प्रतीके

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिध्द आहे. त्या त्या शास्त्रांचे सूत्रग्रंथ आहेत. थोडक्यात, त्या त्या शास्त्रांचे सिध्दान्त त्या सूत्रांतून ग्रंथित केलेले असतात. प्रतीके म्हणजे संस्कृतीची सूत्रे होत. खरे पाहिले तर प्रत्येक बाह्य क्रिया आंतरिक विचाराचे प्रतीक आहे. मनच शेकडो कृतींतून प्रकट होते. आधी मन लवते, मग बाहेर शिर लवते. आधी हृदय गहिवरते, मग डोळे भरून येतात. आधी मन संतापते, मग हात उगारला जातो. मनाला फुटलेले कोंब म्हणजे क्रिया.

भारतीय संस्कृतीत शेकडो प्रतीके आहेत. त्यांचा अर्थ शोधला पाहिजे. ज्या वेळेस अर्थहीन प्रतीके पूजिली जातात, तेव्हा धर्म यंत्रमय होतो. त्या प्रतीकपूजेचा मग जीवनावर काहीही संस्कार होत नाही. अशी यांत्रिक प्रतीके मग निरुपयोगी वाटतात. नवतरुण त्या प्रतीकांना फेकून देतात. त्या प्रतीकांतील अर्थ सांगा, असे त्यांचे म्हणणे असते. अर्थ दिसताच ते प्रतीक जिवंत वाटते. त्या प्रतीकात सामर्थ्य येते.

या भिन्न भिन्न प्रतीकांकडे अर्थपूर्णदृष्ट्या पाहण्याचा मला नादच लागला आहे. ते अर्थ खरे असतील असे नाही. ते ते प्रतीक निर्माण होताना तोच भाव तेथे असेल असे नाही; परंतु नवीन अर्थ त्या प्रतीकात पाहिला म्हणूनही काही बिघडत नाही. अर्थाचा विकास होत असतो.

कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रधान प्रतीक आहे. सर्व प्रतीकांचा राजा असे कमळास म्हटले तरी चालेल. भारतीय संस्कृतीस कमळाचा सुगंध येत आहे. या कमलपुष्पात कोणता बरे एवढा महान अर्थ आहे ?

ईश्वराच्या सर्व अवयवांना आपण कमळाची उपमा देतो. कमलनयन, कमलवदन, करकमल, पदकमल, हृदयकमल असे म्हणण्यात काय बरे स्वारस्य आहे ? कमळाजवळ अलिप्तपणा हा गुण आहे. पाण्यात असून ते पाण्यावरच राहते, चिखलात बसून चिखलाच्या वर फुलते. कमळ अनासक्त आहे. ईश्वर करून अकर्ता असे आपण वर्णितो. या सर्व जगाचा पसारा तो चालवितो. परंतु अनासक्त रीतीने हा पसारा तो चालवीत आहे. कमळामध्ये अलिप्तता आहे. तसाच दुसरा गुण म्हणजे वाइटातूनही चांगले घेऊन स्वत:चा विकास करून घेणे, हाही गुण आहे. चिखलातूनही रमणीयत्व ते घेते. रात्रंदिवस तपस्या करून आपले हृदय मकरंदाने कमळ भरून ठेविते. सुगंधाने भरून ठेविते.

सूर्याकडे त्याचे तोंड असते. प्रकाश पाहताच ते फुलते. प्रकाश जाताच मिटते. प्रकाश म्हणजे कमळाचा प्राण. भारतीय संस्कृती प्रकाशोपासक आहे. 'तमसो मा ज्योतिर्गमय' ही भारतीय संस्कृतीची आरती आहे.

कमळ शतपत्र आहे, सहस्त्रपत्र आहे. शंभर पाकळ्या, हजार पाकळ्या काही कमळांना असतात. भारतीय संस्कृती हीसुध्दा शतपत्रांची आहे. शेकडो जातिजमाती, अनेक वंश, अनेक धर्म, अनेक पंथ, यांच्यातून सार घेऊन ती वाढत असते. एकेक नवीन पान ती जोडते. भारतीय संस्कृतीचे कमळ अद्याप पूर्ण फुललेले नाही. ते फुलत आहे. विश्वाच्या अन्तापर्यंत ते फुलत राहील. भारतीय संस्कृती अनंत पाकळ्यांचे कमलपुष्प होईल. कारण पृथ्वी अनंत आहे, काळ अनंत आहे, ज्ञान अनंत आहे !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel