छत्रपती श्रीशिवाजीमहाराज म्हणजे महाराष्ट्रातील लाखो धडपडणा-या जीवांना एकत्रित करणारी शक्ती. बलवान मूर्ती डोळ्यांसमोर दिसताच सारे धडपडणारे जीव भराभर अनाहूत त्या मूर्तीभोवती उभे राहतात. तिचा आदेश पार पाडण्यास सिध्द होतात. अवतारी विभूती म्हणजे स्थिर विभूती. ध्येयावर दृष्टी ठेवून अचल उभी राहणारी विभूती. आपण सारे ध्येयपूजक असतो. परंतु त्या ध्येयाला आकाश कोसळो वा पृथ्वी गडप होवो, मी मिठी मारून राहीन, असा आपला निश्चय नसतो. आपण मोहाला बळी पडतो. सुखाला लालचावतो, कष्टाला कंटाळतो, हालांना भितो, मरणापासून पराङमुख होतो. ध्येयासाठी आपण धडपडतो, परंतु ती धडपड कधी थंडावेल, कधी गारठेल याचा नेम नसतो.

महापुरुष अशा चंचलांची ध्येयश्रध्दा दृढ करतो. त्या महापुरुषाची जग परीक्षा घेते. सॉक्रेटिसाची परीक्षा होते. ख्रिस्ताची परीक्षा होते. परंतु ते महान पुरुष अविचल उभे राहतात. जगाची श्रध्दा ते ओढून घेतात. जगाच्या प्रयत्नांना आपल्या दिव्यभव्य धैर्याने व आत्मत्यागाने नीट वळण देतात.

महात्मा गांधींच्या पाठीमागे कोट्यवधी हिंदी जनता का उभी राहते ? कारण कोट्यवधी हिंदी लोकांच्या तिळ तिळ प्रयत्नांतून ते निर्माण झाले आहेत. कोट्यवधी हिंदी लोकांना स्वत:ची ध्येये, स्वत:च्या आशा-आकांक्षा त्या महापुरुषाच्या ठायी अत्यंत उत्कटतेने प्रतीत होत आहेत. आपल्या हृदयातील ध्येय ज्याच्या ठिकाणी अत्यंत प्रखरतेने व स्पष्टपणे मूर्तिमंत झालेले दिसते, तो आपला अवतारी पुरुष होय. आपल्या प्रयत्नांचे, पराकाष्ठेचे परिणत स्वरूप जेथे आपणांस दिसून येते, तेथे आपला अवतार असतो.

मग अवतार म्हणजे काय ? अवतार म्हणजे मी कसोशीने प्रयत्न करणे. माझ्या लहान प्रयत्नातून लहान अवतार निर्माण होईल. माझ्या मोठ्या प्रयत्नातून महान अवतार निर्माण होईल. महात्माजींची शक्ती वाढविणे हे आमच्या हाती आहे. रामाच्या शब्दाची किंमत वाढविणे हे वानरांच्या हाती होते. महात्मा गांधी मागे इंग्लंडमध्ये जाताना म्हणाले, 'मी तिकडून काय आणणार ? आणणारा मी कोण ? तुम्ही द्याल तेच मी आणीन. मी म्हणजे तुमची शक्ती.' महापुरुषाची शक्ती बहुजनसमाजाच्या शक्तीने मर्यादित असते. ज्या मानाने बहुजनसमाज प्रयत्नांची पराकाष्ठा करील त्या मानाने अवतारी पुरुषाची प्रभा फाकेल.

तुम्हाला अवतार पाहिजे ना ? तर मग भारतीय संस्कृती सांगते, 'स्वत:मधील सर्व सामर्थ्याने ध्येयाकडे जाण्यासाठी उभे राहा. स्त्री-पुरुष, लहान-थोर, राव-रंक, सारे, -उठा. शर्थ करा. आच लागू दे. हृदय पेटू दे. हातपाय हालू देत. कोट्यवधी लोकांच्या अशा हृदयपूर्ण चळवळीतून महापुरुष प्रकट होतो व त्याच्या प्रयत्नांना पुढे सिध्दीचे फळ लागते.

इमर्सन या अमेरिकन ग्रंथकाराने एके ठिकाणी म्हटले आहे, 'महापुरुष म्हणजे लाटेवरचा फेस होय.' किती सुंदर उपमा आहे ! लाट कितीतरी दुरून चढत पडत येत असते. वाढत वाढत येत असते. शेवटी ती पराकाष्ठेची उंच होते, त्या वेळी त्या लाटेच्या शिखरावर स्वच्छ फेस उसळतो. त्या लाटेचे ते निर्मळ अंतरंग असते. समाजामध्ये कित्येक वर्षे चळवळ चालत असते. प्रयत्न होत असतात. पाऊल पुढे पडत असते. समाजातील चळवळ वाढत वाढत तिची प्रचंड लाट होते आणि त्या लाटेच्या शिखरावर महापुरुष उभा राहतो ! त्या लाटेतील स्वच्छता म्हणजे तो अवतार; जनतेच्या अनंत प्रयत्नांतील खळमळ जाऊन जे स्वच्छ, पवित्र स्वरूप वर येते, ते स्वरूप म्हणजे महापुरुष. जनतेच्या प्रयत्नांतील सारी पवित्र मंगलता, सारी निर्दोष विशालता त्या अवतारी पुरुषाच्या द्वारा जगाला दिसते. लोकांच्या प्रयत्नांचे सुंदर अपत्य म्हणे ती महान विभूती होय !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel