शिवाजीराजे फार बारकाईने अभ्यास करून योजना आखीत असत , असे ठाईठाई दिसून येते। लहानमोठ्या कामात त्यांना येत गेलेलं यश पाहिलं की लक्षात येतं , की या राजानं या प्रश्नांचा सर्वांगीण अभ्यासपूर्वक आराखडा तयार केला होता. योजनाबद्धता हा शिवकार्याचा आत्मा. हा अभ्यास त्यांनी कोणत्या साधनांनी केला हे सांगता येत नाही. पण महाभारतातील श्रीकृष्णापासून ते शकुनीपर्यंत साऱ्या राजनीतीवाल्यांची त्यांना अगदी दाट ओळख होती असे वाटते. कृष्णाच्या राजनीतीचा त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम होता यांत शंका नाही. कृष्णनीतीचा राजकारणात अचूक उपयोग करणारा हा शेवटचा राजा. बाकीचे सारे कृष्णाचं भजन करणारे , देवळं बांधणारे , अन् नवस करणारे भाबडे भक्त!
यावेळी (इ। स. १६५६ अखेर) मोगल राज्याची स्थिती उगीचच चिंताजनक झाली होती. सार्मथ्य प्रचंड होतं. पण राजपुत्रांच्या स्पधेर्मुळे आणि शाहजहानच्या नाजूक प्रकृतीमुळे सर्व दरबारी संभ्रमात पडले होते. भयंकर पाताळयंत्री आणि महत्त्वाकांक्षी आणि तेवढाच ढोंगी औरंगजेब दक्षिणेत बीदर- नांदेड या महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील भागात ससैन्य होता. त्याचे लक्ष बापाच्या आजारपणाकडे अन् म्हणूनच त्याच्या मरणाकडे अत्यंत आस्थेने लागलेले होते. कोणत्याहीक्षणी दक्षिणेतून दिल्लीकडे दौडावे लागेल हे औरंगजेब ओळखून होता. आणि हेच औरंगजेबाचे वर्म शिवाजीराजांनी अचूक हेरले होते. राजांना उत्तरेतून शाहजहानच्या तब्येतीच्या बातम्या येत होत्या. अशाच गंभीर बातम्या राजांना मिळाल्या. त्यांना खात्रीच पटली की , हा औरंगजेब आत्तापासूनच दिल्लीकडे जाण्याच्या अधीर तयारीत आहे. आपल्याला हीच संधी आहे या मोगलांवर झडप घालण्याची!
शिवाजीराजांनी गंमतच केली। त्यांनी आपले वकील सोनो विश्वनाथ डबीर यांना बीदरकडे औरंगजेबाच्या भेटीसाठी नजराणे देऊन पाठविले. हेतू कोणाचा ? औरंगजेबाला बनविणे! सोनोपंत औरंगजेबाला दरबारी रिवाजाप्रमाणे अदबीने भेटले. खरं म्हणजे अजूनपर्यंत राजांनी मोगली सत्तेला लहानसा ओरखडाही काढला नव्हता , भांडण तर नाहीच ते शक्यही नव्हते. मग सोनोपंतांचा नेमका मनसुबा कोणता ? ते औरंगजेबाशी साळसूदपणे बोलले की , ‘ कोकणातील आणि देशावरील विजापुरी आदिलशाहीचा जो मुलूख आमच्या कब्जात आम्ही घेतला आहे , त्याला तुमची राजकीय मान्यता असावी.
‘ म्हणजे राजांनी मुलुख घेतला होता आदिलशाहचा अन् ते मान्यता मागत होते मोगल औरंगजेबाची! फुकटची निष्ठा राजे औरंगजेबापाशी वकीलांमार्फत व्यक्त करीत होते। औरंगजेबाचं यात काय जाणार होतं ? फुकटचं मोठेपण! सोनोपंत हा जणू मैत्रीचाच बहाणा करीत होते.
यातील मराठी डाव औरंगजेबाच्या लक्षात आला नाही। त्याने ही मैत्री मंजूर केली. या दिवशी तारीख होती २ 3 एप्रिल १६५७ . सोनोपंत बिदरहून परतले. राजगडला पोहोचले. राजांशी बोलले आणि फक्त सातच दिवसांनी शिवाजीराजांनी आपलं भरधाव घोडदळ घेऊन , भीमा ओलांडून मोगली मुलखांत मुसंडी मारली. त्यांनी औरंगजेबाच्या ताब्यातील जुन्नर ठाण्यावर एकदम झडप घातली. गडगंज खजिना , शेकडो घोडे आणि युद्धसाहित्य पळविले. (दि. 3 ० एप्रिल १६५७ ) सोनोपंतांनी मैत्रीच्या तहाचं लग्न सातच दिवसांत पार उधळलं. तड्क तड्क तड्क… लगेच राजांनी श्रीगोंदे , पारनेर आणि प्रत्यक्ष अहमदनगर या ठिकाणी असलेल्या मोगली ठाण्यांवर भयंकर घाव घातले. भरपूर लूट मिळविली.
या साऱ्या बातम्या औरंगजेबाला बिदरला समजल्या। त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. या मराठी कोल्ह्यांनी आपल्याला निष्ठेची हूल दाखवून आपल्यावर उघडउघड हल्ले केले याचा अर्थ काय ? आपण तहानं गाफील झालो. सिवानं लोणी पळविलं. गाफील का जो माल है , वो अकलमंदका खुराक है!
पण औरंगजेब यावेळी स्वत: काहीही करणार नाही याची अचूक खात्री राजांनी ठेवूनच त्याला निष्ठेच्या तहाचे आमिष दाखविले अन् डाव साधला.
औरंगजेबाला घाई होती दिल्लीकडे जाण्याची। कारण बाप अतिशय गंभीर आजारी होता. केव्हा ना केव्हा महाराष्ट्रातून ही मोगलाई सत्ता आपल्याला उखडून काढायचीच आहे. नक्कीच. आत्ता हीच संधी आहे , हे ओळखून ही संधी अचूकपणे राजांनी टिपली. पण पुढची धूर्त नाटकबाजी पाहा. राजांनी हे छापे घालीत असतानाच रघुनाथ बल्लाळ कोरडे या आपल्या बिलंदर वकिलाला औरंगजेबाकडे नजराण्याची चार ताटे देऊन रवानाही केले होते. कशाकरता ? जुन्नर , नगर , श्रीगोंदे इत्यादी मोगली ठाण्यांवर आमच्याकडून ‘ चुकून ‘ झालेल्या दांडगाईबद्दल पश्चाताप आणि क्षमेची याचना व्यक्त करण्याकरिता! या वकिलाने चिडलेल्या औरंगजेबाची भेट घेऊन भरपूर पश्चाताप व्यक्त केला. केलेल्या गोष्टीची खोटी माफी मागितली. हेतू असा की , दिल्लीची घाई लागलेल्या औरंगजेबानं जाताजातादेखील शिवाजीराजांवर लहानमोठासुद्धा घाव घालू नये.
ही सारी कोल्हेबाजी औरंगजेबाला समजत नव्हती काय ? होती। पण तो अगतिक होता. शत्रूच्या अगतिकतेचा असाच फायदा घ्यायचा असतो , हे कृष्णानं शिकविलं. शिवाजीराजांनी सतराव्या शतकात ओळखलं. ज्या दिवशी आम्ही भारतीय कृष्णनीती विसरलो , त्या दिवसापासून आमची घसरगुंडी चालू झाली.
शिवाजीराजांच्या दिशेने संतापाने पाहात अन् फक्त हात चोळीत औरंगजेबाला दिल्लीकडे जाणे भागच होते.
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे