कुंती म्हणाली, 'सदैव मला विपत्तीच दे.' विपत्ती म्हणजेही धडपडच, ओढाताण. पूर्णतेचे स्मरण ठेवून तिला गाठण्यासाठी होणारी जीवाची तगमग, ही तगमग ज्याच्याजवळ आहे तो धन्य होय. त्याच्या जीवनात आज ना उद्या कृष्णाची मंजुळ मुरली वाजू लागेल.

श्रीकृष्णाने गोकुळात आनंदीआनंद आधी निर्माण केला. गोकुळात मुरली त्याने आधी वाजविली, आणि नंतर जगात संगीत निर्माण करावयास तो गेला. आधी गोकुळातील वणवे त्याने विझविले. गोकुळातील कालिये मारले, अघासुर, बकासुर मारले. नंतर समाजातील कालिये, समाजातील दंभ, समाजातील द्वेष-मत्सराचे वणवे दूर करावयास तो बाहेर पडला. स्वत:च्या जीवनातील संगीत सर्व त्रिभुवनास तो ऐकवू लागला. दगडधोंडे पाझरू लागले.

मनुष्य स्वत:च्या अंत:करणात जेव्हा स्वराज्य स्थापील, तेथे संगीत, सुसंबध्दता, ध्येयात्मकता, नि:शंकता, सुसंवादता निर्मील, तेथले वणवे विझवील. तेथले असुर संहारील, थोडक्यात स्वत:चा जेव्हा स्वामी होईल, तेव्हाच तो जगातही आनंद निर्माण करू शकेल. ज्याच्या स्वत:च्या जीवनात आनंद नाही, तो दुस-याला काय देणार ? जो स्वत: शांत नाही, तो दुस-याला काय माती शांती देणार ? ज्याच्या स्वत:च्या जीवनात संगीत नाही, तो दुस-याच्या जीवनातील रडगाणी कशी दूर करणार ? जो स्वत:चा गुलाम आहे, तो दुस-यास कसे मुक्त करणार ? जो स्वत:स जिंकू शकत नाही, तो दुस-यास काय जिंकणार ? स्वत: पडलेला दुस-याला उठवू शकत नाही; स्वत: बध्द असलेला दुस-याला मुक्त करू शकत नाही; सदैव ढोपरात मान घालून रडणारा दुस-यास हसवू शकत नाही. स्वत: स्फूर्तिहीन दुस-यास कशी चेतना देणार ? स्वत: निरुत्साही दुस-यास उत्साहसागर कसा बनविणार ? स्वत:च्या जीवन-गोकुळाला आधी सुखमय, आनंदमय करा. मगच या सभोवतालच्या संसाराला तुम्ही आनंदमय करू शकाल. स्वत:ची बेसूर जीवनबासरी सुधारा- मग दुस-याच्या जीवनबास-या तुम्ही सुधारू शकाल.

परंतु तो दिवस कधी येईल ? येईल, एक दिवस येईल. ही जीवन-यमुना तो दिवस येईपर्यंत अशान्त राहील. या जीवन-यमुनेवर कधी क्रोध-मत्सरांच्या, कधी स्नेह-प्रेमाच्या प्रचंड लाटा उसळतील. परंतु या जीवन-यमुनेची सारी धडपड, ते वेडेवाकडे उचंबळणे या ध्येयासाठी आहे. श्रीकृष्णाच्या परमपवित्र पायांचा स्पर्श व्हावा म्हणूनच ही खळबळ आहे. एक दिवस कृष्णाचा पदस्पर्श होईल व यमुना शान्त होईल. त्या ध्येय-भगवानाच्या चरणावर स्वत:स ओतण्यासाठी ही यमुना अधीर आहे. शान्त होण्यासाठी वादळ उठते. शान्त होण्यासाठीच जीवन धडपडत आहे. संगीत निर्माण करणा-या प्रभूच्या पायांचा स्पर्श व्हावा म्हणून जीवन अधीर आहे. येईल, तो शरद ऋतू एक दिवस येईल, तो प्रसन्न सुगंध एक दिवस सुटेल. ते प्रसन्न सुगंध एक दिवस सुटेल. ती प्रसन्न पूर्णिमा एक दिवस फुलेल. त्या दिवशी गोकुळात प्रेमराज्य स्थापणा-या, अव्यवस्था, गोंधळ, बजबजपुरी, घाण, वणवे, दंभ दूर करून मेळ निर्माण करणा-या त्या कृष्णकन्हैय्याच्या मुरलीचा अमृतध्वनी माझ्या जीवनात ऐकू येईल ! त्या श्यामसुंदराची वेड लावणारी वेणू वाजत राहील !

हृदयंगम वाजत वेणू
स्वैर न विचरति इंद्रियधेनू । ।
जीवन-गोकुळीं ये वनमाळी
अमित सुखाची सृष्टी पिकली
शिरिं धरिन तदीय पदांबुजरेणू । ।
प्रेमळ गोपी या मम वृत्ती
वेडावुन प्रभुरूपीं जाती
प्रभुविण वदति कीं कांहींच नेणूं । ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel