मराठी फौज औशाच्या किल्ल्यातूनही २० लाखाचा खजिना घेऊन पसार झाली. औरंगजेबाचा सुटलेला हजबल हुक्म मराठे औरंगाबादेतून पसार झाल्यावर थोड्याच काळात आला आणि चिरंजीव अजीम यांस मिळाला. आता या वडिलांच्या हुकुमाला उत्तर काय द्यायचे ? चिरंजीवांनी तीर्थरुपांस लिहिले की , ‘ आपला हुकुम मिळण्यापूवीर्च प्रतापराव आणि त्यांची फौज शहरातून पसार झाली. अशी अचानक कशी पसार झाली ते लक्षात येत नाही. पण जर आपले आज्ञापत्र थोडे आधी येऊन पोहोचले असते , तर मराठ्यांचा फडशा पाडता आला असता. ‘

चिरंजीवांचे हे उत्तर वाचून औरंगजेबास काय वाटले असेल ? एक मात्र नक्की की त्याच्या डोक्यात असलेला प्रतापराव , निराजी आणि प्रमुख मराठ्यांना अचानक कैद करून , दिल्लीत आणून , हौसेप्रमाणे ठार मारण्याचा गोड बेत उधळला गेला. पाच हजार मराठे शहर औरंगाबादेतून जिवानिशी सुटले. औरंगजेबाचे केवढे प्रचंड नुकसान झाले ?

महाराज यावेळी राजगडावर होते. घडलेल्या घटनांच्या बातम्या त्यांना येऊन पोहोचत होत्या. तह मोडण्याचे औरंगजेबाने केलेले उद्योग तेही त्यांना समजले. एवढेच नव्हे तर आपला पराक्रम महाराजांना सादर करण्याकरिता औशाचा खजिना घेऊन प्रतापरावही राजगडास पोहोचले.

आधीची तीन साडेतीन वर्षे महाराजांनी आपली लष्करी शक्ती आणि भावी युद्धाची तयारी जय्यत करण्यात खर्च केलेली होती. महाराज आणि मुत्सद्दी मंडळ नव्या डावपेचांसाठी कल्पनांचा आखाडा उकरीत होते. औशाला मराठ्यांनी घातलेला छापा तपशीलवार दिल्लीस औरंगजेबाला कळला. त्याने औशाच्या पराभूत किल्लेदाराचा किताब एका शब्दाने छाटून कमी केला. म्हणजे काय ? या किल्लेदाराचे नाव होते शेर बहाद्दूर जंग. त्यातील जंग ही दोन अक्षरे काढून टाकण्याचा हुकुम औरंगजेबाने दिला. पण मग पुढे काय ? पुढे काय झाले कोण जाणे ?

औरंगजेबाच्या डोक्यात सततच धुमसत असलेले धर्मवेड किंवा धर्मपेम म्हणा यावेळी उसळून आले. औरंगजेब तसा स्वधर्मावर कडोविकडीचे प्रेम करणारा होता. यात काहीही शंका नाही. पण त्याकरिता अन्य धमिर्यांचा छळ आणि अपमान करण्याचे कारण काय ? ते अजूनही कोणास उमजलेले नाही. त्याने एक स्वतंत्र घोडेस्वारांचे सैन्यच तयार ठेवले. त्यांचे काम मूतीर्भजन आणि धामिर्क छळवाद. याच काळात अनेक पवित्र हिंदू धर्मक्षेत्र त्याने उद्ध्वस्त केली.

इतिहासाचा अभ्यास करताना असा एक विचार डोळ्यापुढे येतो की , हे हाल आणि अपमान भारतात सर्वांच्याच वाट्याला येत होते ना ? होय. मग या सर्वांनी म्हणजे पंजाबात शिरवांनी , आसामात आसामींनी , महाराष्ट्रात सर्व मराठ्यांनी , राजस्थानात सर्व राजपुतांनी , काश्मिरात डोग्रांनी जर एकवटून उठाव केला असता तर येथील वेडी धामिर्क दांडगाई थांबली नसती का ? पण हे कधीच होऊ शकले नाही. उलट गोमांतकात पोर्तुगीजांच्या इन्क्विझिशनला उधाण आले होते.

आता महाराजांचे लक्ष आग्ऱ्याला जाण्यापूवीर् मोगलांना दिलेल्या २ 3 किल्ल्यांवर आणि शिवाय नव्याने घेण्याकरता उभ्या असलेल्या शिवनेरी , साल्हेर , मुल्हेर इत्यादी गडांकडेही लागले होते. राजगडावरच्या खलबतखान्यात याच भावी मोहिमांचे आराखडे आखले जात होते.

याच काळात असाच आणखीन एक शिवाजीराजा आसामात मोगलांच्या विरुद्ध गेंड्याच्या बळाने धडका देत होता. त्याचे नाव लछित बडफुकन. हा आसामच्या राजांचा सरसेनापती होता. आसाम पूर्ण जिंकावा म्हणून मोगल सुलतान अन् आत्ता विशेषत: औरंगजेब सतत आसामवर फौजा पाठवित होते. युद्धे चालू होती. त्यातच शाहिस्तेखान मामाला औरंगजेबाने मुद्दाम या बडफुकनच्या विरुद्ध झंुजायला पाठविले. (इ. १६६ 3 जून) या शाहीमामाला तो ढाक्यापर्यंत आल्याचे कळल्यानंतर लछित बडफुकनने त्याला एक पत्र पाठविल्याची नोंद ‘ शाहिस्ताखान की मुरंजी ‘ या कागदात आहे.

पण अखेर नियतीने इथेही आसामवर घाव घातला. लछित बडफुकन हा भयंकर आजारी पडून (बहुदा विषमज्वरानेे) मरण पावला. बडफुकन म्हणजे मुख्य सेनापती. बहुआ , बडपुजारी , बडफुकन याचा अर्थ त्या त्या क्षेत्रातला मुख्य.

-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel