हिंदू लोकांनी मूर्तिपूजेचा जरी असा विकास केला नसला, असा विकास करण्याकडे जरी त्यांचे लक्ष नसले, तरी इतर धर्मीयांपेक्षा अधिक विकास त्यांनी केला आहे. हिंदुधर्मापेक्षा इतर धर्मांतच मूर्तिपूजा अधिक आहे. हिंदुधर्मातील मूर्तिपूजेपेक्षा इतर धर्मीयांची मूर्तिपूजा कमी उदार आहे. उदाहरणार्थ, ख्रिस्ती लोकांचा क्रॉस किंवा मुस्लिमांचा काबा यांच्यातही हिंदुधर्मी मनुष्य पावित्र्य पाहील. जशी माझी शाळिग्रामाची मूर्ती तशी ही त्यांची, असे हिंदू म्हणेल. माझ्या रामाच्या त्या अडीचहाती मूर्तीबाहेर जगात कोठे पावित्र्य नाही असे हिंदु मनुष्य म्हणणार नाही; परंतु याच्या उलट, क्रॉसला पवित्र मानणारा ख्रिश्चन मनुष्य रामाच्या मूर्तीत पावित्र्य पाहू शकणार नाही. काबाला भजणारा मुसलमान हनुमंताच्या मूर्तीला पवित्र मानणार नाही. आपल्या धर्माची प्रतीके, आपल्या धर्मातील चिन्हे यांच्या पलीकडे जगात पावित्र्य असू शकेल, अशी कल्पनासुध्दा त्यांना सहन होत नाही ! क्रॉस एवढेच काय ते सत्य, काबा एवढेच काय ते सत्य, असे समजतात. त्या मूर्तीच्या, त्या चिन्ह्यांच्यापलीकडे त्यांना जाता येत नाही. अशा रीतीने पाहिले म्हणजे इस्लामी मनुष्य, ख्रिश्चन मनुष्य, हेच केवळ आकारपूजक, अत्यंत संकुचित मूर्तिपूजक आहेत असे दिसून येईल. हिंदू त्या आकारांच्या पलीकडे जाऊन अन्य मूर्तीही तितक्याच पवित्र मानू शकतो.

मूर्तिपूजा कधीपासून सुरू झाली ? मनुष्य जन्मल्यापासून. सूर्याची पूजा, समुद्राची पूजा, झाडांची पूजा, सर्पांची पूजा, हे पूजाप्रकार अनादी आहेत. परंतु दगडांचे आकार करून, मंदिरे करून, मूर्तिपूजा केव्हापासून रूढ झाली ? बहुतेक सारे म्हणतात, की बुध्दांच्या निर्वाणानंतर ही मंदिरी मूर्तिपूजा अस्तित्वात आली. बुध्दाच्या निधनानंतर त्याचे शेकडो पुतळे तयार झाले. निरनिराळ्या संघारामांतून बुध्दाच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या. बौध्दधर्माला आत्मसात करून घेतल्यानंतर हिंदुधर्माने तीच प्रथा उचलली. शेकडो देवतांची शेकडो मंदिरे झाली.

पाषाणमयी आकारांची पूजा बुध्दांपासून सुरू झाली असली, तरी मूर्तिपूजा ही सनातन आहे, हे विसरून चालणार नाही. शिल्पकलेचा विकास झाल्यावर महान विभूतींचे सदैव स्मरण राहावे, म्हणून त्यांच्या मूर्ती करण्यात येऊ लागल्या, पुतळे होऊ लागले. थोर पुरूष कसे दिसत हे समजण्याची सर्वांस उत्कंठा असते. परमेश्वरही कसा असेल याची आपण कल्पना करू लागलो. आपणांस दोन हात आहेत, त्याला चार असतील; आपणांस एक तोंड आहे, त्याला चार असतील; अशा कल्पना मनुष्य करू लागला. परंतु परमेश्वराची खरी मूर्ती कोण कल्पिणार ?
नमो स्त्वनन्ताय सहस्त्रमूर्तये
सहस्त्रपादाक्षिशिरोरुबाहवे ।
सहसत्रनाम्ने पुरुषाय शाश्वते
सहसत्रकोटीयुगधारिणे नम: ॥

हेच शेवटी स्वरूप ठरविण्यात आले.

परमेश्वराची तरी कल्पना आपण कशावरून करावयाची ? वायरन कवी म्हणतो, 'देवा ! समुद्र हे तुझे सिंहासन आहे !' या भव्य सिंहासनावरून सिंहासनावर बसणा-या राजाधिराजाची कल्पना करावयाची. सृष्टीत ज्या थोर वस्तू दिसतात त्यातून परमेश्वराच्या अपार वैभवाची आपणांस कल्पना येते. म्हणून त्या वस्तूंचीच भगवंत म्हणून आपण पूजा करतो. सागरावरून परमेश्वराच्या वैभवाची कल्पना येते. म्हणून वाटते, की सागर ही ईश्वराची एक मूर्ती आहे. सागराला पाहून आपण हात जोडतो. अनंत लाटांनी अहोरात्र उचंबळणारा, सतत गर्जना करणारा असा जो सागर त्याला प्रणाम नाही करायचा तर मग कोणाला करावयाचा ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel