चार आश्रम

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.

मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा चार पाय-या सांगितल्या आहेत. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम. संन्यास हे अंतिम ध्येय. शेवटी केवळ अनासक्त जीवन हे प्राप्तव्य. परंतु त्या ध्येयांकडे हळूहळू जाण्यासाठी पहिले तीन आश्रम आहेत. हळूहळू निर्वासन व्हावयाचे, निवृत्तकाम व्हावयाचे.

जन्मत: मनुष्य तीन ऋणे डोक्यावर घेऊन येतो. असे भारतीय संस्कृती सांगते. ऋषिऋण, पितृऋण व देवऋण. ही तीन ऋणे आपणांस फेडावयाची असतात. ब्रह्मचर्याश्रमात उत्कृष्ट ज्ञान संपादून आपण ऋषिऋण फेडतो. पुढे गृहस्थाश्रमात संतती निर्माण करुन तिचे नीट संवर्धन करुन आपण पितृऋण फेडतो, आणि वानप्रस्थ व संन्यास या दोन आश्रमांच्या द्वारा सर्व समाजाची सेवा करून आपण देवऋण फेडतो. देव सर्व सृष्टीसाठी आहे. देवाचे ऋण फेडावयाचे म्हणजे आपणही सर्वांचे व्हावयाचे.

ब्रह्मचर्याश्रमात मुख्यत: ज्ञानाची उपासना. उपनयन झाल्यापासून ब्रह्मचर्याला सुरुवात होते. उपनयन म्हणजे ब्रह्मचर्याची दीक्षा. ब्रह्मचर्य कोणत्यातरी ध्येयासाठी असते. ध्येयहीन ब्रह्मचर्य निरर्थक आहे. ध्येयहीन ब्रह्मचर्य टिकतही नाही. ज्ञानासाठी ब्रह्मचर्य. गुरुजवळे जोपर्यत शिकत आहोत तोपर्यत ब्रह्मचर्याची कास बळकट करून ठेविली पाहिजे.

उपनयानाच्या वेळेस सर्व ब्रह्मचर्याचाच माहिमा आहे. सारी प्रतीके ब्रह्मचर्याची द्योतक आहेत. कमरेला तीनपदरी मौंजीमेखला बांधावयाची, कौपीन नेसवावयाचे, यात  कोणता अर्थ आहे? कमर बळकट ठेव. तुला ज्ञान मिळवावयाचे आहे. विषयवासना मारून ठेव, तिला बांधून ठेव, लंगोटबंद गडी राहा. ब्रह्मचारी बटूला मेखला लेवविताना जे मंत्र म्हटले जातात ते मोठे सुंदर आहेत:

इयं दुरुक्तत्परिबाधमानात्
शर्म वरुथं पुनती न आगात्
प्राणापानाभ्यां बलमाभरतन्ती
प्रिया देवांना सुभगा मेखलेयम् ॥
ऋतस्य गोप्त्री तपस: परस्पी
घ्नती रक्षस:सहमाना अराती
सा न :समन्तमनु परेहि भद्रया
भर्तारस्ते मेखले मा रिषाम ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel