शिळासप्तमीच्या दिवशी मातीच्या चुलीची पूजा आहे. त्या दिवशी चूलमाईला विश्रांती. आदल्यादिवशीचे शिळेच त्या दिवशी खावयाचे. वर्षभर ती मातीची वा दगडाची चूल आपणासाठी तापली, एक दिवस तरी कृतज्ञतेने तिचे स्मरण करू या. या शिळासप्तमाच्या दिवशी चूल सारवतात, तिला नीट लिंपतात. नंतर लहानसा आंब्याचा रोपा चुलीमध्ये लावतात. तापलेल्या चूलमाईला आंब्याची शीतल छाया ! मातीच्या निर्जीव चुलीबद्दलची किती कृतज्ञता !

शिळासप्तमीप्रमाणेच दिव्याची अवस. जो दिवा आपल्यासाठी जळतो, अंधारात प्रकाश देतो, जो दिवा आपल्यासाठी तेलकट होतो. ओशट होतो, जो दिवा आपल्यासाठी तापतो, काळा होतो, त्या दिव्याबद्दल कृतज्ञता दाखविण्याचा हा दिवस. प्रकाशाइतके पवित्र काय आहे? सूर्य, अग्नी यांची भारतीय संस्कृतीत फार माहिती आहे. प्रकाश देणा-या दिव्याचे उतराई कसे व्हावयाचे? रोज संध्याकाळी दिवा लावताच त्या प्रकाशाला आपण प्रणाम करतोच. दिव्याला प्रणाम करून आपण प्रकाशात असलेले सारे एकमेकांसही प्रणाम करतो. सायंकाळी ‘दिव्या दिव्या दिपोत्कार’ अशी गाणी म्हणतो. परंतु वर्षातून एक विशिष्ट दिवसही त्या दिव्याबद्दल कृतज्ञता प्रकट करण्यासाठी नेमला आहे. त्या दिवशी दिव्याची पूजा; दिव्यांचे महत्व.

हातातून भांडे पडले किंवा भांड्यावर भांडे आपटले, तर लगेच ‘नाद धरा’ असे आपण म्हणतो. जणू ते भांडे रडत असते ! ह्या दु:खी भांड्याला उगी करावयाचे. त्या भांड्याच्या वेदना ओळखायच्या.

अशा प्रकारची ही प्रेममयी भारतीय संस्कृती आहे. नागपंचमीचा दिवस योजून त्या तेजस्वी. धगधगीत, स्वच्छ, संयमी अशी नागाचीही पूजा करावयास सांगण्यात आले आहे. नाग आधी रानावनांत राहतो. परंतु पावसाळ्याचे त्याचे भवन पाण्याने भरून गेले तर तुमच्या वळचणीस क्षणभर येऊन तो बसतो. क्षणभर आश्रय मागावयास आलेला जणू तो अतिथी असतो. त्याला वनात राहणेच आवडते. त्याला पावित्र्य आवडते. स्वच्छता आवडते, सुगंध आवडतो. तो फुलांजवळ वास करील, केतकीजवळ जाईल. चंदनाला विळखा घालील ! होताहोईता नाग चावणार नाही. परंतु चावला म्हणजे मात्र मरण ! वर्षानुवर्षे श्रम करून मिळवलेले सामर्थ्य तो उगीच व्यर्थ दवडीत नाही. म्हणूनच त्याच्या दंशात अमोघपणा असतो.

नाग शेताची राखणही करतात. उंदीर वगैरे शेतास लागू देत नाहीत. नागांचा हाही एक उपकारच म्हणावयाचा. अशा नागालाही त्या दिवशी पूजावयाचे, त्याच्या वारूळाजवळ दूध, लाह्या नेऊन ठेवावयाच्या. विषारी सर्पातीलही चांगुलपणा पाहावयास भारतीय संस्कृती सांगत आहे.

व्यापक जीवनाकडे पाहावयाची अशी ही भारतीय दृष्टी आहे. नद्यांचे उत्सव करा, त्यांची पूजा करा, त्यांना पाहून प्रणाम करा. कारण नद्यांचे अपार उपकार आहेत. गोवर्धन पर्वताची पूजा करा. कारण पर्वतांवर, डोंगरावर गायींचे वर्धन करणारे गवत होते, पर्वतांवरच्या पाण्याच्या नद्या होतात. पर्वताची माती धुऊन खाली येते व शेते सुपीक होतात. पर्वत उपकारक आहेत.

नद्यांना आपण माता म्हणतो. त्यांच्या जीवनरसाने आपण जगतो. आईचे दूध नसले तरी चालेल, परंतु ह्या आपोमातांचे पय पाहिजे. नद्यांची नावे आपण आपल्या मुलींना ठेवतो. नद्यांना आपण कधी विसरणार नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel