महाराजांचे हे कठोर कैदेतून बेमालूमपणे निसटणे हा जगाच्या इतिहासातील एक विलक्षण चमत्कार आहे. या संपूर्ण आग्रा प्रकरणाचा खूपच तपशील इतिहास संशोधकांना मिळाला आहे. ही कथा म्हणजे एक विशाल सत्य कादंबरी आहे. ही एक दिव्य तेवढेच थरारक महाकाव्य आहे. प्रतिभावंतांची नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा स्तिमित व्हावी अशी ही सत्य कलाकृती आहे.

समजा , महाराज जर त्याच दिवशी निसटले नसते , तर काय झाले असते ? त्याच दिवशी ते निसटले हा केवळ योगायोग होता का ? कदाचित कुणी म्हणेल की , महाराजांना झालेला हा ईश्वरी साक्षात्कार होता. पण नेमके त्याच दिवशी (दि. १७ ऑगस्ट) निसटून जाण्याचे महाराजांनी तडकाफडकी ठरविले आणि ते पसार झाले. याच्या पाठीमागे मराठी हेरांनी करामतच असली पाहिजे. त्याशिवाय हे घडलेले चित्तथरारक नाट्य बुद्धिला उमगत नाही.

ते पेटाऱ्यातून गेले की वेषांतर करून गेले! मोगली कागदपत्रात ते वेषांतर करून गेले असे उल्लेख आहेत. पण सुमारे २ 3 ऑगस्ट म्हणजेच सुटकेनंतर एक आठवड्याने मोगलांच्या टेहळ्यांना अर्धवट जळून विझून गेलेले पेटाऱ्याचे अवशेष त्या माळावर आढळले. त्यावरून त्यांचीही खात्री झाली की , सीवा पेटाऱ्यातून पसार झाला आणि त्याने पेटारे जाळून टाकले. ‘ सेवो दखन्नी और सेवो के पुत्तो संभो दखणी पिटारा बैठकर भागोछे ‘ अशी राजस्थानी पत्रात नोंद आहे. अशाच पद्धतीने सुटून जाण्याची महाराजांची कल्पना मात्र त्यांच्या पूर्वतयारीवरून आग्ऱ्यात तयार करून घेतल्याचे दिसून येते. महाराज आपल्या बरोबरच्या मराठी साथीदारांसह नरवरपासून पुढे सटकले तेव्हा नरवरच्या मोगली ठाणेदाराला महाराजांनी आपल्याला मिळालेली , दक्षिणेत घरी जाण्याची परवानापत्रे दाखवली. त्या ठाणेदाराने महाराजांना सोडून दिले. ही पत्रे म्हणजे महाराजांनी तयार करून घेतलेली बनावट परवानापत्रे होती.

महाराज आग्ऱ्याहून एकदम दक्षिणेच्या मार्गाला न लागता ते उलटे उत्तरेकडे म्हणजेच मथुरेकडे दौडत गेले. ही त्यांची दौड एकूण ६० किलोमीटरची होती. मथुरेत मोरोपंत पिंगळे यांची सासुरवाडी होती. मोरोपंतांच्या पत्नीचे बंधू तेथे राहत होते. महाराजांना ते माहिती होते. राजगडापर्यंतची दौड चिरंजीव शंभूराजांना झेपणार नाही , म्हणून शंभूराजांना मोरोपंतांच्या मेहुण्यांच्या घरी छपवून ठेवायचे आणि आपण मराठी मुुलुखाकडे नंतर दौडायचे हा महाराजांचा आराखडा होता. त्यामुळे महाराजांची दौड १२० किलोमीरटने आणि वेळ जवळजवळ दहा तासांनी वाढणार होती , तरीही शंभूराजांच्याकरिता त्यांनी हे महागाईचे गणित पत्करले. मथुरेपर्यंतचा प्रवास ऐन काळोख्या रात्री दौडत करावा लागला. शंभूराजांचे वय यावेळी फक्त नऊ वर्षांचे होते. या नऊ वर्षाच्या मुलाला मोरोपंतांच्या मेहुण्यांच्या स्वाधीन करून महाराज अगदी त्वरित दक्षिणेच्या मार्गाला लागले. शंभूराजांच्या सांगाती महाराजांनी बाजी सजेर्राव जेधे देशमुख यांना ठेवले.

दक्षिणची दौड सुरू झाली. महाराज नरवरला पोहोचले. तेथे मोगलांचे लष्करी गस्तीचे ठाणे होते. या ठाणेदाराची महाराजांनी मुद्दाम धावती भेट घेतली. त्यांनी आपल्याजवळची दस्तके (परवानापत्रे) त्याला दाखवली. ठाणेदाराला प्रत्यक्ष शिवाजीराजांना पाहून काय वाटले असेल ? तो भयंकर सीवा , आपल्यासमोर पाचपंचवीस मराठी सैनिकांनिशी उभा आहे. याची प्रत्यक्ष प्रचिती त्या ठाणेदाराला स्वप्नासारखी वाटली असेल नाही! तो विस्मित झाला ? गोंधळला ? भारावला ? क्षणभर घाबरला ? तो भयंकर सीवा आपल्याला दस्तके दाखवून आपल्या परवानगीनेच जातो आहे या सुखद जाणीवेने आनंदला ? काय झाले असेल त्याचे ? त्याने महाराजांना पुढे जाण्यास म्हणजेच झपाट्याने पसार होण्यास मोठ्या आदबशीररितीने परवानगी दिली.

महाराज नरवरवरून निसटले. ते स्वत:हून या ठाणेदाराला दस्तके दाखवून पसार झाले. यात त्यांचा मिस्किल , थट्टेखोर स्वभाव दिसून येतो. ही थट्टा प्रत्यक्ष औरंगजेबाचीच होती.

तसेच झाले. महाराज दि. १७ ऑगस्टला संध्याकाळी पसार झाले. त्यावेळी त्यांच्या शामियान्यात हिरोजी फर्जंद स्वत: ‘ महाराज ‘ म्हणून शाल पांघरून झोपला. सुमारे पाच-सहा मावळे चिंताग्रस्त चेहऱ्यांनी भोवती होते. थोड्याचवेळाने चिंताग्रस्त चतुर उठले अन् शामियान्याच्या दारावर असलेल्या मोगली पहारेकऱ्यांना ‘ आम्ही महाराजांची औषधं आणावयास जातो ‘ असे सांगून बाहेर पडले. अशा प्रकारचा औषधासाठी जाण्यायेण्याचा रिवाज रोजच चालू होता. त्यामुळे हे लोक जात आहेत , ते नेहमीप्रमाणे औषधं घेऊन परतही येणार आहेत अशी स्वाभाविकच पहारेकऱ्यांची कल्पना झाली.

आणखी थोड्या वेळाने हिरोजी फर्जंद भोसले हा हळूच पलंगावरून उठला. त्याने याही घाईगदीर्त गंमतच केली. त्याने त्या पलंगावर कोणीतरी माणूस (म्हणजे शिवाजी महाराज!) झोपला आहे असे भासावे म्हणून उशाशी एक छोटेसे गाठोडे ठेवले. मधे लोड ठेवला आणि पायाच्या बाजूला दोन जोेड उभे करून ठेवले आणि यावर शाल पांघरली. अगदी साक्षात शिवाजीराजे गाढ झोपल्यासारखे वाटावे.

अन् स्वत: तंबूच्या बाहेर निघाला. त्याने दारावरच्या पहारेकऱ्यांना साळसूदपणे सांगितले की , ‘ मघा माणसं औषध आणायला गेली , ती अजून का येत न्हाईत , ते पाहून येतो ‘ हिरोजीही निसटला. आता त्या शामियान्यात कोणीही नव्हते. सगळे पसार!

दुसरा दिवस उजाडला आणि बोभाटा झाला. एकच कल्लोळ उसळला. फौलादखानाला तंबूत चिटपाखरूही दिसले नाही. पलंगावर एक गाठोडे , एक लोड आणि दोन जोडे शालीखाली गाढ झोपलेले आढळले. ते पाहून फुलादखानाची काय अवस्था झाली असेल ? तो विरघळला की गोठला ? त्याला शिवाजीराजांचा आणि औरंगजेबाचाही चेहरा आलटून पालटून दिसू लागला असेल का ? आपण जिवंत असूनही ठार झालेलो आहोत याचा साक्षात्कार झाला असेल का ? केवढी फजिती!

एवढ्या प्रचंड पहाऱ्यातून अखेर तो सीवा आपली थट्टा करून पसार झाला. आता त्या औरंगजेबापुढे जायचे तरी कसे ? त्याला सांगायचे तरी काय ? काय अवस्था झाली असेल फुलादखानची ?

औरंगजेबाचे भयंकर क्रूर जल्लादही हे सारं समजल्यावर खळखळून , पोट धरून हसले असतील.

-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel