चिंचवडच्या श्रीमोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणी महाराज आणि नातू नारायण महाराज देव या तीनही पिढ्यांतील गणेशभक्तीबद्दल भोसले राजघराण्यात नितांत आदरभाव होता. चिंतामणी महाराज आणि नारायण महाराज हे तर शिवाजीमहाराजांच्या अगदी समकालीन होते. श्रीमोरया गोसावी हे योगी होते. त्यांनी चिंचवडला संजीवन समाधी घेतली. या गणेशभक्तांबद्दल स्वराज्यस्थापनेपूवी र्च्या काही मराठी सरदार जहागीरदारांनी आपला भक्तिभाव चिंचवड देवस्थानाला जमिनी , पैसे , दागिने आणि काही इनामी हक्क प्रदान करून व्यक्त केला होता.

येथे नेमकेच सांगायचे , तर श्रीनारायण महाराज देव यांना कुलाबा कोकणातील काही बाजारपेठेच्या गावातून पडत्या भावाने तांदूळ , नारळ , सुपारी , मीठ इत्यादी कोकणी माल खरेदी करण्याचा हक्क मिळालेला होता. म्हणजे समजा , देवमहाराजांना काही खंडी तांदूळ हवा असेल , तर तो बाजारभावापेक्षाही खूपच कमी भावाने परस्पर शेतकऱ्यांकडून वा व्यापारी दुकानदारांकडून खरेदी करण्याचा हक्क श्रीदेवांना मिळालेला होता.

हा माल खरेदी करण्याकरता दरवर्षी श्रीदेवांचे कारकून आणि नोकर कोकणात जात असत. हा माल कोणा एकाच मालकाकडून सर्वच्यासर्व खरेदी न करता अनेकांकडून मिळून तो खरेदी करण्याचा विवेकी व्यवहार श्रीदेवांचे कारकून नक्कीच सांभाळत असत हे उघड आहे. अशा देणग्यांना आणि अधिकारांना (हक्क) प्रत्यक्ष बादशाही मान्यता घ्यावी लागे. ती निजामशाह किंवा आदिलशाह यांची असे. हे बादशाह तशी मान्यता देत असत. दरवर्षी श्रीदेवांचे नोकर कुलाबा भागात उतरून हा हक्क बजावीत आणि माल बैलांवर लादून घाटावर चिंचवडला आणीत असत.

श्री योगी मोरयागोसावी यांची पुण्यतिथी मार्गशीर्ष वद्य षष्ठीस साजरी होत असे. अन् आजही होते. त्यानिमित्त यात्रेकरूंना भंडारा म्हणजे अन्नदान होई. हजारो लोक येथे भोजन करीत. श्रीदेव या भंडाऱ्याकरिता हा कोकणातील माल उपयोगात आणीत असत. पुढे (१६५७ पासून) स्वराज्याची सत्ता या कुलाबा भागात प्रस्थापित झाली. स्वराज्याचे कायदे सुरू झाले. दरवषीर्प्रमाणे श्रीदेवांचे कारकून चिंचवडहून श्रीदेवांच्या आज्ञेप्रमाणे कुलाबा भागातील माल पडत्या भावाने खरेदी करण्यासाठी कोकणात आले. तेथील मराठी स्वराज्याच्या सुभेदाराने या कारकुनांना सांगितले की , ‘ पडत्या भावाने तुम्हांस माल खरेदी करता येणार नाही ‘

श्रीदेवांची कारकून मंडळी विस्मितच झाली. बादशाही अमलात देवस्थानकरता आम्हाला मिळालेले हक्क मराठी स्वराज्य आल्यावर काढून घेतले जावेत ? काय आश्चर्य ? हे हिंदवी स्वराज्य श्रीच्या इच्छेने आणि आशीर्वादानेच निर्माण झाले ना ?

स्वराज्याच्या अंमलदाराने अशी बंदी घातली आहे असे या कारकुनांनी श्री देवमहाराजांना चिंचवडला पत्र पाठवून कळविले. श्री नारायणमहाराज देवही चकीत झाले. त्यांनी राजगडास शिवाजीमहाराजांकडे तक्रारीचे पत्र पाठविले की , ‘ देवकार्यासाठी मिळालेला पडत्या भावाने माल खरेदी करण्याचा हक्क शिवशाहीत रद्द व्हावा ? ये कैसे ?’

महाराजांनी श्रीदेवांचे हे पत्र आल्यावर उत्तर म्हणजे राजाज्ञापत्र चिंचवडास पाठविले की , ‘ स्वराज्यात असे हक्क कोणासही दिले जाणार नाहीत. पूवीर् दिलेले असतील , तर ते अमानत म्हणजे रद्द करण्यात येतील. कारण पडत्या भावाने माल खरेदी केला , तर शेतकऱ्यांचे वा दुकानदारांचे नुकसानच होते. म्हणून हा हक्क रद्द करण्यात आला आहे. तसेच त्यावरील जकातही वसूल केली जाईल माफ होणार नाही. ‘ या राजाज्ञेची अमलबजावणीही झाली. स्वराज्याचा कारभार असा होता.

पण महाराजांची श्रीगणेशावर आणि देवस्थानावर पूर्ण भक्ती होती. महाराजांनी श्री नारायण महाराज देव यांना कळविले की , ‘ कोकणातून शेतकऱ्यांकडून आणि व्यापाऱ्यांकडून जो आणि जितका माल आपण पडत्या भावाने खरेदी करीत होता , तेवढा माल श्रीचे अन्नदान आणि भंडाऱ्याकरिता सरकारी कोठारातून चिंचवडास विनामूल्य , दरवषीर् सुपूर्त केला जाईल. ‘ शिवाजी महाराज असे होते आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे शिवशाहीही अशी होती. आचारशीळ , विचारशीळ , दानशीळ , धर्मशीळ सर्वज्ञपणे सुशीळ , सकळांठायी!

असाच एक प्रश्न् कोकणात मिठागरांच्या बाबतीत निर्माण झाला. हा प्रश्ान् गोव्याच्या धूर्त पोर्तुगीज फिरंग्यांनी निर्माण केला. स्वराज्यातील आगरी समाजाची आणि काही इतर समाजाचीही खायचे मीठ तयार करणारी मिठागरे होती. मिठागरे म्हणजे मिठाची शेती. त्याचे असे झाले की , या धूर्त पोर्तुगीजांनी त्यांच्या पोर्तुगीज देशात तयार होणारे मीठ गोव्यात आणावयास सुरुवात केली. हे पांढरे दाणेदार मीठ पोर्तुगीजांनी अगदी कमी किंमतीत कोकणात विकावयास सुरुवात केली. मीठ चांगले होते. ते अगदी स्वस्त भावात विक्रीस आल्यावर कोकणातच तयार होणारे आगरी लोकांचे स्वदेशी मीठ कोण विकत घेणार ? मुक्त बाजारपेठ स्वराज्यात असल्यामुळे पोर्तुगीज लोक आपले मीठ विकू लागले. याचा परिणाम उघड होता. तो म्हणजे स्वराज्यातील आमची मिठागरे तोट्यात जाणार आणि आगरी लोकांचा धंदा बुडणार. स्वराज्याचेही नुकसान होणार. हे महाराजांच्या त्वरित लक्षात आले. शिष्टमंडळे राजगडावर आणावी लागली नाहीत. महाराजांनी आज्ञापत्रे काढून या पोर्तुगीज मीठावर जबरदस्त कर बसवला. त्यामुळे गोव्याचे मीठ स्वराज्यात येणे ताबडतोब अन् आपोआप बंद झाले. स्वराज्यातील उद्योगधंद्यांना संरक्षण देण्याची महाराजांची ही दक्षता होती. ही दक्षता व्यापारपेठेत आणि करवसुली खात्यातही जपली जात होती.

चांभार म्हणजे चर्मकार. हे लष्काराच्या अतिशय उपयोगी पडणारे लोक. करवसुली आणि जकात स्वराज्यात रोख पैशांत घेतली जात असे. या चर्मकारांकडूनही तशीच घेण्यात येई. पण खेड्यापाड्यातील आणि सर्वच चर्मकारांना रोख पैसे कर म्हणून देणे शक्य होईना. महाराजांनी आज्ञापत्रक काढून आपल्या अंमलदारास लिहिले की , ‘ ज्यांना रोख रकमेने कर देता येणे शक्य नसेल , त्या चर्मकारांकडून तेवढ्या किंमतीचे जिन्नस सरकारात घ्यावेत. रोख पैशाचा आग्रह धरू नये. आपल्या शिलेदारांस कातड्याच्या खोगीरांची , पादत्राणांची आणि इतर कातडी वस्तूंची गरज असतेच. तरी ते जिन्नस घ्यावेत. ‘ त्याप्रमाणे चर्मकारांना मोठी बाजारपेठही मिळाली आणि त्यांची अडचणही दूर झाली. असा व्यवहार तराळ , मातंग , धनगर , लोहार , कुंभार वगैरे मंडळींच्या व्यवसायातही महाराजांनी अमलात आणला असावाच. मात्र त्या संबंधीचे कागद अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.

राजाचे लक्ष असे स्वराज्यावर आणि रयतेवर चौफेर होते. असे लक्ष बादशाही अंमलात नव्हते. उलट काही कर शाही धर्माचे नसलेल्या लोकांवर लादले जात असत. हा फरक स्वराज्य आणि मोगलाई यातील आहे.
-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel