देवांना शेंदूर लावावयाचा, याच्या मुळाशीही हिंसाबंदीप्रयोग आहे.  ज्याचा बळी द्यावयाचा, त्याच्या रक्ताने देवाला लाल स्नान घालावयाचे. हजारो बलिदाने होत असतील व देव लाल होऊन जात असेल. नारळाच्या पाण्याने देव थोडाच लाल होणार ? म्हणून देवाला लाल रंग देण्यात येऊ लागला. देवावर रक्ताचा अभिषेक करून त्या रक्ताचा टिळा स्वत:च्या कपाळाला लावीत. आता देवाच्या अंगच्या शेंदराचे बोट भक्त कपाळाला लावतात ! आपण भोजनपंक्तीत अद्याप लाल गंध ठेविले आहे. ते लाल गंध म्हणजे यज्ञीय बलिदानातील रक्ताची आठवण आहे. ती अद्याप आपण विसरू इच्छित नाही ! रक्ताचा विसर मानवाला पडेल तो सुदिन!

मांसाशननिवृत्तीचा हा प्रयोग अशा रीतीने चालत आलेला आहे. त्याच्यासाठी नवीन नवीन कल्पना मांडाव्या लागल्या. बहुजन समाजाला चुचकारून वळवावे लागले, मनाच्या कल्पनेचाही विकास झाला. त्रिसुपर्णाच्या मंत्रात तर

“आत्मा यजमान: श्रद्धा पत्नी, मन्यु: पशु:”

अशी भव्य कल्पना यज्ञाची मांडली आहे. त्रिसुपर्णाचा ऋषी म्हणतो, “ अरे, बोकड काय बळी देता? तुमचे नाना विकार हेच पशू आहेत. या वासनाविकारांचे बळी द्या.”

तुकारामांच्या एका अभंगात आहे:

एकसरें केला नेम । देवा दिले क्रोधकाम

हे कामक्रोधरूपी पशू सारखे थैमान घालीत आहेत. आपण त्यांना बांधू व कापू त्यांच्या मुंड्या. देवाला हे बलिदान सर्वांत आवडेल. आपणाला कोकराचे मांस आवडते, म्हणून देवाला कोकरू देऊ लागलो. आपण मधुदधिदुग्धघृत यांचे भक्त होताच देवाला पंचामृत मिळू लागले. जे आपणांस आवडते ते आपण देवाला देतो. परंतु आपणाला सर्वांत आवडणारी जर कोणती गोष्ट असेल, तर आपल्या वासना. आपण आपल्या वासनांचे गुलाम असतो. वासनांचा त्याग करवत नाही. अशा ज्या या अनंत वासना, त्यांचेच बलिदान कर. देऊन टाक हे विकार देवाला. या मन्युपशूचे हनन कर, हवन कर, म्हणजे मोक्ष दूर नाही !

निरनिराळे प्रयोग, यज्ञाच्या या भव्य उत्क्रान्त कल्पना, सतत प्रचार इत्यादींमुळे व विभूतींच्या जीवनमात्राबद्दलच्या प्रत्यक्ष कृतीत प्रकट झालेल्या अपार प्रेमामुळे भारतवर्षांत मांसाशननिवृत्ती झपाट्याने होऊ लागली. हिंदुस्थानभर वैष्णवधर्माची जी प्रचंड लाट तेराव्या-चौदाव्या शतकापासून उठली, तिनेही हेच काम पुढे चालविले. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात मांसाशन निवृत्तीवर कटाक्ष असे. वारक-याच्या व्रतात मांसाशनास थारा नाही. संतांच्या प्रचंड चळवळीमुळे लाखो लोक मांसाशनापासून परावृत्त झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel