गमेश्वराच्याच जवळ १२ किलोमीटरवर शृंगारपूर या नावाचं गाव आहे. हे गाव महाराजांनी जिंकलं. जिंकण्यासाठी युद्ध करायची वेळच आली नाही. तेथील शाही जाहगिरदार महाराजांच्या दहशतीने पळूनच गेला. त्यामुळे शृंगारपूर बिनविरोध महाराजांना मिळाले.

गावाच्या पूवेर्ला सहा किलोमीटरवर एक प्रचंड डोंगरी किल्ला होता. त्याचं नाव प्रचीतगड. गडावर आदिलशाही सत्ता होती. तानाजी मालुसऱ्यांनी या गडावर हल्ला चढवून एकाच छाप्यात किल्ला घेतला. केवढं नवल! सहा सहा महिने लढू शकणारे किल्ले शाही फौजांना एक दिवसभरही झुंजवता आले नाहीत. मराठ्यांनी गड घेतला. झेंडा लागला. महाराजांना विजयाची वार्ता गेली. ते पालखीतून प्रचीतगडावर निघाले. बरोबर थोडं मावळी सैन्य होतं. महाराज गडावर पालखीतून येत आहेत हे पाहून गड जिंकणाऱ्या मराठ्यांना अपरंपार आनंद झाला. आपला विजय बघण्यासाठी खास महाराजस्वारी जातीनं येत आहे हा खरोखर दुमिर्ळ योग होता. तानाजीला तर आनंदानं आभाळ भरून आल्यासारखं झालं. गडावरचे लोक गर्जत होते ; वाद्य वाजत होते. महाराज गडावर आले.

दरवाज्यातून आत प्रवेशले. मावळ्यांना आनंदाचं उधाण आलं होतं. जणू इथूनच महाराजांची पालखीमधून त्यांनी मिरवणूक सुरू केली. महाराज लोकांचे स्वागत हसतमुखाने स्वीकारीत पालखीत बसले होते. यावेळी वारा सुटला होता. भळाळणाऱ्या वाऱ्यानं झाडं झुडपं हेलावत होती. महाराजांच्या अंगावरचा शेला फडफडत होता. नकळत शेल्याचा फलकावा पालखीबाहेर लोंबत होता. तो वाऱ्याने उडत होता. मिरवणूक चालली होती. एवढ्यात गचकन कुणीतरी मागे खेचावं असा महाराजांच्या पालखीला जरा हिसका बसला. शेला खेचला गेला. ते पाहू लागले. भोई थांबले. काय झालं तरी काय ? पाहतात तो महाराजांच्या शेल्याचं पालखीबाहेर पडलेलं टोक एका बोरीच्या झुडपाला वाऱ्याने अटकलं गेलं होतं. बोरीला काटे असतात. शेला अटकला. महाराज बघत होते. त्यांना गंमत वाटली.

मावळे काट्यात अटकलेला शेला अलगद काढू लागले. शेला निघाला. पण महाराज हसून सहज गंमतीने म्हणाले , ‘ या बोरीनं मजला थांबविले. येथे खणा ‘ मावळ्यांनी पहारी , फावडी आणली आणि त्यांनी बोरीखालची जमीन खणावयास सुरुवात केली. केवळ गंमत म्हणून महाराज बोलले. सगळ्यांचाच उत्साह दांडगा. अन् खणताखणता पहारी लगेच अडखळल्या. माती दूर केली. बघतात तो सोन्यानाण्यांनी भरलेला हंडा! हा केवळ योगायोग होता. महाराजांना भूमीगत धन मिळाले. ते धन कुठे गेले ? महाराजांच्या घरी ? ‘ कमिशन ‘ म्हणून काही ‘ हप्ते ‘ कोणाकोणाला मिळाले का ?

नाही , नाही , नाही! हे सर्व धन स्वराज्याच्या खजिन्यात जमा झाले.

इथे एक गोष्ट लक्षात येते. महाराजांना एकूण तीन ठिकाणी असे भूमीगत धन मिळाले. तोरणगडावर , कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर आणि हे असं प्रचीतगडावर. हे धन स्वराज्याचं. म्हणजेच रयतेचं. म्हणजेच देवाचं.

पूवीर् महाराजांच्या आजोबांना , म्हणजे मालोजीराव भोसल्यांना वेरूळच्या त्यांच्या शेतातच भूमीगत धन मिळालं. ते मालोजींनी श्रीधृष्णेश्वराचे मंदिर , शिखर शिंगणापूरचा तलाव , एक यात्रेकरूंच्यासाठी धर्मशाळेसारखी म्हणा किंवा मठासारखी म्हणा इमारत अन् अशाच लोकोपयोगी कार्यासाठी खर्च केलं. आपल्या आजोबांचा हा वारसा महाराजांनी आजही सांभाळला. योगायोगानं पण मालकी हक्कानेच मिळालेलं धन मालोजीराजांनी आणि आता शिवाजीराजांनी जनताजनार्दनाच्या पायांपाशी ‘ श्रीकृष्णार्पणमस्तु ‘ म्हणत खजिन्यात जमा केलं. देवाचं दान आण जनतेचं धन असेच वापरावयाचे असते. त्याचा अपहार करणे हे महत्पाप.

एक गोष्ट सांगू का ? महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला एका पैशाचेही कर्ज कधीही नव्हते. किंवा खजिन्यात खडखडाट झाला आहे अशी अवस्थाही कधी निर्माण झाली नाही. याचे एक कारण समजले ना ? अपहार , भ्रष्टाचार , पिळवणूक , लुबाडणूक हे शब्दच स्वराज्यात असता कामा नये हा आदर्श महाराजांनी घालून दिला. स्वराज्याचा खजिना नेहमीच शिलकीचा होता.

जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आम्हाला आवर्जून सांगितलं आहे की ,

‘ जीहुनिया धन उत्तम वेव्हारे

उदासविचारे वेंच करी ‘

चांगल्या मार्गाने , खूप धन मिळवा आणि उदार मनाने खर्चही करा , हा महराजांचा आदेश होता आणि आहे.

प्रचीतगडची ही तानाजीची मोहिम इ. १६६१ च्या पावसाळ्याच्या पूर्वी झाली.
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel