“नाही; ही येथे एक काडी आहे ती उडवून दाखवा बरे.” देवतेने सांगितले.

वा-याने सारी शक्ती एकवटली. परंतु ती क्षुद्र काडी त्याला जागची हालविता आली नाही. वारा लज्जेने खाली मान घालून निघून गेला! अशा रीतीने ते सारे भांडखोर अहंमन्य देव फजित झाले. शेवटी ती अध्यात्मदेवता उमा त्या देवांना म्हणाली, “अरे वेड्यांनो, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ असे भांडता काय? कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही. त्या विश्वशक्तीने इंद्राच्या ठिकाणी पाऊस पाडण्याची शक्ती ठेवली आहे, म्हणून इंद्र पाऊस पाडू शकतो. अग्नीच्या ठिकाणी जाळण्याची शक्ती ठेवलेली आहे, म्हणून अग्नी जाळतो. वा-याच्या ठिकाणी वाहण्याची शक्ती ठेवलेली आहे म्हणून वारा वाहतो. त्या विश्वशक्तीने ती शक्ती जर काढून घेतली, तर तुम्ही शून्य आहात, मढी आहात. त्या त्या शक्तीचा अहंकार नका बाळगू. त्या त्या विशिष्ट शक्तीमुळे दुस-यास हीन नका समजू.”

ही गोष्ट अत्यंत बोधप्रद आहे. ज्ञान देणा-या ऋषीने रस्ता झाडणा-या झाडूवाल्यास तुच्छ लेखू नये. चित्रकाराने गवयास हीन समजू नये. कुंभाराने विणकरास कमी समजू नये. आपण सर्वांना एकमेकांस रामराम करावयाचा. रामराम म्हणजे काय? तू राम व मी राम! तूही पवित्र व मीही पवित्र!

“हे मलमूत्र नेणा-या भंगीदादा, तू राम आहेस. हा प्रणाम घे.” असे सदगदित होऊन ऋषी म्हणेल.

“हे दिव्य ज्ञान देणा-या ऋषे! माझा प्रणाम घे. तूही रामच आहेस.” असे भंगी गहिवरून नम्रपणे म्हणेल.

“रामराम”, “सलाम आलेकूं, आलेकूं सलाम” असे म्हणत सर्वांनी आनंदाने नांदावयाचे आहे.

परंतु भगवान श्रीकृष्णांची ही थोर दृष्टी भारतवर्ष विसरला. संतांचे दिव्य जीवनकर्म सारे विसरले; आणि श्रेष्ठ-कनिष्ठपणाचे वाद समाजात माजून सारा समाज पोखरला गेला. बुद्धिजीवी आणि श्रमजीवी असे समाजपुरुषाचे तुकडे पाडण्यात आले, बुद्धिजीवी स्वत:ला श्रेष्ठ समजू लागले. श्रमजीवी मनुष्याला सारे हीन समजू लागले. संपत्ती निर्माण करणारा तुच्छ मानला जाऊ लागला. गादीवर बसून संपत्तीचा उपभोग घेणारे देवाप्रमाणे मानले जाऊ लागले.

रामायणात एक लहानशी गोष्ट आहे. रामचंद्र ज्या वेळेस शबरीला भेटावयास आले, त्या वेळचा तो प्रसंग आहे. ज्या वनात राम बसले होते, त्या वनात सर्वत्र फुले फुलली होती. ती फुले कोमेजत नसत, सुकत नसत, सदैव मधुर गंध त्यांचा सुटलेला असे. राम शबरीला म्हणाले, “ही फुले कोणी लावली?”

शबरी म्हणाली, “रामा, त्याचा इतिहास आहे.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel