वैश्यवर्ण-कृषिगोरक्षवाणिज्य म्हणजे वैश्यकर्म. परंतु प्रत्येकात शेकडो भाग आहेत. कोणी अफू पेरील, तरी कोणी तंबाखू लावील; कोणी कपाशी पेरील, तर कोणी भुईमूग. कोणी संत्री लावील तर कोणी द्राक्षे लावील. ज्याप्रमाणे शेतीचे शेकडो प्रकार, त्याप्रमाणे वाणिज्याचेही शेकडो प्रकार. हा कापसाचा व्यापारी, हा धान्याचा व्यापारी, हा तुपाचा व्यापारी, हा तेलाचा व्यापारी, हा गिरणीवाला, हा लोखंडवाला, असे शेकडो प्रकार आहेत.

आणि धंदे हजारो प्रकारचे. त्यामुळे हजारो ठिकाणी मजुरी करणारे शूद्रही हजारो कामांत पडतील.

या चार वर्णांत हजारो प्रकार सामावतात. या हजारो प्रकारांतील कोणती गोष्ट मुलाने उचलावी? मुलाने कोणत्या वर्णातील कोणता भाग पूजावा?

वर्ण या शब्दाचा अर्थ रंग असा आहे. आपण म्हणतो की, आकाशाचा वर्ण निळा आहे. मराठीत वर्ण या शब्दापासून वाण हा शब्द आला आहे. “गुण नाही पण वाण लागला” अशी जी म्हण आहे, त्या म्हणीतील वाण शब्दाचा अर्थ रंग हाच आहे. मी अमक्या वर्णाचा आहे, याचा अर्थ मी अमक्या रंगाचा आहे.

देवाने कोणता रंग देऊन मला पाठविले आहे? कोणते गुणधर्म देऊन मला पाठविले आहे? कुहू करणे हा कोकिळाचा जीवनरंग आहे. मधुर सुगंध देणे गुलाबाचा जीवनधर्म आहे. माझ्यातून कोणता रंग, कोणता गंध बाहेर पडणार? कोणत्या रंगाचा विकास मला करावयाचा आहे?

मुलांच्या गुणधर्माचे परीक्षण केल्याशिवाय हे कसे कळणार? कोणता रंग घेऊन बालक जन्मले आहे, याचे शास्त्रीय संशोधन करावयास हवे. समृतींतून असे सांगितले आहे की, आपण जन्मताना सारे एकाच वर्णाचे असतो. आपणांस आधी वर्ण नसतो. वर्ण नसतो म्हणजे काय? वर्ण असतो; परंतु तो अस्पष्ट असतो, अप्रकट असतो. आठ वर्षांचे होईपर्यंत आपण वर्णहीनच असतो. वर्ण कळला म्हणजे उपनयन करावयाचे. वर्ण कळल्याशिवाय उपनयन तरी कसे करावयाचे हा प्रश्नच आहे.

आठ-दहा वर्षांचा मुलगा होईपर्यंत त्याचे गुणधर्म आपणांस कळू लागतात. एखाद्याला वाचनाचीच आवड दिसते. एखादा गातच बसतो. एखादा वाजवीत बसतो. एखादा घड्याळ जोडीत बसतो. एखादा फुलझाडांशी खेळतो. एखादा कुस्ती, मारामारी करतो. एखादा पक्ष्यांना गोफणी मारतो. मुलांच्या भिन्नभिन्न प्रवृत्ती दिसून येतात. मुलांचे भिन्नभिन्न गुणधर्म दिसून येतात.

स्वतंत्र देशांत निरनिराळ्या प्रकारचे शिक्षणप्रयोग होत असतात. मुलांचे वर्णशोधन करण्याचा प्रयत्न होत असतो. एखाद्या दिवाणखान्यात शेकडो वस्तू ठेवतात. तेथे रंग असतात, वाद्ये असतात, यंत्रे असतात, पुस्तके असतात; तेथे बाहेर घोडे असतात, फुले असतात, धान्ये पेरलेली असतात, सायकली असतात; कोणत्या वस्तूबरोबर मुलगा रमतो हे शिक्षकाने पाहावयाचे असते. ही बालफुलपाखरे तेथे सोडून द्यावयाची. हिंडत, फिरत, गुंगत ती कोठे अधिक काळ रमतात ते नमूद करून ठेवावयाचे. पुष्कळ दिवसांच्या निरीक्षणाने त्या मुलाच्या आवडीनिवडी शिक्षकास कळण्याचा संभव असतो. तो शिक्षक मग पालकांस कळवील की, तुमचा मुलगा चित्रकार होईल असे वाटते. तुमचा मुलगा उत्कृष्ट माळी होईल असे दिसते. यांत्रिक संशोधनाची बुद्धी तुमच्या मुलाची दिसते. मुलाचे गुणधर्म कळल्यावर त्या गुणाचा जेथे विकास होईल, तेथे त्याला पाठविणे हे पालकाचे व शिक्षणखात्याचे कर्तव्य ठरते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel