स्वराज्याचे एक विलक्षण मोलाचे सूत्र महाराजांनी आणि जिजाऊसाहेबांनी अगदी प्रारंभापासून , कटाक्षाने सांभाळले होते. ते म्हणजे , स्वराज्यात लायकीप्रमाणे काम मिळेल. लायकीप्रमाणे दाम मिळेल. लायकीप्रमाणे स्थान मिळेल. हेच सूत्र फ्रान्सच्या नेपोलियनला पूर्णपणे सांभाळता आले नाही. जिंकलेल्या नवनवीन प्रदेशावर नेमायला नेपोलियनला नातलग , सगेसोयरे अपुरे पडले. त्यामुळे गुणवत्ता ढासळली. अखेर सम्राट झालेला नेपोलियन ब्रिटीशांचा कैदी म्हणूनच तुरुंगात मरण पावला.

पण योग्य लायकी असलेल्या नातलगालाही टाळायचे का ? तसेही महाराजांनी केले नाही. त्यांचे थोडेेसेच पण फार मोठ्या योग्यतेचे नातलग अधिकारपदावर होते.

अभ्यासकांचे विशेष लक्ष वेधते ते काही व्यक्तींवर. उदाहरणार्थ बहिजीर् नाईक. हा बहिजीर् रामोशी समाजातील होता. पण योग्यतेने राजकुमारच ठरावा , असा महाराजांच्या काळजाचा तुकडा होता. तो अत्यंत धाडसी , अत्यंत बुद्धिमान , अत्यंत विश्वासू , तिखट कानाचा आणि शत्रूच्या काळजातलही गुपित शोधून काढणाऱ्या भेदक डोळ्याचा , बहिरी ससाणा होता. महाराजांनी त्याला नजरबाज खात्याचा सुभेदार नेमले होते. सुभेदार म्हणजे त्या खात्याचा सर्वश्रेष्ठ अधिकारी. हेरखात्याचा मुख्य अधिकारी होणे ही सामान्य गोष्ट आहे का ? त्याची बुद्धिमत्ता आणि चातुर्यप्रतिभा असामान्यच होती. अनुभवाने ती असामान्यच ठरली. वास्तविक रामोशी समाज हा लोकांनी ( अन् पुढच्या काळात ब्रिटीशांनी) गुन्हेगारच ठरवून टाकला. पण त्यातील हिरे आणि मोती महाराजांनी अचूक निवडले. किल्ल्यांच्या संरक्षणासाठी आणि दौडत्या सैन्यातही महाराजांनी रामोशी ‘ नाईक ‘ मंडळी आवर्जून नेमली.

जरा थोडे विषयांतर करून पुढचे बोलतो. स्वराज्य बुडून इंग्रजी अंमल आल्यानंतरच आमच्या पुरंदरच्या परिसरातला भिवडी गावचा एक तरुण होता , उमाजी नाईक रामोशी. त्याचे आडनांव खोमणे. सारे मराठी स्वराज्य बुडाले , म्हणजे आम्हीच बुडवले. हा उमाजी नाईक एकटा स्वराज्य मिळविण्याकरता इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र उठला. चार जिवलग मिळविले. आणि इंग्रजांचे राज्य उलथून पाडण्याकरता हा रामोशी आपल्या दोन पुत्रांनिशी उठला. त्याच्या एका मुलाचे नाव होते , तुका. दुसऱ्याचे नाव होते म्हंकाळा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की , या उमाजी नाईकाने उभारलेले बंड. इंग्रजांचे राज्य मोडून , शिवाजीराजा छत्रपतीचे राज्य स्थापन करण्याचा त्याचा तळमळीचा हेतू होता. शिवाजीमहाराजांना बाकी सारे जण विसरले. एका उमाजी नाईकाच्या काळजात महाराज विसावले होते. शिवाजीराजे या शब्दाचे सार्मथ्य किती मोठे होते आणि आहे हे एका रामोशालाच समजले. आम्हाला केव्हा समजणार ? होय. आम्हालाही माहिती आहे की , कॅप्टन मॅकींगटॉश या इंग्रज अधिकाऱ्याने उमाजी नाईकाला पडकले अन् फाशीही दिली. पण त्याच कॅप्टनने उमाजी नाईकाचे चरित्र लिहिले. छापले. त्यात तो कॅप्टन म्हणतो , ‘ हा उमाजी म्हणजे अपयश पावलेला शिवाजीराजाच होता. ‘ मन भावना आणि त्याप्रमाणे कर्तबगारी ही जातीवर अवलंबून नसते. बहिजीर् नाईक आणि उमाजी नाईक हे सारखेच. एक यशस्वी झाला , दुसरा दुदैर्वाने अयशस्वी ठरला. दोघेही शिवसैनिकच.

दिलेरखान पठाणाशी पुरंदरचा किल्ला साडेतीन महिने सतत लढत होता. दिलेरखानला पुरंदर जिंकून घेता आला नाही. त्या पुरंदरावर रामोशी होते , महार होते , धनगर होते , मराठा होते , मातंग होते , कोळी होते , कोण नव्हते ? सर्वजणांची जात एकच होती. ती म्हणजे शिवसैनिक. चंदपूर , गडचिरोलीपासून कारवार , गोकर्णापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातील अगणित समाजसमुहातील माणसे महाराजांनी निवडून गोळा केली. त्यात धर्म , पंथ , सांप्रदाय , जाती- जमाती , भाषा , रीतरिवाज कधीही मोजले नाहीत. राष्ट्र उभे करावयाचे असेल , तर लक्षात घ्यावा लागतो , फक्त राष्ट्रधर्मच. अन् निर्माण करावे लागते राष्ट्रीय चारित्र्य. स्वराज्याचा पहिला पायदळ सेनापती होता नूर बेग. आरमाराचा एक जबर सेनानी होता दौलतखान. साताऱ्याजवळच्या वैराटगड या किल्ल्याचा किल्लेदार होता एक नाईक. एक गोष्ट लक्षात येते की , शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा इतिहास म्हणजे सर्व समाज शक्तींचा वापर. मित्रांनो , महाराष्ट्राच्या एका महाकवीच्या ओळी सतत डोळ्यापुढे येतात. तो कवी म्हणतोय , ‘ हातात हात घेऊन , हृदयास हृदय जोडून , ऐक्याचा मंत्र जपून ‘ आपला देश म्हणजे बलसागर राष्ट्र उभे करूया. शिवरायांच्या तत्त्वज्ञानाचे आणि इतिहासाचे तरी दुसरे कोणते सार आहे ?

-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel