आपण त्या दक्षिणेवर तुळशीपत्र ठेवतो. ते रुक्मिणीचे तुळशीपत्र आहे. दक्षिणा रुकाभर असो की दशसहस्त्र रुपये असो, त्या दक्षिणेवर तुळशीपत्र ठेव. ते भावभक्तीचे तुळशीपत्र आहे. पै का रुपया हा प्रश्न नाही. तेथे भाव असला म्हणजे झाले. देव भावाचा भुकेला. ज्या देणगीवर भक्तिभावाचे तुळशीपत्र नाही, ती देणगी मर्यादित आहे. परंतु भावाच्या तुळशीपत्रासह दिलेली दिडकी कुबेराच्या संपत्तीपेक्षा वजनदार आहे.

देवाला पत्री प्रिय आहे. तुळशीपत्र, बिल्वपत्र, दूर्वादळ, यांची देवाला आवड आहे. सामान्य लोकांची कर्मे अशी असतात. त्यांना ना फार गंध, ना फार रंग. परंतु देवाला ही कर्मे प्रिय आहेत. सुगंधी, रसमय असे कर्म एखादा महात्मा देवाला अर्पील. परंतु आपण सारे दुर्बळ जीव. पण आपली ही साधी कर्मे जर निर्मळ असतील, तर ती देवाला थोरा-मोठ्यांच्या कर्मांपेक्षाही आवडतील. संगीततज्ज्ञ मुलाच्या रागदारीपेक्षा लहान मुलाचे अ-कपट बोबडे बोलणे आईला अधिक आवडते.

स्वस्तिक चिन्ह भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे आहे. भिंतीवर आधी स्वस्तिक काढा. स्वस्तिक म्हणजे कल्याण, सर्वांचे शुभ असो, सर्वांचे भले होवो, असा त्या चिन्हाचा भाव आहे.

उपनयनाच्या वेळेस लंगोटी लावतात. कमरेला तीनपदरी मौंजी बांधतात. कमर बांधून विद्येसाठी बाहेर पड. लंगोटी लावणे म्हणजे इंद्रियदमन करणे. लंगोटबंद राहशील तरच गड्या ज्ञान मिळवू शकशील. स्वच्छंद व स्वेच्छाचारी राहून काहीही मिळवता येणार नाही. संयमी हो.

मांडीवर व दंडावर दर्भ कापतात. गुरूकडे सेवा करताना हातपाय झिजून तुटतील, परंतु खंत बाळगू नकोस. गायींच्या पाठीमागे रानात जावे लागेल. तुझे पाय गळतील. पाणी ओढून तुझे हात तुटतील. विद्येसाठी सारे केले पाहिजे. दर्भाच्या, टोकासारखी कुशाग्र बुध्दी मिळवावयाची असेल तर हातपाय हालविल्याशिवाय कसे होईल ?     मौंजीबंधनाच्या वेळेस मातृभोजन असते. इतके दिवस आईजवळ होतो, आता दूर जायचे. ज्ञानासाठी दूर जावयाचे. शेवटचे ते सहभोजन असते. आई वासराला आता दूर करते. इतके दिवस सगुणभक्ती होती. आता निर्गुणभक्ती सुरू व्हावयाची. आता आई मनात. गुरुगृही आता गुरू हीच माउली. नवीन ज्ञानदात्री माउली आता जोडायची.

ब्रह्मचारी, परिव्राजक, संन्यासी या सर्वांच्या हातात दंड हवा. दंडधारी असण्यात खोल अर्थ आहे. दंड ज्याप्रमाणे सरळ असतो, तो वाकत नाही, लवत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मचारी वा संन्यासी यांनी वाकावयाचे नाही. मोहापुढे मान लववावयाची नाही. काम-क्रोध समोर आले, तर त्यांना हाकलून लावावयाचे. विकारांची मस्ती जिरवायची. त्याप्रमाणे ब्रह्मचारी वा संन्यासी कोणाची हांजी हांजी करणार नाही. तो ध्येयनिष्ठ राहील. ध्येयाला सोडणार नाही. ध्येयाला तडजोड माहीत नाही. सत्याला तडजोड माहीत नाही. गृहस्थाश्रम सारी तडजोड आहे. गृहस्थाश्रम म्हणजे तुझे थोडे, माझे थोडे. परंतु ब्रह्मचर्यसंन्यास म्हणजे प्रखरता. तेथे 'त्वया अर्धं मया अर्धं' असला बाजार नाही. तेथे सारे सरळ सीधे काम. ब्रह्मचा-याची वा संन्याशाची मान एका ध्येयासमोर मात्र लवेल. गुरू म्हणजे ध्येयमूर्ती. त्याच्यासमोर लवेल. इतरत्र मात्र ती लवणार नाही. ब्रह्मचर्याचे, संन्याशाचे असे हे धगधगीत तेज आहे. त्या तेजासमोर जग वाकेल, जग लोटांगण घालील. ज्याच्यासमोर वासना-विकारांनी लोटांगण घातले, त्याच्यासमोर कोण लोटांगण घालणार नाही ?

विवाहाच्या वेळेस अंतरपाट धरतात. शेवटची टाळी वाजताच हा अंतरपाट दूर होतो. वधू-वरांत आता अंतर नको. या घटकेपर्यंत अंतर होते; परंतु आता जीवन एकरूप झाले. आता मिळणी झाली. आता तू माझी व मी तुझा. तुझा हात माझ्या हातात, माझा हात तुझ्या हातात. तुझी माळ माझ्या गळ्यात शोभेल, माझी माळ तुझ्या गळ्यात शोभेल. परस्परांस शोभवू, संतोषवू. माझे ते तुझे, व तुझे ते माझे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel