अद्वैताचा साक्षात्कार

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो; परंतु निदान मानवजातीपुरते तरी त्याने विशाल दृष्टीचे नको का व्हायला?

या भारतभूमीत प्राचीन काळापासून परस्परभिन्न संस्कृतीचे संघर्ष सुरू झाले. भारताबाहेरील आर्य व एतद्देशीय थोर संस्कृतिसंपन्न अनार्य यांच्यामध्ये अनेक झगडे माजले. वेदांमधून या वैरांची वर्णने आहेत. दक्षिणेकडील वानर म्हणजे अनार्य लोकच. लंकेतील रावण हा आर्य होता. तो आपले साम्राज्य वरती नाशिकपर्यंत पसरवीत आला. वालीचे व त्याचे युद्ध झाले. या काळ्यासावळ्या एतद्देशीय लोकांना तो तुच्छतेने वानर म्हणे. परंतु दुसरे काही आर्य या अनार्य लोकांत प्रेमाने मिसळले. अगस्ती ऋषी विंध्य पर्वत ओलांडून आला व या द्रवीडियन जनतेत मिसळला. त्याने तेथील लोकांच्या भाषेची व्याकरणे लिहिली. तामीळ भाषेचा पहिला व्याकरणकर्ता अगस्ती मानतात. तामीळ भाषा अत्यंत प्राचीन अशी सुसंस्कृत भाषा आहे. आर्य ऋषींनी अनार्य लोकांत आपले आश्रम स्थापिले, संस्कृतींची देवाण-घेवाण सुरू झाली. रामाला आर्य ऋषींनी अनार्यांची बाजू घेण्यास लाविले. रावणाचा रामाने पराजय केला. आर्य व अनार्य यांना जोडणारा राम हा पहिला महान पुरुष होय. राम सर्वांना प्रेमाने जवळ घेत आहे, अद्वैत वाढवीत आहे, गुण्यागोविंदाने नांदावयास शिकवीत आहे. राम हा मानव्याची उपासना करणारा आहे. माणुसकीचा धर्म तो ओळखतो.

आर्य व अनार्य एकमेकांत मिसळू लागले. परस्परांत विवाह होऊ लागले. परंतु कधी कधी आपल्या आर्यत्वाचा टेंभा मिरविणारे प्रतिष्ठित पुढारी दिसून येत व ते अनार्यांचा उच्छेद करू बघत. आज ज्याप्रमाणे हिटलर सर्व ज्यू लोकांना हाकलून देत आहे, त्याप्रमाणे जनमेजय सर्व नागजातींचा उच्छेद करावयास सिद्ध झाला होता. अर्जुनाने नागकन्यांशी लग्ने लावली होती, परंतु नाग-स्त्रीपासून झालेल्या बभ्रुवाहनाला अभिमन्यूहून अर्जुन हीन समजत असे! परीक्षितीचा एका नागनायकाने खून केला त्यामुळे जनमेजय चिडला. सर्व नागजातीला जाळून भस्म करा, असे त्याचे अमानुष आदेश सुटले. ठायीठायी नागलोक जिवे जाळले जाऊ लागले. जे कोणी नागांना आश्रय देतील त्यांनाही तेच प्रायश्चित्त मिळेल असे उद्घोषिण्यात आले.

अशा वेळी भारतीय संस्कृतीचा संरक्षक भगवान आस्तिक उभा राहिला. मांगल्यावर ज्याची श्रद्धा तोच खरा आस्तिक! अद्वैत निर्माण करू पाहील तोच खरा आस्तिक! आस्तिक ऋषीस प्रत्यक्ष दृश्य संसारात अद्वैत पाहावयाचे होते. दृश्य संसारातील विरोध, वैषम्ये दूर करण्यासाठी प्रयत्न न करता परलोकाच्या गप्पा मारणारे ते खरोखर नास्तिक होते! तो खरा आस्तिक- की जो आजूबाजूला जे दिसत आहे त्याला सुंदरता आणू पाहतो. आज जे आस्तिक म्हणून समजले जातात ते खरोखर नास्तिक आहेत, व जे नास्तिक म्हणून समजले जातात ते खरोखर आस्तिक आहेत. गीतेत सांगितले आहे की, यज्ञ न करणा-याला हा लोक तर नाहीच, मग परलोक तर दूरच राहिला! म्हणजे या लोकाचे महत्त्व सांगतात. जीवनयात्रा, लोकयात्रा हे शब्द प्राचीन मुनी महत्त्वाचे मानीत. संसाराला ते तुच्छ नसत मानीत. केवळ स्वत:च्या संसाराला पाहणे म्हणजे मिथ्या होय; परंतु समाजाच्या ध्येयाने स्वत:चा संसार पाहिला तर तो मिथ्या नाही. मला एकट्याला या जगात काय करता येणार? समाजामुळे मी पोसला जात आहे. समाजाची सेवा करण्यात व्यक्तीचा विकास आहे.

तो महर्षी आस्तिक समाजाची शकले झालेली शांतपणे कसा पाहील? आस्तिक उठला व नागलोकांना जाळणा-या जनमेयासमोर उभा राहिला. आस्तिकाची आई नागकन्याच होती! जनमेयाला आस्तिक म्हणाला, “अरे, मलाही होळीत फेक, मीही नागकन्येच्या उदरातील आहे!” तपस्वी आस्तिकाचा महान त्याग पाहून जनमेजयाचे डोळे उघडले. नागजात का हीन समजायची? ज्या जातीत आस्तिकासारखी विश्ववंद्य माणसे निर्माण होतात, ती जात का तुच्छ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel