कारणे कोणतीही असोत, त्यांनी फरक केला ही गोष्ट खरी. ते पूर्वज प्रयोग करणारे होते. अमुक नियम अविचल असे ते मानीत नसत. पूर्वी वरचे वर्ण खालच्या सर्व वर्णांशी विवाह करत; वरिष्ठ वर्णाच्या पुरुषाला कनिष्ठ वर्णाच्या मुलीशी धर्ममय लग्न लावता येई. मनुस्मृती ‘भार्या चतस्त्रो विप्राणाम्’ म्हणून सांगते. ब्राह्मण चारी वर्णांच्या स्त्रिया करू शकेल. याज्ञवल्क्याने या बाबतीत बदल केला. तो म्हणाला, “ब्राह्मणाने तीन वर्णांतील मुलींशीच विवाह करावा. शुद्र वधूंशी विवाह करू नये.” असे बदल स्मृतिकार करीत असत.

काही स्मृतींतून पुनर्विवाहास परवानगी आहे; काहींत नाही. कलियुगासाठी म्हणून जी पराशरस्मृती सांगतात, त्या स्मृतीत पुनर्विवाहास संमती आहे. पुण्यातील थोर न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांची गोष्ट प्रसिद्धच आहे. त्यांनी पुनर्विवाहास सम्मती दिली होती. तुळशीबागेत एका स्त्री-कीर्तनकाररिणीने समोर बसलेल्या रामशास्त्र्यांस प्रश्न केला, “रामशास्त्री! पुरुषांना पुन्हा पुन्हा विवाह करण्यास सदैव परवानगी आहे. पहिली पत्नी मरून दहा दिवस झाले नाहीत, तोच दुस-या लग्नाची तो तयारी करू शकतो. मग स्त्रियांनीच असे काय पाप केले आहे? स्त्रियांना पती मेल्यावर जर पुनर्विवाहाची इच्छा झाली तर तशी परवानगी का नसावी?” रामशास्त्री म्हणाले, “स्मृती ह्या पुरुषांनी लिहिल्या. त्यांनी पुरुषांची सुखसोय पाहिली. स्त्रियांच्या सुख-दु:खाची त्यांना काय कल्पना?”

ह्या चालिरीती सर्व बदलत असतात एवढाच याचा अर्थ. परंतु आपला समाज जेव्हा बदल करीत नाही, तेव्हा तो फार मोठी चूक करीत असतो, हे त्याच्या लक्षात येत नाही. जुन्या जीर्णशीर्ण रूढी आज कशा चालतील? लहानपणचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा येईल? अंगरखा तरी मोठा करा नाही तर मला तरी सदैव लहान ठेवा, असे त्या मुलाला म्हणावे लागेल! रूढीचे कपडे हे सदैव बदलत असावेत. उन्हाळ्यातील कपडे थंडीत चालणार नाहीत हा नियम आहे. असा बदल न कराल, तर थंडीत गारठून मराल व उन्हाळ्यात उकडून मराल!

हिंदुधर्म बुडाला बुडाला असे काही म्हणत असतात. कोणाच्या डोक्यावर शेंडी दिसली नाही, कपाळावर गंध दिसले नाही, तोंडावर मिशी दिसली नाही, गळ्यात जानवे दिसले नाही, म्हणजे त्यांना वाटते की, धर्म रसातळाला गेला! चित्रावती घातल्या नाहीत, प्राणाहुती घेतल्या नाहीत, आचमने अघमर्षणे केली नाहीत, म्हणजे म्हणतात धर्म बुडाला. परंतु, हा धर्म आधी किती लोकांचा आहे? आणि ह्या धर्माज्ञेचे महत्त्व तरी काय?

ही बाह्य चिन्हे बदलतात व बदलणारच. नवीन कालात नवीन चिन्हे निर्माण होत असतात. एके काळी डोक्यावर टोपी घालून जाणे मंगल वाटे; आता डोक्यावर काही न घालणे म्हणजेच कोणाला ऐक्याचे चिन्ह वाटेल. परंतु यात धर्माच्या बुडण्या-तरण्याचा काय प्रश्न आहे?

हिंदुधर्म काही चहाच्या पेल्यात बुडून जाण्याइतका किंवा मिशा काढताच मरून जाण्याइतका लेचापेचा नाही. हिंदुधर्म तेव्हा मरेल, -जेव्हा बुद्धीची उपासना मरेल. “आमची बुद्धी तेजस्वी राहो” ही गायत्रीमंत्रातील प्रार्थना जेव्हा मरेल. पंडित मोतीलाल नेहरू स्नानसंध्या करीत नसतील, वाटेल ते खातपीत असतील; परंतु ते जे काही करीत, ते त्यांच्या बुद्धीला त्या त्या वेळेस जे योग्य दिसेल ते करीत, ते गायत्रीमंत्राचे आमरण उपासक होते. त्यांच्या गळ्यात जानवे नसेल, परंतु खरा गायत्रीमंत्र त्यांच्याजवळ अहोरात्र जिवंत होता. आणि मरताना त्या महापुरुषाच्या ओठावर गायत्रीमंत्र होता! गायत्रीमंत्र गात गात त्यांचा आत्महंस उडून गेला!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel