आज राष्ट्रीय ध्येयासाठी झगडणारे लोक दिसत नाहीत. सर्वत्र निराशा, औदासीन्य, निरुत्साहता. मी ज्ञान मिळवीन, मी शरीर कमवीन, मी मोठा होईन, असे तरुणांच्या मनातच येत नाही. महत्वाकांक्षा सर्वत्र मेलेली. खेळात उत्साह नाही. अभ्यासात उत्साह नाही. राष्ट्र कसेतरी जगत आहे. तरुण कसेतरी वागत आहेत. ब्रह्मचर्याचा -हास हे एक बलवत्तर कारण या सर्वागीण दैन्याचे आहे.

उत्कृष्ट ब्रह्मचर्यामधूनच उत्कृष्ट गृहस्थाश्रम सिघ्द होत असतो. माझे ब्रह्मचर्य उत्कृष्ट नसेल तर माझा गृहस्थाश्रमही रडकाच व्हावयाचा. मानसिक, बौध्दीक व शारीरीक सामर्थ संपादून जर मी गृहस्थाश्रमात पडेन, तरच माझ्या गृहस्थाश्रमात तेज येईल, तरच माझा गृहस्थाश्रम सुखाचा होईल.

पतिपत्नींची शरीरसंपदा उत्कृष्ट नसेल, तर बाळसेदार मुले कशी घरात दिसणार?  रोगी, चिरचिरी मुले पाहणे म्हणजे मायबापांस केवढे दु:ख! लहान मुलाच्या हास्याइतके पवित्र दुसरे काय आहे?  त्या हास्यात अपार सामर्थ्यं असते. त्या हास्याने कठोर हृदये मृदू होतात. त्या हास्याने दु:ख एका क्षणात पळते. एकदा एका स्टेशनावर मी पुढील प्रसंग पाहिला आहे: एक माता आपला मुलगा खांद्यावर घेऊन जात होती. तिचा पती व इतर बरीच मुलेबाळे बरोबर होती. त्या मुलाचे प्रसन्न मुखकमळ पाहून तो तिकीट पाहणारा अगदी गार झाला. त्याने तिकटे किती आहेत. वगैरे विचारले नाही. तो पिता तिकिटे मोजून घ्या असे म्हणताच तो तिकिट पाहणारा म्हणाला, ''असा गोड मुलगा पाहिल्यावर तिकिटे मी कशी मोजू?  जा, सारेजण जा. '' परंतु अशी हसरी, गोजिरवाणी मुले पतिपत्नींच्या पूर्वाश्रमींच्या दृढ ब्रह्मचर्यातूनच उत्पन्न होत असतात. ज्या जमिनीचा कस गेलेला नाही तेथे भरदार मनगटासारखी कणसे येतात. त्याचप्रमाणे ज्यांच्या जीवनाचा कस गेलेलस नाही, त्यांच्याच जीवनात अशी तजेलदार फुले फुलतात.  गृहस्थाश्रम म्हणजे सर्व समाजाचा आधार. गृहस्थाश्रम भविष्यकाळ निर्मीत असतो. गृहस्थाश्रम म्हणजे समाजाची धारणा. गृहस्थाश्रमाची थोरवी सर्वांनी गाइली आहे.

धन्यो गृहस्थाश्रम:।

'हा गृहस्थाश्रम धन्य आहे. ' परंतु अशी धन्यता फुकाफुकी लाभत नसते. ती प्रयत्नसाध्य आहे, कष्टसाध्य आहे.
गृहस्थाश्रमात पतिपत्नींची शरीरे सुंदर, निरोगी हवीत. त्याचप्रमाणे त्यांची मनेही निरोगी हवीत. पतिपत्नींनी परस्परांशी निष्ठेने वागले पाहिजे. ज्या विवाहविधीने पति; पत्नींचे नाते निर्माण केले गेले, त्या विवाहविधीत काही काही मंत्र फारच सुंदर आहेत. वाङनिश्चयाच्या वेळेस ब्राह्मण म्हणतात:

समानी व आकृती: समाना हृदयानि व:।
समानमस्तु वो मन: यथा व: सुसहासति ॥


''तुमचा हेतु एक असो. तुमची मने एक असोत. तुमची हृदये एकरूप असोत. तुमच्या सर्व संघटनांस सामर्थ्य येईल अशा रीतीने वागा. '' तसेच विवहहोमाच्या वेळेस वर म्हणतो:

द्यौरहं पृथ्वी त्वं सामाहमृक्त्वम्
संप्रियौ रोचिष्णु सुमनस्यमानौ जीवेव शरद:शतम् ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel