एक हात भू नांगरणे
शत व्याख्यानांहुन थोर
एक हात खादी विणणें
मंत्रजपाहुन ते थोर
एक वस्त्र वा रंगविणे
तव पांडित्याहुन थोर
शेतकरी, तसे विणकरी, तसे रंगारी, बना देशाचे
आळशी न कुणी कामाचे, यापुढे।।
एक नीट मड़के करणें
तव व्याख्यानाहुन थोर
एक नीट जोडा शिवणें
तव श्रीमंतीहुन थोर
चाकास धाव बसविणें
तव विद्वत्तेहुन थोर
कुंभार, तसे चांभार, तसे लोहार बना देशाचे
आळशी न कुणी कामाचे, यापुढें।।


हा आता आपला मंत्र, ही आहे भारतीय संस्कृती.

बेंजामिन फ्रँकलिन इंग्लंडमधून अमेरिकेत जेव्हा परत गेला, तेव्हा त्याला विचारण्यात आले, “इंग्लंडात काय पाहिलेस ?”

बेंजामिन म्हणाला, “इंग्लंडमध्ये सारे लोक उद्योगी आहेत. तेथे प्रत्येकजण काही ना काही करीतच असतो. इंग्लंडमध्ये वारा ; वाफ वगैरेंनाही कामाला लावण्यात आले आहे, पवनचक्क्या फिरत असतात, वाफेने यंत्रे चालत असतात. इंग्लंडमध्ये सारे श्रमजीवी लोक आहेत. येथे एकच जंटलमन मला दिसला.”

“कोण तो ?” सर्वांनी एकदम विचारले.

बेंजामिन म्हणाला, “पिग्- (डुक्कर) ! हे डुक्कर मात्र काही काम करीत नव्हते. घूं घूं करीत भराभरा विष्ठा खात हिंडत होते !”

बेंजामिन श्रम न करणा-याला डुक्कर म्हणत आहे. शिष्ट मनुष्याला, जंटलमनला बेंजामिन काय पदवी देत आहे ते पाहा. बेंजामिन श्रमहीनास सूकर म्हणत आहे. परंतु आपल्या देशात श्रमहीनास देव समजण्यात येत असते. अमेरिका वैभवात का व आपण दारिद्र्याच्या गर्तेत का हे यावरून दिसून येईल.

पूज्य शेतक-याला आपण धिक्कारीत आहोत, हरिजनांना बहिष्कृत करीत आहोत आणि कर्महीन श्रीमंतांना वा धर्माच्या नावाने सर्वांना लुबाडणा-यांना, भ्रष्टाकार माजविणा-यांना, स्त्रियांची पातिव्रत्ये धुळीस मिळविणा-यांना पूजीत बसलो आहोत. अतःपर भारतीय संस्कृतीच्या उपासकांनी हा बावळटपणा, हा मूर्खपणा, करंटेपणा, दूर फेकून दिला पाहिजे. धुळीत काम करून मळलेला हा सर्वांहून मंगल व पवित्र असे मानावयास शिकले पाहिजे. आपणांस वाटत असते, धुळीत मळलेला मनुष्य अमंगळ. परंतु त्याचा कोठा स्वच्छ असतो. त्याला अंतःशुद्धी असते. याच्या उलट, बाहेरचे कपडे परीटघडीचे वापरणारा, अंगाला रोज साबण लावणारा, केस विंचरणारा, असा हा बाह्य स्वच्छतेचा पुतळा- परंतु त्याचे पोट तपासून पाहा. त्याच्या पोटात सारी घाण. त्याला सदैव अपचन व अजीर्ण. त्याच्या शौचाची सदैव तक्रार. त्याला बद्धकोष्ठाची व्यथा. श्रम करील तर ना कोठा स्वच्छ राहील !

सर्वजण विचार करा. भारतीय संस्कृतीचा आत्मा ओळखा. गीतेचे अंतरंग पाहा. घोड्याचे खरारे करणारा व पीतांबराचा तोबरा करून त्यातून घोड्यांना चंदी चारणारा तो गोपालकृष्ण डोळ्यांसमोर आणा, आणि जीवनाला शुद्ध वळण द्या. आजचा हा रडका संसार सुखमय, समृद्ध व आनंदमय करा. भारतीय संस्कृतीची उपासना करणारे राष्ट्र कधी दारिद्री व दास होणार नाही. ख-या सद्धार्माजवळ श्री, वैभव, जय, ही ठेवलेलीच असतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel