असे धर्म सांगतो. हळूहळू तुम्हांला प्रगतीकडे धर्मस्थापनेचे नर घेऊन जात असतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष अर्थ आणि काम यांच्या आरंभी धर्म आहे व अंती मोक्ष आहे. मनुष्याचा प्रयत्न मोक्षासाठी आहे. मोक्ष म्हणजे मोकळेपणा, आनंद, मोक्ष म्हणजे दु:खापासून, चिंतेपासून सुटका. मोक्ष म्हणजे परम सुख, केवळ शांती. हा मोक्ष मिळविण्यासाठी मानवाची धडपड आहे. हा मोक्ष कसा मिळेल?  वासना; विकारांचा केवळ गोळा असा जो दुबळा मानव, त्याला ही परमशांती कशाने मिळेल?

केवळ भोगाने शांती मिळेल का? भोग भोगताना हसणारा व भोगल्यावर रडणारा असा हा मानव आहे. भोगाने खरे सुख नाही. अनिर्बंध मर्यादाहीन भोगात सुख नाही. विधिहीन, व्रतहीन, संयमहीन भोग रडवितो. स्वत:ला रडवितो व समाजासही रडवितो. भोग भोगण्याचे प्रयोग मानवाने करुन पाहिले आहेत. ययातीने सारखा विषयभोगाचा प्रयोग करुन पाहिला. पुन:पुन तो तरुण होत होता. आपल्या मुलांचे तारुण्य तो घेई व पुन:भोग भोगी. परंतु शेवटी कंटाळला बिचारा। हजारो वर्षे हा प्रयोग करुन पुढील सिध्दान्त त्यांने मानवजातीला दिला आहे.

''न जातु काम: कामानामुपभोगेन शाम्यति''


कामाचा वर्षानुवर्ष उपभोग घेतला. तरी काम शान्त होणे शक्य नाही. अग्नीत आहुती दिल्याने अग्नी न विझता अधिकच प्रज्वलित होतो.

तेव्हा हा प्रयोग फसला. मग काय करावयाचे? इंद्रिये तर भोगासाठी लालचावली आहेत.

''इंद्रियांची दीनें । आम्ही केलों नारायणे॥
''

या इंद्रियांचे आपण गुलाम आहोत. ही इंद्रिये एकदम स्वाधीन कशी करुन घ्यावयाची? त्यांना अजिबात  भोग न दिला तर ती वखवखतील आणि संधी सापडताच बेफाम होतील. त्यांना उपाशी ठेवणे, बळजबरीने त्यांना माणसाळविणे हेही कठीण आहे. त्यांना मोकाट व स्वैर सोडणे म्हणजेही नाशकारक आहे. भारतीय संस्कृती सांगते, ''भोग दे, परंतु प्रमाणात दे. बेताने दे. मोजका दे.'' 

अर्थ आणि काम यांच्या पाठीशी धर्म हवा. आधी धर्माचे अधिष्ठान. धर्माच्या पायावर अर्थ; कामाची मंदिरे बांधा. अर्थ आणि काम यांचा सांगाती जर धर्म असेल, तर तेच अर्थ; काम सुखकर होतील. बध्द करणारे न होता मुक्त करणारे होतील. अर्थ आणि काम यांच्यातही अर्थाला प्राधान्य. कारण अर्थ नसेल तर कोठला काम? खायला; प्यायला नाही तर मी मरेन. मग कामोपभोग कोठला? अर्थ म्हणजे कामाची साधने. अर्थशिवाय कामवासना, निरनिराळ्या विषयभोगेच्छा कशा तृप्त होणार ? द्रव्याशिवाय सर्व फुकट. धनधान्यशिवाय काम तडफडून मरेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel