महाराज गेल्या महिना सव्वा महिन्यात अगदी पद्धतशीर आणि काळजीपूर्वक आजारी होते. हे आजारपणाचं नाटक त्यांनी आणि त्यांच्यापेक्षाही त्यांच्या जवळच्या मावळी सौंगड्यांनी छान साजरं करीत आणलं होतं. वैद्य , हकीम , औषधं याची गरज होतीच ना! ती महाराजांपर्यंत पोहोचवण्याची परवानगी फुलादखानामार्फत आणि मराठी वकिलांमार्फत औरंगजेबाकडे जेव्हा जेव्हा मागितली गेली , तेव्हा तेव्हा ती मिळतही गेली. औरंगजेबाचं लक्ष होतं फक्त फिदाई हुसेनच्या हवेलीच्या बांधकामाकडे. ते बांधकाम पूर्ण होतच होतं.

याच काळात दक्षिणेत बीड-धारूर-फतहाबाद येथे असलेला मिर्झाराजा अतिशय चिंतेने व्याकुळ होता. कारण महाराजांना आग्ऱ्यास पाठवण्यामागे त्याचे जे विधायक राजकारण होते , ते औरंगजेबाने उधळून लावले होते. असा आपल्या मनात विचार येतो की , औरंगजेबाच्या ऐवजी येथे अकबर बादशाह असता , तर त्याने मिर्झाराजांच्या या राजकारणाचा किती वेगळा उपयोग करून घेतला असता ? पण औरंगजेबाचे राजकारण आणि अंत:करण उत्तमरितीने स्वार्थ साधणारेही नव्हते. त्याचे परिणाम त्याला आणि त्याच्या मोगल सल्तनतीला भोगावे लागले. अखेर मराठ्यांच्या हातूनच औरंगजेबही संपला आणि त्याची मोगल सल्तनतही संपली. खरं म्हणजे राजकारण म्हणजे एक योगसाधना असते. पण शकुनीमामा , दुयोर्धन , धनानंद , जयचंद आणि असे अनेक वेडे अदूरदशीर् प्राणी निर्माण झालेले आपण पाहतो. आजही पाहतो आहोत की ते पाहात असताना त्यांची फक्त ‘ न्युईसन्स व्हॅल्यू ‘ लक्षात येते. अन् पटतं की , काही लोकांचा तो धंदाच आहे. च्क्कश्ाद्यद्बह्लद्बष्ह्य द्बह्य ड्ड ड्ढह्वह्यद्बठ्ठद्गह्यह्य श्ाद्घ ह्यह्नह्वड्डठ्ठस्त्रह्मड्डद्यह्यज् त्यांचा शेवटही औरंगजेबी पद्धतीनेच होतो.

शुक्रवार दि. १७ ऑगस्टची दुपार म्हणजे औरंगजेबाच्या डोक्यात चाललेलं गहजबी तुफान होतं. तो वरून अगदी शांत होता.

महाराजांच्या डोक्यात आणि त्यांच्या सौंगड्यांच्या अंत:करणात यावेळी काय चाललं असेल ? न दिसू देता , कोणालाही संशयही न येऊ देता सारा डाव फत्ते करायचा होता. त्या त्या मराठी सौंगड्यांनी आपापली भूमिका किती सफाईने या रंगमंचावर पार पाडली असेल ? याचा विचार आज आमच्या आजच्या सामाजिक आणि राजकीय खेळांत आम्ही सूक्ष्मपणे करण्याची गरज आहे की नाही ? अहो , तालमी करूनही आम्हाला त्यातला अभिनयसुद्धा साधत नाही.

असू द्या! मिठाईचे येणारे पेटारे या शेवटच्या दिवशीही यायचे ते बिनचूक आले. ही वेळ संध्याकाळची , अंधारात चाललेली होती. हा सारा प्रसंग , हे सारे क्षण चिंतनानेच समजू शकतील. ज्या क्षणी महाराज पेटाऱ्यात शिरले , आणि तो पेटारा बंद झाला , तो क्षण केवढा चिंताग्रस्त होता. शामियान्यावरच्या मोगली पहारेकऱ्यांपैकी एखाद्याची नजर जर त्यावेळी त्या प्रसंगाकडे गेली असती , तर काय झालं असतं ? महाराजांच्या जागी चटकन पलंगावर शाल अंगावर घेऊन झोपणारा हिरोजी फर्जंद किती सफाईने वागला. पाहा! तो जरा चुकला असता तर ? पेटारे नेणारे वेषांतरीत मावळे गडबडले असते किंवा बावळटासारखे वागले असते तर ? हे सारेच प्रश्ान् अभ्यासकांपुढे येतात. त्याची उत्तरेही त्यांनाच शोधावी लागतात.

ही वेळ संध्याकाळची सात वाजायच्या सुमाराची होती. असे लक्षात येते. पेटारे नेणाऱ्या साथीदारांवर केवढी जबाबदारी होती! आपण काही विशेष वेगळे आज करतो आहोत असा किंचितही संशय पहारेकऱ्यांना अन् फुलादखानला येऊ नये , याची दक्षता या पेटारेवाल्यांनी किती घेतली असेल ? असा आम्हाला नाटका-सिनेमांत अभिनय तरी करून दाखवता येईल का ? ज्या क्षणी पेटारे शामियान्यातून आणि छावणीच्या परिसरातून बाहेर पडले असतील तेव्हा मावळ्यांना झालेला आनंद व्यक्त करण्याइतकीही सवड नव्हती.पेटारे निसटले.

अंधार दाटत गेला. नेमके महाराजांचे संबंधित पेटारे भट्टी पेटवून बसलेल्या कुंभाराच्या दिशेने धावत होते. याच दिशेने संबंधित मावळे घोडे घेऊन येत होते. महाराज ज्या क्षणी त्या पेटलेल्या भट्टीपाशी जाऊन पोहोचले असतील , त्याक्षणी त्या कुंभाराला काय वाटले असेल ? त्या जाळाच्या अधुऱ्या प्रकाशात या सगळ्या हालचाली , पसार होण्याची घाईगदीर् आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे दिसले असतील ? फक्त कल्पनाच करायची. इतिहास येथे थबकतो. कारण याचा तपशील कुणीच लिहून ठेवलेला अजून तरी सापडलेला नाही. हे आपल्या अभ्यासाने आणि प्रतिभेने कलावंतांनी सांगायचे आहे. चित्रकरांनी चितारायचे आहे कवींनी आणि गायकांनी गायचे आहे. अभिनेत्यांनी रंगमंचावर सादर करायचे आहे. शिल्पकारांनी शिल्पित करावयाचे आहे. केवढा विलक्षण इतिहास घडलाय हा! आमच्या मनांत एकच शंका डोकावते , की यातील एकही मावळा फितुर कसा झाला नाही ? जहागीर मिळाली असती ना औरंगजेबाकडून चंगळ करायला अमाप दौलत मिळाली असती ना , शाही खजिन्यातून.

असं काहीच घडलं नाही. कारण राष्ट्रीय चारित्र्य. या प्रकरणातील प्रत्येकजण हा ‘ नायक ‘ होता. कुंभारापर्यंत यात खलनायक एकही नव्हता.

नेताजी सुभाषचंद बोस हे ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन निसटले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते भारताबाहेर गेले. त्यांनी हिंदुकुश पर्वत ओलांडला. त्यांच्या डोळ्यापुढे ही आग्ऱ्याहून सुटकाच असेल काय ? आणि आमच्या तडाख्यातून हैदराबादचा लायकअली पसार झाला तेव्हा आमच्या डोळ्यापुढे फुलादखानचा वेंधळेपणा असेल काय ?

- बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel