नचिकेता प्रत्यक्ष मृत्यूजवळही ज्ञानाचीच भिक्षा मागता झाला; याच्याहून ज्ञानाची थोरवी आणखी कोणती असावी? ज्ञानासाठी मृत्यूजवळही जावे लागेल! ज्ञानाला कशाची भीती नाही. ज्ञान मिळवू पाहणा-या सा-या त्रिखंडात जाईल व त्यासाठी वाटेल तो त्याग करावयास तयार होईल.

समाजाला नवविचार देणे म्हणजे फार थोर साधनाच आहे. विचाराचा डोळा समाजाला देणे याहून धन्यतर दुसरे काय आहे? चिंतन करून आपणास जो विचार सुचला, त्याला पूज्य मानून तो सदैव प्रकट केला पाहिजे. त्याची वाढ केली पाहिजे, तो सर्वांसमोर निर्भयपणे मांडला पाहिजे. तो सोडता कामा नये.

ज्ञानाचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल. त्या त्या बाह्यांगाची पूजा करण्यासाठी मनुष्य नि:स्वार्थपणे कसा धडपडतो आहे, ते पाहिले पाहिजे. ज्ञानाचे बाह्यांग व्याकरण असेल. व्याकरणरूपी परब्रह्माची एखादा पाणिनी अहोरात्र पूजा करू पाहील. त्या पाणिनीस भगवान ही पदवी भारतीय संस्कृती देईल. शंकराचार्य पाणिनीचा उल्लेख भगवान पाणिनी असा सदैव करतात. पाणिनी ज्ञानाच्या एका स्वरूपात रमले. त्यांना दुसरेतिसरे काहीच सुचत नव्हते, रुचत नव्हते. व्याकरण म्हणजे त्यांचा वेदान्त. जे कोणी येतील त्यांना ते व्याकरण शिकवीत. एके दिवशी तपोवनात ते व्याकरण शिकवीत असता एकदम एक वाघ आला. वाघाला पाहून पाणिनी पळाले नाहीत. वाघाला पाहून व्याघ्र शब्दाची ते व्युत्पत्ती सांगू लागले! वाघ हुंगत हुंगत येत होता. पाणिनी म्हणाले, “वास घेत घेत येणारा हा पाहा वाघ.” “व्याजिघ्रति स व्याघ्र:” पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केव्हाच पळून गेले होते! वाघाने पाणिनीवर झडप घालून त्यांना खाऊन टाकले! ज्ञानाची किती थोर उपासना! ज्ञानाची उपासना करणारा सर्व काही विसरून जातो. त्याच त्या विचारांशी तो तन्मय होतो. त्याची जणू समाधी लागते. समाधी म्हणजे सर्वत्र ध्येयाचाच साक्षात्कार होणे. समाधी म्हणजे ध्येयेतर सृष्टीचे विस्मरण! समाधी म्हणजे सर्व सृष्टीचे विस्मरण नव्हे.

ज्ञानाचा प्रांत कोणताही असो, त्या ज्ञानाच्या पाठोपाठ जाऊन त्या बाबतीत शेवटचे टोक जो गाठतो, परमोच्च स्थान जो मिळवतो, तोच ऋषी. ज्याची पैशावर किंवा सुखावर दृष्टी असते, तो अशा फंदात कधी पडणार नाही. तपस्वीच ज्ञान देतात. ज्ञान देतात. ज्ञान असो वा विज्ञान असो, ते सिद्ध करण्यासाठी, जीवनात आणण्यासाठी महात्मेच मरतात. ज्ञानोपासक सारखा पुढे जाईल. ज्ञानदेवाचे दर्शन घेतल्याशिवाय तो थांबणार नाही. जीवनाच्या नानाविध क्षेत्रांत अपार संशोधनास वाव आहे. भारतीय संस्कृती त्या त्या संशोधकाचा सन्मान करावयास उभा आहे. ज्ञानसंशोधनात खाणेपिणे विसरणारा न्यूटन हा ऋषीच होता. पन्नास वर्षे अध्ययन करून, विचार करून नवदृष्टी देणारा कार्ल मार्क्स हा महर्षीच आहे. जगाच्या विचारात क्रांती घडविणारा चार्लस् डार्विन याला ऋषी कोण म्हणणार नाही? इंग्लंडमधील एका झोपडीत राहून सहकार्याने नवीन नवीन मार्ग जगाला दाखविण्यासाठी धडपडणारा तो हद्दपार झालेला थोर क्रॉपोटकिन्-त्याला ऋषी म्हणावयाचे नाही तर कोणाला?

भारतीय संस्कृती या सर्वांची पूजा करील. रवीन्द्रनाथ टागोरांनी जगातील ऋषींची भारत आपलेपणाने पूजा करतो, हे विश्वभारती विद्यापीठ काढून दाखविले आहे. जागीतल महान आचार्यांना ते तेथे बोलावून घेत होते व त्यांचा सन्मान करीत होते. रवीन्द्रनाथ भारतीय संस्कृतीचा आत्मा ओळखीत होते. भारतीय संस्कृतीचे ते खरे उपासक होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel