जनमेजयाने आस्तिकाचे पाय धरले. ते सर्पसत्र थांबले. आस्तिकाने भारताचे उज्ज्वल भवितव्य त्या दिवशी सांगितले. आस्तिक म्हणाले, “जनमेजया! अरे, जगात कोणी तुच्छ नाही, कोणी उच्च नाही. सर्वांच्या ठिकाणी दिव्यत्व आहे. आर्यांत काही गुण आहेत, अनार्यांतही आहेत. दोघांत दोषही आहेत. आपण परस्परांचे दोष न बघता दोषांखाली दडपलेली आंतरिक गुणसंपत्तीच पाहिली पाहिजे. जो दुस-या जातिजमातींस सदैव हीन लेखील, तो नास्तिक समज. या अफाट देशात अनेक जाती आणि वंश आहेत. तुम्ही आर्य बाहेरून आलात. आणखीही अशाच जाती येतील. आज तुम्ही जो पायंडा पाडाल तो पुढे टिकेल. या भारतभूमीत शेकडो जातिजमाती एकत्र नांदत आहेत, असा प्रयोग होऊ दे. आर्य आणि अनार्य एक व्हा. आर्यांची दैवते अनार्यांची होवोत. अनार्यांची आर्यांची होवोत. आर्यांच्या सुंदर चालीरीती अनार्य घेतील, अनार्यांच्या सुंदर चालीरीती आर्य घेतील. अशा रीतीने नवीन भव्य संस्कृती निर्माण होवो. भारतीय संस्कृती म्हणजे सहस्त्र पाकळ्यांचे, शतरंगांचे भव्य कमल! या फुलात शेकडो विविध सुगंध निर्माण होवोत. नाना रंग, नाना गंध! जनमेजया, नागजातीला सर्प हे दैवत फार प्रिय व पूज्य वाटते. तुझ्या पित्याने सापाला मारून तो मृत सर्प एका ऋषीच्या गळ्यात अडकविला! नागांच्या दैवतांचा हा उपहास होता. नागांची नागपूजा तुम्हीही घ्या. नागपंचमीचा दिवस आपण रूढ करू या. आर्य व नागजातींच्या ऐक्याची ती खूण भावी पिढ्यांस मार्गदर्शन करील!”

भारतीय संस्कृतीचा हा महान विशेष आहे. अभेदात भेद व भेदात अभेदता हे भारतीय संस्कृतीचे स्वरूप आहे. त्या प्राचीन ऋषीने एक पृथ्वीमोलाचा मंत्र सांगून ठेवला आहे:

“एक सत् विप्रा बहुधा वदन्ति”

“सत्य वस्तू एकच आहे; परंतु तिला नाना प्रकारे संबोधण्यात येत असते.”
शेकडो दैवते एकाच शक्तीची नावे आहेत. एकाच पाण्याला ज्याप्रमाणे जल, नार, वारी वगैरे नावे आपण दिला आहेत, त्याप्रमाणे या विश्वापाठीमागील शक्तीला आपण अनेक नावे देतो. आपण या नावांसाठी भांडतो! आतील अर्श पाहू गेलो तर आपण केलेल्या अनर्थांचे आपणांस हसू येईल. आपण लाजेने मान खाली घालू.

आर्य व अनार्य यांच्या शेकडो दैवतांची एकी करण्यात आली. दैवतांची एकी करून मानवांचे ऐक्य साधण्यात आले. देवतांच्या हीन स्वरूपास आध्यात्मिक स्वरूप देण्याचे प्रयत्न झाले. अद्वैत अनुभवण्याचा तो केवढा महान प्रयत्न होता!

भारतीय संस्कृतीत प्रत्येक तत्त्व मनावर ठसविण्यासाठी काही प्रतीक सांगितलेली असतात; परंतु या प्रतीकांतील महत्त्व नाहीसे होऊन ते प्रतीक निर्जीव मढे होऊन जाते. प्रतीकातील अर्थ विलुप्त होतो व प्रतीकाची पूजा केवळ यंत्रवत सुरू होते. अद्वैताचे तत्त्व मनावर ठसविण्यासाठी एक महान प्रतीक सांगण्यात आले आहे.

समुद्रावर स्नानाला जा, संगमावर स्नानाला जा, नदीवर स्नानाला जा असे आपणांस शिकविण्यात आलेले आहे. आपण जेथे स्नान करू, तेथला भाव शरीर स्वच्छ होत असता मनातही शिरत असतो. नळावर स्नान करणा-या माणसाचे हृदय नळाच्या तोंडाएवढे आकुंचित व क्षुद्र होण्याचा संभव असतो. विहीर नळापेक्षा बरी; परंतु विहीरही चोहोंकडून बांधून घेतलेली असते. शेकडो मैल जात असते. नदीवर स्नान करण्यात म्हणे पुण्य आहे! कोणते पुण्य?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel