''श्याम, मधे काही दिवस तू आनंदी दिसत होतास. पुन्हा अलीकडे तुझा चेहरा का बरं काळवंडला? काही बोलत नाहीस, काही नाही,'' काही नाही,'' एकनाथ म्हणाला.
'' एकनाथ, तुम्ही सारी मुलं प्रदर्शनासाठी काही ना काही करून नेणार आहात. मी काय नेऊ? तुझे रंगीत होल्डर किती छान झाले आहेत ! गोविंदाने हस्ताक्षरांचे नमुने तयार केले आहेत. त्याच्या अक्षराकडे पाहात राहवंसं वाटतं. मोत्यासारखे ते आहे. मला माझी लाज वाटते. मी निरूपयोगी आहे. मला काहीच का करता येऊ नये? माझ्या बोटांत कोणतंच कसब नाही, कोणतीच कला नाही, फुकट आहेत ही बोटं, ''मी दु:खाने बोललो.
'' श्याम, तू एक वस्तू तयार कर. मी सांगू?'' एकनाथाने विचारले.
'' सांग! काय बरं करता येईल मला? मी उत्सुकतेने विचारले.
'' तू एक सुंदरशी कविता कर. तुझ्याजवळ पुष्कळ आहेतही,'' तो म्हणाला.
'' एकनाथ कविता म्हणजे का हस्तकला? कविता म्हणजे हृदयाची कला,'' मी म्हटले.
'' आपल्याला जे येत आहे, ते आपण प्रदर्शनात ठेवावं. त्यात काय बिघडलं?'' तो म्हणाला.
'' परंतु ह्या प्रदर्शनाची मर्यादा ठरलेली आहे,'' मी म्हटले.
मी जरी तसे बोलून गेलो, तरी एकनाथचा विचार मी माझ्या घोळवू लागलो. करावी आपण एखादी सुंदर कविता, असे मी मनात ठरवले. वृक्षांच्या महिम्यावर कविता करावी, असे मनात आले. कविता तर केली. 'वृक्ष हे थोर संत हे त्या कवितेला नाव दिले. कविता मला आवडली. माझ्यापेक्षा एकनाथला अधिक आवडली.
एका मित्राने एका कागदावर चोहोबाजुंनी मला नक्षी काढून दिली. दुस-या एका मित्राने ती कविता सुंदर हस्ताक्षरात त्या कागदावर लिहून दिली. हिरव्या मेहरपीमध्ये ती काळया शाईतील कविता फारच खुलुन दिसत होती. तो कवितेचा कागद हातात घेऊन मी किती तरी वेळ बघत बसत असे. प्रदर्शन मंडळाकडे ती कविता नेऊन द्यायची होती. एका सुंदर वेष्टनात घालून, ती कविता मी घेऊन गेलो. परंतु ती कविता तेथे देण्याचा धीर मला झाला नाही. मी तेथे घुटमळत उभा राहिलो. माझी कविता नाकरण्यात आली तर?' हस्तकलेत कविता येत नाही. एवढंही तुला समजू नये का?असे कोणी मला म्हटले तर? माझ्या कवितेचे असे प्रदर्शन तुला समजू नये का?' असे कोणी मला म्हटले तर?' माझ्या कवितेचे असे प्रदर्शन होण्यापेक्षा, ती माझ्या हृदयातच असलेली बरी. मी माघारा वळलो. घरी आलो.
'' श्याम, दिलीस का कविता? तुला खात्रीने बक्षीस मिळेल,'' एकनाथ म्हणाला.
'' आपल्या महाराजांना कविता आवडेल! म्हणतील, कोण हा कवि?'' सखाराम म्हणाला.