गाडीवानाने गाडी थांबवली. एक सुंदरसे दातण त्याने मला आणून दिले. मी त्याला म्हटले, ''गाडी चालू दे. मी दातण करीत पायीच येतो. पायही मोकळे होतील.''

गाडी पुढे निघाली. मी रस्त्याने चाललो. आजूबाजूची सृष्टी पाहात होतो. देशावरची हवा खात होतो. सकाळचा वारा उत्साहप्रद होता. कोठेतरी पाऊस पडलेला असावा. मृग नक्षत्र सुरू झाले होते, वारा थंडगार होता. माझ्या पायांतील वाहाणा कुरकूर वाजत होत्या. आमच्या पालगड गावातील पंडया चांभाराने त्या दिल्या होत्या. पंडया चांभाराचा व आमचा फार घरोबा. आमच्या घराण्यातील अनेकांचे पाय पंडया चांभाराने त्या दिल्या होतया. दपंडया चांभाराचा व आमचा फार घरोबा. आमच्या घराण्यातील अनेकांचे पाय पंडया चांभाराने सांभाळले; परंतु आम्ही त्याला काय दिले? आमचे पाय कृतज्ञ होते का कृतघ्न होते?

त्या निंबाच्या काडीने मला नीट दातण करणे जमेना. शेवटी ते मी टाकून दिले. मी तसाच निघालो. उतार होता. गाडी दूर गेली होती. माझ्या मनात शंका येऊ लागल्या. मल्हारपेठ वगैरे इकडेच क-हाडच्या बाजूला आहे, असे आम्ही लहानपणी ऐकले होते. दापोलीच्या शाळेत एखादे वेळेस एखादे शिक्षक एखाद्या खोडकर मुलाला म्हणायचे, ''तुम्ही मल्हारपेठेत पाठवण्यालायक आहात!'' त्याची मला आठवण झाली. माझे सामान घेऊन गाडीवान पळून तर नाही जाणार, असे मनात आले. परंतु सामान तरी असे काय होते? ट्रंकेत पुस्तके व वह्या. एक करंडी होती. तिच्यात फळे व फराळाचा डबा आणि घोंगडीगोधडीची वळकटी. ट्रंकेत पैसे थोडेच होते? मी झपझप पावले टाकीत चाललो. उताराच्या शेवटी गाडीवानाने गाडी थांबवली होती.

'' बसा आता गाडीत.''तो म्हणाला.

मी गाडीत बसलो. मला झोप येऊ लागली. शेवटी मी निजलो. गाढ झोप मला लागली. अत्यंत झोपेच्या वेळी कसलाही अडथळा माणसाला होत नाही. वाटेल त्या परिस्थितीत जी झोप येते, तीच खरीखुरी झोप. दहा वाजून गेले असतील. गाडीत ऊन येत होते. तथापि निद्रितच होतो. एके ठिकाणी गाडी थांबली. तेथे विहीर होती. गाडीवानाने मला हाक मारली मी जागा झालो.

''फराळ करा, दशमी भाकर खा.'' तो म्हणाला.

मी खाली उतरलो. माझा तांब्या बाहेर काढला. चूळ भरली. पाय धुतले. झाडाच्या छायेत मी दशमी खाऊ लागलो. त्या गाडीवानानेही भाकरी सोडली. माझ्यातील बटाटयाची भाजी मी त्याला दिली.

''तुम्हांला कांदा हवा का? लसणीची चटणीही घ्या हवी तर. तुम्हांला चालत असेल तर घ्या.'' तो म्हणाला.

मला लहानपणची घरच्या शिक्षेची आठवण झाली. आमच्या बंगल्यात अमृतशेठ मारवाडी राहात असते. त्यांच्या पत्नीचे नाव रामप्यारी. रामप्यारीकडे एकदा मी डाळ-रोटी खाल्ली होती. रामप्यारीने मला प्रेमाने दिली होती. पाच-सहा वर्षांचा मी होतो; परंतु मला त्याबद्दल अडुळशाच्या काठीचा खरपूस मार खावा लागला होता!

माझा गाडीवान तर कुणबी होता. त्याच्याजवळची का चटणी घेऊ? परंतु मी घेतली. त्याच्या जवळचा कांदाही घेतला. माझ्याजवळ हा भेदभाव जन्मजातच नाही. भाजी-भाकर कोणीही मला देवो, मला मी पवित्रच वाटते. मांस-मच्छी नसले म्हणजे झाले. माझी ही पूर्वजन्माची पुण्याई आहे.

निरनिराळया जातींबद्दल, निरनिराळया धर्मांबद्दल सहानुभुती व प्रेम मी ह्या जन्मात शिकलेलो नाही. माझ्या रक्तातच तो गुण आहे. हा माझा गुणच काहींना दोष वाटतो. ही माझी पुण्याई त्यांना पापाची शिदोरी वाटते; परंतु माझी ही कमाई मी गमावणार नाही. मी तिची वाढच करीन. सर्वांबद्दल सहानुभूती मला ज्या दिवशी वाटेल; त्या दिवशी मी कृतार्थ होईन.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel