आपल्या आवडीनुसार कोणतेही सेवेचे कर्म आपण उचलावे व तद्द्वारा समाजदेवाची पूजा करावी. सेवेची सर्व कर्मे पवित्र आहेत. कोणतेही सेवाकर्म तुच्छ नाही, हीन नाही. वर्णामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ-भाव नाही. सारे वर्ण देवाघरी सारख्याच योग्यतेचे सर्व कर्मांची सारखीच किंमत.

समाजाला तत्कालानुरूप नवविचार देणारा पुरुष जितका थोर, तितकाच समाजाला धान्य देणारा शेतकरीही थोर. समाजाचे रक्षण करणारा योद्धा जितका थोर, तितकाच समाजाला मोट करून देणारा चांभारही थोर. शाळेतील शिक्षक जितका थोर, तितकाच रस्ता झाडणारा झाडूवालाही थोर. ह-दय ओतून विचारपूर्वक केलेले कोणतेही सेवाकर्म मोक्ष देणारे आहे.

गीतेमध्ये मोक्ष मिळविण्याचे साधन म्हणून स्वकर्म सांगितले आहे:

“स्वकर्मकुसुमीं त्यास पूजितां मोक्ष लाभतो।”

ईश्वराला दुस-या फुलांची आवड नाही. तुमची दैनंदिन होणारी हजारो कर्मे म्हणजेच फुले. ही कर्मफुले रसमय, गंधमय आहेत की नाहीत एवढे पाहणे म्हणजेच खरा धर्म.

हे स्वकर्म प्रत्येकाचे भिन्नभिन्न असू शकते. असणारच. ईश्वर एकाच मासल्याची माणसे उत्पन्न करीत नाही. ईश्वराची प्रतिमा दुबळी नाही. शेकडो गंधांची व रंगांची फुले तो फुलवितो. शेकडो गुणधर्माची माणसेही तो या जगदुद्यानात पाठवितो. बागेत शेकडो फुले असतात; परंतु कोणते फूल थोर, कोणते अधिक योग्यतेचे? बागेत एकाच रंगाची व एकाच गंधाची फुले आपणांस आवडणार नाहीत. गुलाब, मोगरा, जाई-जुई, शेवंती यांच्याबरोबरच झेंडू, तेरडा ही फुलेही हवीत. प्रत्येकाचा रंग निराळा, गंध निराळा. सर्वांमुळे बाग नयनमनोहर दिसते. त्या फुलांच्या भोवती हिरवे हिरवे गवतही पाहिजे. गवताला ना फूल, न फळ; परंतु ते हिरवे गवत- ते साधे गवत- तेथे नसेल तर ती फुले शोभणार नाहीत.

मानवी समाजात एकाच वर्णाचे सारे असतील, तर किती नीरस होईल ते जीवन! सारेच गाणारे, सारेच वाजविणारे, सारेच शास्त्रज्ञ, सारेच कुंभार- असे जर असेल तर समाज चालणार नाही. समाजात आनंद दिसणार नाही. विविधतेत आनंद आहे. परंतु ही विविधता सा-या समाजासाठी आहे.

या विविधतेत तेव्हाच आनंद राहील,- ज्या वेळेस खोटे श्रेष्ठ-कनिष्ठपणाचे भाव समाजात माजणार नाहीत. भारतीय संस्कृतीत ज्या वेळेपासून वर्णावर्णात श्रेष्ठ-कनिष्ठपणाचे बंड घुसले, त्या वेळेपासून संस्कृती पोखरली जाऊ लागली. समाजाचा अध:पात आतून नकळत हळूहळू सुरू झाला. भगवान श्रीकृष्णाने स्वत:च्या कृतीने दाखविले आहे. श्रीकृष्णाने गाई चारल्या, घोडे हाकले, शेणगोळे फासले, उष्टी उचलली, गीताही सांगितली! प्रत्येक कर्म पवित्र आहे अशी त्या महापुरुषाने घोषणा केली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel