार महाराष्ट्र धर्म नावाच्या एका अद्भूत तत्त्वज्ञानाने घडवून आणला. ही गोष्ट शिवशत्रूंना ओळखता आली नाही.

आत्ताही मिर्झाराजा आणि दिलेरखान यांच्या स्वारीचा प्रारंभ मिर्झाराजांनी लक्षचंडी होमाने आणि कोटी लिंगार्चन व्रताने केला. अफझलखानाने तुळजाभवनीवर घाव घालताना काढलेले उद्गार इतिहासाला ज्ञात आहेत. त्याने देवीला सवाल केला होता म्हणे की , ‘ बताओ तेरी करामत! बताओ तेरी अजमत! ‘ करामत म्हणजे पराक्रम आणि अजमत म्हणजे चमत्कार. या दोन्हीचाही प्रत्यय अफझलखानाला आला. त्याचा पूर्ण नाश मराठ्यांनी केला. त्याला प्रत्यय आला. पण महाराष्ट्र धर्माचे वर्म आणि मर्म उमगले नाही.

पण आता दिलेर , मिर्झाराजा यांच्या या अफाट मोहिमेत ते मर्म आणि वर्म निश्चितपणे मिर्झाराजांच्या थोडेफार लक्षात आले. अनुभवाने मिर्झाराजांना दिसून आले की , हे मराठी वादळ स्वाथीर् लुटारुंचे नाही. यांच्या पाठीमागे उदात्त स्वातंत्र्याचा , सद्धर्माचा आणि सुसंस्कृतीचा विवेक आहे. हट्ट आहे. आपण मात्र कोणा एका धर्मवेड्या बादशाहाचे सेवक आहोत. त्याची शाबासकी मिळवून त्याच्या दरबारात मोठ्यातला मोठा सरदार होण्याची आपली धडपड आहे. आपले लक्षचंडी यज्ञ आणि कोटिलिंगार्चने पुण्य मिळवण्यासाठी नाहीत. या मराठ्यांची घरेदारे आणि खेडीपाडी आपण बेचिराख करीत सुटली आहोत , तरीही हे मराठे वाकायला तयार नाहीत. हे सारे मिर्झाराजांना प्रत्यक्ष अनुभवावयास मिळत होते. पण तरीही ते आपले राजपुती इमान पाळीत होते. दिलेरखान या इमानदार राजपुताचा मत्सरच करीत होता. खानाला मिर्झाराजांच्या प्रामाणिक निष्ठेबद्दल सतत संशयच वाटत होता. हे मिर्झाराजांच्याही लक्षात आलेले होते. तो दिलेरला सांभाळीत सांभाळीत विचार करीत होता की , औरंगजेबाची सेवा , माझा स्वत:चा फायदा आणि या थोर विचारांच्या शिवाजीराजाचेही जमेल तेवढे कल्याण आपण कसे करू ?

पुरंदरचा वेढा अतिशय त्वेषाने दिलेरने चालू ठेवला होता. तिकडे सिंहगडालाही असाच हलकल्लोळ चालू होता. दोन महिने उलटून गेले तरीही हे दोन्हीही गड वाकलेले नव्हते. मराठी खेडीपाडी जळत होती. तरीही मराठी जनता नमण्याची चिन्हेही दिसत नव्हती. दिलेरसारखा संतप्त सेनानी पुरंदर घेण्याची प्रतिज्ञा करून अक्षरश: अहोरात्र पुरंदरला धडका देत होता.

या पुरंदर युद्धात एक महान महाराष्ट्रधर्माचे ब्रीद प्रखर तेजाने प्रकट झाले. दि. १ एप्रिल १६६५ पासून अहोरात्र दीड महिना पुरंदरगड मेरू पर्वतासारखा या अग्निमंथनात घुसळून निघत होता. गडाचे नेतृत्त्व मुरारप्रभू बाजीप्रभू नाडकर उर्फ देशपांडे या सरदारी तलवारीच्या एखाद्या योध्यासारखे होते. एकूण हा पुरंदरचा भयानक संग्राम आणि मुरार बाजी देशपांडे याचे नेतृत्त्व सविस्तर बिनचूक लिहायला प्रतिभा हवी , ‘ चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड ‘ लिहिणाऱ्या अल्फ्रेड टेनिसनची वा राम गणेश गडकऱ्यांचीच.

पुरंदराभोवती युद्धतांडव तर चालूच होते. एके दिवशी ( बहुदा दि. १६ मे १६६५ ) या मुरार बाजीच्या मनात एक धाडसी विचार आला. ते धाडस भयंकरच होते. गडावरून सुमारे सहाशे योद्धे सांगाती घेऊन उत्तरेच्या बाजूनने एकदम मोगलांवर अन् खुद्द दिलेरखानवरच तुटून पडायचे , अगदी कडेलोटासारखे , असा हा विचार होता. हा विचार की अविचार ? विचारपूर्वक अविचार. एकच वर्षापूवीर् सिंहगडाभोवती मोचेर् लावून बसलेल्या जसवंतसिंह या मोगली राजपूत सरदारावर सिंहगडच्या मराठी किल्लेदारानं अवघ्या काहीशे मावळ्यांच्यानिशी असाच भयंकर धाडसी हल्ला गडातून बाहेर पडून चढविला होता. तो पूर्ण यशस्वी झाला होता. मार खाऊन जसवंतसिंह आणि मोगली फौज उधळली आणि पळून गेली होती. अगदी तसाच हल्ला करण्याचा विचार आता मुरार बाजीच्या मनात आला होता. तो या जोहारास सिद्ध झाला. त्याने एकदम दिलेरखानाच्याच रोखाने गडावरून खाली झेप घेतली. भयंकर कल्लोळ उडाला. वीज कोसळावी तसा दिलेर तर थक्कच झाला. तो आवेश अफलातूनच होता. सहाशे मराठे प्रचंड मोगली दलावर तुटून पडले होते. दिलेरखानाने या हल्ल्यावर आपलाही मोगली हल्ला तेवढ्याच त्वेषाने चढवला.

मुरार बाजीचे या आगीतील शौर्यतांडव पाहून खान त्याही स्थितीत विस्त्रित झाला. खुश झाला. त्याने मुरारवरील मोगली हल्ला स्वत:च हुकूम देऊन हटविला. थांबविला. तो निथळता मुरार खानासमोर काही अंतरावर झुंजत होता. तो थांबला. दिलेरखानाने त्याला मोठ्याने म्हटले , ‘ अय बहाद्दूर , तुम्हारी बहादुरी देखकर मैं निहायत खुश हुँआ हूँ। तुम हमारे साथ चलो। हम तुम्हारी शान रखेंगे! ‘

हे उद्गार ऐकून मुरारबाजी उलट भयंकरच संतापला. हा खान मला फितुरी शिकवतोय. याचाच त्याला भयंकर संताप आला. मुरार बाजीने त्याच संतापात जबाब दिला. ‘ मी शिवाजीराजाचा शिपाई. तुझा कौल घेतो की काय ?’

आणि मुरार बाजी दिलेरच्या रोखाने तुटून पडला. पुन्हा युद्ध उसळले. खानाने बाण सोडून मुरार बाजीला ठारही केले. एक महान तेज सूर्यतेजात मिसळले गेले.

हे तेज म्हणजेच महाराष्ट्र धर्माचे तेज. मराठ्यांचा शिवकालीन इतिहास म्हणजे याच तेजाचा आविष्कार.

- बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel